मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय १ ला

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १ ला

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत `श्रीदत्तमाहात्म्य `


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥
श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसीतारामचंद्राय नम: ॥
श्रीगुरुदत्तात्रेय: प्रसन्नोस्तु ॥ श्रीदत्त ॥
ज्ञानकर्मेंद्रियप्राणगण । ह्यांचें करी जो संरक्षण ।
त्या गणपतीचे वंदूं चरण । मंगलाचरण हें आमुचें ॥१॥
ज्याला म्हणती अंबेचा सुत । कलियुगीं जो गंधर्वस्थित ।
जो वरदाभयदहस्त । स्मरणें समस्तविघ्नहर्ता ॥२॥
कर्ता धर्ता संहर्ता । विश्वाचा जो तारी आर्ता ।
जो स्मरणें दु:खवार्ता । नुरवी भर्ता तो आमुचा ॥३॥
तो आमुचा गुरुवर । त्याला जोडूनी दोनी कर ।
त्याचे चरणीं ठेविलें शिर । ज्याला सुरवर वंदिती ॥४॥
तो हा परमात्मा श्रुतिगेय । नरसिंहसरस्वती दत्तात्रेय ।
परब्रह्म सच्चिदानंदमय । निरामय अद्वितीय तो ॥५॥
तोचि रची हा ग्रंथ । निमित्तमात्र वासुदेव येथ ।
श्रवणें पठणें करवील स्वार्थ । हा यथार्थ भाविकांचा ॥६॥
जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरीं धरी अवतार ।
त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणीं ॥७॥
तत्सारभूत दत्तपुराण । औटसहस्त्र निरूपण ।
तें अपरिचित गीर्वाणभाषण । प्राकृतजन नेणती ॥८॥
म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगें उमजेल स्वयंप्रभ ।
भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभर्ता जो ॥९॥
श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग ।
त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्वरानुराग दावी जो ॥१०॥
जेथें कार्तवीर्याचें आख्यान । अलर्काचें विज्ञान ।
आयुयदूंचें उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वें ॥११॥
जरी पाहिजे मुक्ति । तरी आदरावी नवविधाभक्ति ।
जिणें येथें मिळे भुक्ति । अंतीं मुक्ति अनायासें ॥१२॥
स्मरण आणि वंदन । सख्य सेवन आणि अर्चन ।
दास्य श्रवण कीर्तन । सर्वनिवेदन नवविधाभक्ति ॥१३॥
कार्तवीर्यें केली स्मरणभक्ति । अलर्कानें वंदनभक्ति ।
आयुराजानें दास्यभक्ति । सख्यभक्ति परशुरामें ॥१४॥
विष्णुदत्तें केलें सेवन । यदूनें केलें अर्चन ।
वेदधर्में केलें कीर्तन । दीपकें श्रवण श्रीदत्ताचें ॥१५॥
सर्वस्वात्मनिवेदन । कित्येक भक्तांनीं करून ।
श्रीदत्तीं तल्लीन होऊण । निर्वाणस्थान घेतलें ॥१६॥
भक्ती ज्ञानाची माउली । करी कृपेची साउली ।
जिणें नामरूपा आणिली । ब्रह्ममूर्ती भली अनायासें ॥१७॥
निर्विशेष परब्रह्म । साक्षात्कार करतां श्रम ।
घडे मंदां त्याचा भ्रम । वारी हे क्रम दावूनी ॥१८॥
सगुनब्रह्मध्यानें मन । शीघ्र होई सावधान ।
मग निरस्तोपाधिकल्पन । स्वात्मज्ञान स्फुरतसे ॥१९॥
ती नवविधाभक्ती येथ । वर्णिजेल यथार्थ ।
जी करील कृतार्थ । दावोनि पंथ भाविकां ॥२०॥
स्मरणभक्ती अतिश्रेष्ठ । ती नवांमाजी वरिष्ठ ।
आठांलाही व्यापी गरिष्ठ । भगवत्प्रेष्ठ ती जाणा ॥२१॥
ज्याचें अंगें सहस्त्र । ज्याचीं स्वरूपें सहस्त्र ।
ज्याचीं नामें सहस्त्र । कर्में सहस्त्र जयाचीं ॥२२॥
ह्या सर्वांचें स्मरण । भावें करितां प्रतिक्षण ।
उतरे सर्व कर्माचा शीण । लाभे निर्वाण सहजची ॥२३॥
जातां येतां काम करितां । खातां पितां देतां घेतां ।
हृदयीं भगवत्स्मरण करितां । अकर्मता कर्माची ॥२४॥
स्मरणाविणें न घडे कांहीं । म्हणोन श्रेष्ठ स्मरण भक्ति ही ।
आतां कीर्तनभक्ति ऐका ही । तारी हेही भाविकां ॥२५॥
यस्य स्मृत्या च नामोक्तथा । हे तो स्मृति न हो मिथ्या ।
तपोयज्ञकर्म जें न्यून त्या । पूर्णत्वा नेई कीर्तन ॥२६॥
अजन्म्याचें दिव्य जन्मकीर्तन । अक्रियाचें दिव्य क्रिया गान ।
जन्मबीजाचें करी दहन । नुरवी गहन कर्मवार्ता ॥२७॥
करितां कीर्तन भगवंताचें । उठावे सात्विक भाव साचे ।
तरीच साफल्य जन्माचें । अन्यथा दंभाचें ठाणें तें ॥२८॥
नोहे हृदय सद्गदित । नोहे वाचा गद्गदित ।
न हो तनु रोमांचित । प्रेम्माश्रुपात नोहे जरी ॥२९॥
अंतर्भान नोहे जरी । देहभान न उडे तरी ।
दंभ मिथ्या प्रलापापरी । जाणिजे चतुरीं कीर्तनप्रौढी ॥३०॥
कीर्तनभक्ती ऐसी हे । श्रवणभक्ती तसीच आहे ।
त्रिकरण ज्याचें दृढ राहे । जो न पाहे बाहेर ॥३१॥
सोडोनि असूया स्पर्धा । ठेवोनियां दृढ श्रद्धा ।
अंतर्निष्ठ जो राहे सुधा । श्रवणी बद्धासन विनिद्र ॥३२॥
स्वयें जरी जाणे भगवद्गुण । तरी ऐकिवितां तेचि गुण ।
श्रद्धाभक्तीनें करी श्रवण । तेंचि श्रवण भक्तियुक्त ॥३३॥
प्रेम दावूनी जाती कीर्तना । तेथें वार्ता करिती नाना ।
कीं बैसोनि सेविती शयना । सोडिती अवधाना श्रवणाच्या ॥३४॥
व्यर्थ त्याचा तो परिश्रम । अशा श्रवणें न उडे भ्रम ।
न लागे मोक्षाचा क्रम । स्वरूपीं विश्रम त्या कैंचा ॥३५॥
म्हणोनियां सावधान । करावें भावें श्रवण ।
हें तृतीय भक्तीचें लक्षण । आतां सेवन अवधारा ॥३६॥
मुळीं स्वरूपची एक । तेथें कैंचा सेव्य सेवक ।
उत्तमाधवभाव विवेक । परी ठेविती लोक द्वैतभावीं ॥३७॥
अनादिकाल प्रवृत्ति । तीस अनुसरोनी वदे श्रुती ।
ज्या योगें मिळे पद्धती । लोक तरती अनायासें ॥३८॥
वज्रांकुशध्वजांकित । भगवत्पद पद्मचिन्हित ।
त्याला सेवी जो संत । तो होय मुक्त निश्चयें ॥३९॥
आतां परिसावें अर्चन । साकार मूर्ति कल्पून ।
सर्व भावें कीजे पूजन । सर्वोपचारेंकरोनी ॥४०॥
यथेष्ट प्रतिमा करून । स्वदेहाप्रमाणें मानून ।
मिळती ते उपचार समर्पून । करावें अर्चन भावार्थें ॥४१॥
त्रिकाल करावें अर्चन । किंवा षोडशोपचारीं प्रात:पूजन ।
मध्यान्हीं पंचोपचार देवून । रात्रौ नीरांजन समर्पावें ॥४२॥
जी जी वस्तु आपणा आवडे । ती ती ठेवावी देवापुढें ।
ऐसी भगवत्प्रीति जोडे । कडे पडे भवाब्धीच्या ॥४३॥
मूर्तिपूजा डोळां देखावी । तैसीच चित्तीं रेखावी ।
तेथेंच वृत्ती राखावी । ब्रह्मपदवी मिळेल ॥४४॥
एकाग्रतेनें पूजोत्तर । बसोनी देवासमोर ।
समरस करूनी अंतर । गुरुदत्तमंत्र जपावा ॥४५॥
याचें नांव अर्चन । आतां सांगतों वंदन ।
जेणें समान वृत्ति होऊन । अढळ स्थान मिळेल ॥४६॥
ब्राह्मणापासोनी चांडाळापर्यंत । गाई अश्व श्व खर सहित ।
स्थावर जंगमात्मक समस्त । यांसी सतत वंदावें ॥४७॥
वाच्यार्थ तो देह सगुण । अंतर्यामीं लक्ष्यार्थ निर्गुण ।
तो एक भगवान् परिपूर्ण । चालक भासक सर्वांचा ॥४८॥
सच्चिदात्मा स्वयें एक । अस्ति भाति प्रियत्वें देख ।
भाव ठेवोनी तेथें एक । वंदितां लोक अढळ मिळे ॥४९॥
सर्वथा न निंदी कोणा कोण । त्याचा मनीं नाणी शीण ।
सर्वभूतीं देवपण । मानूनि वंदन सर्वां कीजे ॥५०॥
येथें रुद्राध्याय प्रमाण । याचें नांव वंदन ।
आतां बोलिजेल दास्यलक्षण । वागावें आपण दासापरी ॥५१॥
धन्यापाशीं सेवक जैसा । तदधीन होऊनि वागे तैसा ।
मानापमान आणि आळसा । सोडोनि दिननिशा सेवावें ॥५२॥
दास न ठेवी पोटाची चिंता । तैसी योगक्षेमाची चिंता ।
न ठेवावी सर्वथा । ते घे माथां परमेश्वर ॥५३॥
असें असे हें दास्य जाण । आतां सख्यभक्तीची खूण ।
करिजेल निरूपण । श्रुतिप्रमाण विख्यात् ॥५४॥
अनेक देह सुटले जरी । कल्पाचे कल्प लोटले तरी ।
जो जिवलगा अंतरीं । आम्हां क्षणभरी न विसंबे ॥५५॥
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट । असी स्मृति बोले स्पष्ट ।
तो सर्वां वरिष्ठ । तोचि प्रेष्ठ जिवलगा ॥५६॥
त्याचें करावें सख्य । निरपेक्ष करणें हें मुख्य ।
येणें लाभे ब्रह्माख्य । पद जें सांख्ययोगगम्य ॥५७॥
त्यावांचुनी न गमावें । त्यावांचुनि न विसंबावें ।
त्यावांचुनि न वागावें । त्याला गावें निरपेक्ष ॥५८॥
सापेक्ष सत्य जी मैत्री होय । ती संसारा वारील काय ।
जरी ईश्वरीं सख्य होय । खास न होय पुनरावृत्ती ॥५९॥
तनु मन धन । परिवार क्षेत्र सदन ।
करावें ईशा निवेदन । आत्मनिवेदन बोलिजे ॥६०॥
मी केवळ शुद्ध बुद्ध । साक्षित्व हें म्हणणें विरुद्ध ।
अद्वितीय मी स्वत:सिद्ध । अपापविद्ध सदोदित ॥६१॥
मला नाहीं कर्तृत्व । मग कैचें भोक्तृत्व ।
यास्तव नाहीं बद्धत्व । नित्य मुक्तत्व खास असे ॥६२॥
असें अभ्यासें ठरतां । सहज हो नि:संगता ।
हेचि सर्वस्वात्मनिवेदनता । भक्ति संतां मानली ॥६३॥
अत्रिऋषी महामुनी ॥ नवविधा भक्ति करूनी ।
देवां अत्यंत प्रिय होवोनी । देवपिता होवोनी राहिला ॥६४॥
परात्मा ईक्षणें करून । भूतभौतिक सृष्टी रचून ।
ब्रह्मदेवा उपजवून वेद देवून सृष्टी रचवी ॥६५॥
ब्रह्मदेवें मानससुत । मुख्य उपजविले सात ।
त्यांतील दुसरा विख्यात । ब्रह्मसंमत अत्रिऋषी ॥६६॥
सोडी तीनी देहांचा अभिमान । तीनी अवस्था सोडून ।
तीनी गुणां उलंडून । सार्थक अभिधान मिरवे अत्री ॥६७॥
निष्कल्मश ब्रह्मयाचें तप । नेत्रद्वारा आपोआप ।
प्रगटलें होवूनि सुरूप । ऋषिस्वरूप तो हा अत्री ॥६८॥
पहिलें लागलें सूर्यग्रहण । कोणी नेणती तें कारण ।
अत्री सर्वज्ञ तें जाणून । करी ग्रहण प्रगट तें ॥६९॥
ऋग्वेदाचें पांचवें मंडळ । जो प्रगट करी सकळ ।
ज्यामध्यें अग्न्यादि देवकुळ । शीघ्र फलप्रद असे ॥७०॥
कृतयुगीं रोगग्रस्त । जाहले सर्व जीव त्रस्त ।
वैद्य होऊनि रोगांचे अस्त । करी समस्त सुखी अत्री ॥७१॥
मनूनें मंदबोधार्थ ।  स्मृती केली ती यथार्थ ।
नेणे लोक म्हणोनी सुखार्थ । करी समर्थ दुसरी स्मृती ॥७२॥
स्वयें जरी निरिच्छ मनीं । ब्रह्मवित् वरीयान् असूनी ।
पित्याची आज्ञा मानूनी । वरी मुनी अनसूयेतें ॥७३॥
कर्दमाचें तप मूर्तिमंत । प्रगटलें देवहूतीचे उदरांत ।
ते हे अनसूया विख्यात । अत्री हात धरी जीचा ॥७४॥
अतिथि जिच्या स्वप्नींही । मागें परतोनि गेला नाहीं ।
जिणें स्वयें नग्न होवोनिही । दिधली भिक्षा त्रिमूर्तीला ॥७५॥
सावित्री लक्ष्मी पार्वती । ऐकून अनसूयासतीख्याती ।
मत्सरें ग्रासूनि पाठवीती । स्वपतींतें जीपाशीं ॥७६॥
सतीचें सत्व हरावया । तीनी देव अतिथी होवोनियां ।
आलें बाल करूनि तयां । ठेवी अनसूया धर्मबळें ॥७७॥
गर्वताठा तुटतां येती । तीनी देवी पती मागती ।
अनसूया बाळे ठेवी पुढती । त्या नेणती पतीच्या खुणा ॥७८॥
मग हांसूनी अनसूया । त्यांचे पती देई तयां ।
सती लाभे अशा सामर्थ्या । पातिव्रत्याश्रयें ती ॥७९॥
सूर्या शापी कौशिकसती । तेव्हां अंधकारें प्राणी मरती ।
तीशीं समजावोनी उदयाप्रती । सूर्या आणि अनसूया ॥८०॥
मांडव्यशापें ब्राह्मण । सहसा पावला मरण ।
न लागतां एकक्षण । अनसूया तया उठवी ॥८१॥
सुदुष्कर करणी पाहून । देव देती वरदान ।
तीनी देव पुत्र होऊन । त्वदधीन राहती असा ॥८२॥
जीला मृदुला झाली धरा । मंद मंद वाहे वारा ।
शीतलता ये दिवाकरा । अमरा थरथरा कांपरा ये ॥८३॥
चंद्रतुल्य तिचें सौंदर्य । म्हणतां वाटे मना भय ।
कलंकी तो तिचा तनय । कलांचा क्षय जयाच्या ॥८४॥
पूर्णिमेसी पूर्ण हो जरी । तरी सरतांची रात्री ।
निस्तेजस्क होय त्याची सरी । कोण करी अनसूयेसी ॥८५॥
तेजस्वी सूर्य म्हणों तरी । उदयास्त असे बरोबरी ।
अनसूयेच्या तेजापरी । नित्य तेज दावी कोण अंगीं ॥८६॥
कौशिकस्त्रियेनें देतां शाप । कळलें सूर्याचें तप ।
जाणोनी सतीचा कोप । घेतली झोंप दशदिन ॥८७॥
त्याला उदया आणिला । असी दाविली सहज लीला ।
कोण तये अनसूयेला । जगीं तुला करील ॥८८॥
दया क्षमा शांती प्रमुख । गुण जयाचे सुरेख ।
तो विष्णु जगन्नियामक । जगीं एक मान्य असे ॥८९॥
त्याला जिणें केला अनुज । पुनरपि केला आत्मज ।
त्याचे उपमेचें काय काज । वाटे लाज मजलागीं ॥९०॥
तेव्हां केवला चित्कला । अनसूया वाटली मनाला ।
जगीं उपमा नाहीं तिला । अबला कोण म्हणेल ॥९१॥
अत्रिऋषी परम समर्थ । तपश्चर्या हा त्याचा अर्थ ।
ज्याला नाहीं किमपि स्वार्थ । परोपकारार्थ जो वागे ॥९२॥
त्याची ही अनसूया । जाहली असे जाया ।
पातिव्रत्यभूषणें काया । शोभवी दयाक्षमायुक्त ॥९३॥
धुंडतां हें त्रिभुवन । न मिळे दुजें साध्वीरत्न ।
न करितां तप:प्रयत्न । उत्तम साधन संपादिलें ॥९४॥
ईश्वरें साकार व्हावया । जेवीं पूर्वीं रचिली माया ।
पश्चात् सगुण होवोनियां । प्रगट झाला जगामाजी ॥९५॥
तेवीं धरावया अवतार । प्राकट्यस्थान सुंदर ।
अनसूयेचें हें शरीर । पृथ्वीवर प्रगटवी ॥९६॥
येथें अनसूयेशीं जरी । करावीं मायेची बरोबरी ।
माया जड हे चेतना निर्धारी । केवीं सरी द्यावी सरा ॥९७॥
तेव्हां निरुपम अनसूया । पुत्री कर्दमाची द्वितीया ।
ती दिली ब्रह्मपुत्रा द्वितीया । अद्वितीय आत्मज ज्यांचा ॥९८॥
तो हा भगवान् स्वयंदत्त । दत्तात्रेय नामें विख्यात ।
जे आधुनिक दतक सुत । ते विख्यात व्द्यामुष्यायण ॥९९॥
ज्याला नाहीं मातापिता । नसे कुळगोत्राची वार्ता ।
त्याणें आत्मदान करितां । व्द्यामुश्यायणता केवें ये ॥१००॥
ऐसा तो भगवान अप्रमेय । भक्तिस्तव झाला दाता देय ।
प्रसिद्ध तो दत्तात्रेय । श्रुतिगेय सद्गुण ॥१०१॥
ज्याचे अनंत गुणगण । गणतां शीणती वेद पुराण ।
आमुचें चित्त अल्प प्रमाण । गुणसंपूर्ण गणेल कीं ॥१०२॥
अथवा सत्कवित्व रचून । देवाचें तोषवाया कीं मन ।
बृहस्पतीचें कवित्व सद्गुण । विस्मय कारण तेंही नोहे ॥१०३॥
तरी येथें किमपि कारण । नसे जसें करी प्रेरण ।
तसें घडे हें लेखन । नाहीं अभिमान कर्तृत्वाचा ॥१०४॥
गोदावासी वेदधर्मा । तो निस्तारावया निजकर्मा ।
काशीवास करोनि शर्मां । पावला दुष्कर्मा टाळोनियां ॥१०५॥
त्याची सेवा दीपक । शिष्य होवोनी करी चोख ।
एकवीस वर्षें साहे दु:ख । नोहे पराड्मुख सेवेसी ॥१०६॥
त्यासी हरिहर प्रसन्न होती । बळेंची वरदान देती ।
तरी न भुले त्याची मती । सत्यधृती केवळ तो ॥१०७॥
मग गुरु म्हणे वर घे आतां । शिष्य म्हणे सांगा दत्तचरिता ।
तेणें तथास्तु म्हणोनि कथा । श्रीदत्ताची कथियेली ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये प्रथमोsध्याय ॥१॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP