जगदंबेचा केदार

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


एक होता राजा. शंकराचा मोठा भक्त होता तो. आपण येवढ्या मोठ्या राज्याचए स्वामी म्हणून त्याला घमेंड नव्हती. आपल्याला मिळणारे सारे सुख शंकराच्या कृपेने मिळते अशी त्याची श्रद्धा होती. सुखी होता राजा. पण त्याला मूलबाळ नव्हते. आपल्याला न मिळणारेअ सुखही शंकर आपल्याला देणारच, अशी त्याची खात्री होती. त्यामुळे त्याने आणि त्याच्या राणीने शंकराच्या भक्तीमध्ये जरासुद्धा कसूर केली नाही. अखेर शंभू महादेव पावला. राजाला मुलगा झाला.
सगळीकडे आनंदीआनंद झाला. प्रजेने मोठा उत्सव केला. राजाच्या घरात तर उधाण आले होते आनंदाला. राजपुत्राचे नाव शंकराची आठवण म्हणून केदार ठेवलए राजाने.  मोठ्या लाडात वाढायला लागला. काही दिवस असेच आनंदात गेले. आणि मग सगळेच पारडे फ़िरले.
राज्यावर एकाएकी परचक्र आले. राज्याचे किती तरी विश्वासू वीर शत्रूला शरण गेले. राजाची त्यामुळे फ़जिती झाली. शत्रूचा जय झाला. शत्रू विजयाच्या आनंदात जाळपोळ लुटालूट करून आपली हौस भागवू लागला.... आणि या दंगलीमध्ये खुद्द राजा आणि राणी या दोघांचेही बळी पडले. केदार पोरका झाला. मोठ्या शिताफ़ीने एका दासीने केदारला वाचवले.एका गुप्त भुयाराने ती गावाच्या बाहेर पडली....
गावाच्या बाहेर पडली आणि तिने केदारचे नाव शंभू केले. स्वत:चा तो मुलगा असल्याचे ती बोलायला लागली. धुमाळीतून बाहेर पडून दासी दुसर्‍या एका राज्यात शिरली. योगायोगाने ते राज्य शत्रूचे राज्य निघाले. केदारला त्या राज्याच्या स्वारीने देशोधडीला लावले, त्याच राज्याच्या राज्यात दासी केदारला घेऊन आलई होती. आणि हे ध्यानात आल्यावर तिने आणखीनच सावधपणाने गावाच्या बाहेर असलेल्या वाड्यामध्ये प्रवेश केला होता.
हा वाडा त्या राज्याच्या मुख्य प्रधानाचा होता. प्रधान अतिशय दुष्ट होता. त्याचे नाव दु:शासन होते. या दु:शासनाच्या घरात दासी आश्रयासाठी म्हणून शिरली. दु:शासनाच्या बायकोबरोबर गोड बोलून वाडा झाडालोटायचे काम तिने मिळवले. आणि तिथे राहून ती केदारला वाढवू लागली. दु:शासनाला मदन नावाचा एक मुलगा होता. मदन आणि केदार एकत्र वाढायला लागले. त्यांचे खाणे, पिणे, खेळणे सारे काही एकत्रच व्हायचे. मदन शंभूला मुळी सोडायलाच तयार नव्हता. दु:शासनाला हगोष्ट आवडली नाही, पण करतो काय
! लाडक्या मदनचे मन दुखवायला त्याला बरे वाटेना.... पुढे मदनला बहीण झाली. तिचे नाव विषया ठेवले गेले. तिन्ही मुले मजेत वाढत होती...
अशीच पाचसहा वर्षे गेली. केदार आणि मदन दोघेही सातआठ वर्षाचें झाले. दु:शासनाच्या मनात आले की, सहस्त्र ब्राह्मण जेवायला घालावेत, आणि प्रत्येकाला सूपभर मोहरा दक्षिणा देऊन ब्राह्मणाचे आशीर्वाद मदनसाठी घ्यावेत, त्याप्रमाणे त्याने सहस्रब्राह्मण जेवायला घातले. आणि प्रत्येकाला सूपभर मोहरा देत दु:शासन हात जोडीत म्हणाला, “ बाहेर बागेमध्ये सोन्याच्या आसनावर बसलेल्या मुलाला आशीर्वाद द्या. ” त्याप्रमाणे प्रत्येक ब्राह्मण सोन्याच्या आसनावर बसलेल्या मुलास आशीर्वाद देऊन गेले.... पण गंमत अशी की, सहज म्हणून मदनने केदारला सोन्याच्या आसनावर बसवले होते. आणि स्वत: रुप्याच्या आसनावर बसला होता. सर्व विद्वान ब्राह्मणांचे आशीर्वाद मिळाले केदारला ! नऊशे नव्याण्णव ब्राह्मण निघून गेले. आणि शेवटाचा ब्राह्मण आशीर्वा देत असताना दु:शासन सहज बाहेर आला. सारा घोटाळा त्याच्या ध्यानात आला. ‘ नवखंड पृथ्वीचं तू राज्य करशील ’ असा आशीर्वाद ब्राह्मणाने केदारला दिला, आणि दु:शासनाने ते ऐकलए. तो चिडला. त्याने सर्व ब्राह्मणांना परत बोलावून घेतले. त्यांना तो म्हणाला, “ अहो, या मुलाला काय म्हणून तुम्ही आशीर्वाद दिला ?.... मी याला नव्हते सांगितले आशीर्वाद द्यायला.... आशीर्वाद परत घ्या. या भिकारी मुलाला काय म्हणून आशीर्वाद दिलात ? माझ्या मुलाला द्या आशीर्वाद. ’’
ब्राह्मणांना हे बोलणे पटले नाही. आशीर्वाद परत घ्यायला ते तयार होईनात. “ हे आशीर्वाद मोलाचे आहेत. तोंडच्या वाफ़ा नाहीत त्या. आम्ही दिलेला आशीर्वाद परत घेणार नाही. आणि पुन: एकदा सांगतो, हाच मुलगा नवखंड पृथ्वीचे राज्य भोगणार...” ब्राह्मणांनी रोख उत्तर दिले. दु:शसनाने मग ब्राह्मणांना मारझोड करवली. दिलेली दक्षणा परत घेतली. परंतु काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणांचे बोल मात्र त्याच्या पदरी आले....
दु:शासनाला वाटायला लागले, ‘ खरेच हा शंभू राजा होईल... याला माझ्या मदनच्या वाटेतून नाहीसा केला पाहिजे. ’ आणि त्याने त्या दासीला अंधारकोठडीत टाकून केदारची वाट लावण्याचा घाट घातला. मारेकर्‍यांना सांगितले, “ या मुलाची खांडोळी करा जंगलात नेऊन आणि तलवारीवरच्या याच्या रक्ताचा टिळा मदनच्या कपळावर लावा. ”
मारेकरी केदारला घेऊन जंगलात आले. केदारला म्हणाले, “ बाळ, आता आम्ही तुला मारणार आहोत. तुला कुठल्या देवाची प्रार्थना करायची असली, तर कर. ”
केदारने आपल्या गळ्यात असलेल्या अंबाबाईचा छोटा टाक हातात घेतला, आणि तो म्हणाला, “ आई अंबाबाई, आजपर्यंत मी रोज तुझी पूजा केली, प्रार्थना केली... आता ही माझी शेवटचीच प्रार्थाना. मला आता तुझी शेवटचीच प्रार्थना. मला आता तुझी पुन: पूजा करता येणार नाही... क्षमा कर... ” आणि केदारच्या डोळ्यातले दोन टपोरे थेंब देवीच्या टाकावर पडले.... त्याबरोबर त्या जागी दोन सिंह निर्माण झाले, आणि त्यांनी आरोळ्या ठोकत मारेकर्‍यांना घाबरवून पळवून लावले ! मारेकरी जीव घेऊन पळत सुटले. आणि त्यांनी एक ससा मारून त्याच्या रक्तानेअ भरलेली तलवार दु:शासनाकडे नेली....
इकडे छोट्या केदारचा संभाळ वनातले प्राणी करू लागले. सिंह, हत्ती, माकडे, पोपट सारेजण त्याची काळजी घेऊ लागले. त्याचे लाड करू लागले... होता होता, एकदा त्या जंगलामध्ये एक राजा शिकारीसाठी आला. वेळ दुपारची होती. राजाला तहान फ़ार लागली होती. राजासाठी पाणी शोधत प्रधान केदारच्या जवळपास आला. एका सिंहाच्या पाठीवर बसून केदार ‘ घोडा घोडा ’ खेळत होता !... हे पाहून प्रधान राजाकडे पर गेला; राजालाहेअए त्यानेअ केदार दाखवला, राजाला तो देखावा पाहून नवल तर वाटलेच, केदारबद्दल कणवही वाटली.... तो प्रधानाला म्हणाला, “ प्रधानजी, आम्हांला हा पुत्र जगदंबेने दिला.... आपण याला घेऊन जाऊ या. ”
राजा आणि प्रधान केदारला घेऊन जाण्यासाठी टपून बसले. थोड्या वेळाने केदार सिंहाच्या पाठीवरून उतरला. सिंहही निघून गेला. आणि झाडावरच्या एका माकडाने दिलेला आंबा खात असलेल्या केदारला घेऊन राजा आणि प्रधान यांनी वेगात घोडे सोडले. त्या दोघांच्या कल्पनेप्रमाणेच माकडांचा मोठा जथा त्यांचा पाठलाग करीत ओरडत आरडात आला. पण घोड्यांच्या वेगापुढे त्यांचे काही चालले नाही.
राजाचा मुलगा म्हणून केदार वाढला. होता होता मग वीस वर्षं निघून गेली होती. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या केदारच्या हाती कारभार देण्याचे राजाच्या मनात यायला लागले. त्याच्या विचाराला सर्वांनी मोठ्या आनंदाने परवानगी दिली... आणि एके दिवशी केदारला गादीवर बसविण्यात आले.
केदार ज्या राज्याचा अधिकारी झाला होता,  ते राज्य मांडलिक राज्य होते. दु:शासन ज्याचा प्रधान त्या राजाचे मांडलिक राज्य. दरवर्षी नऊ उंट लादून खंडणी द्यायला लागायची.... ज्या दिवशी केदारला गादीचे अधिकार मिळाले,  तो दिवस खंडणी पोचवण्याचा होता.... आणि तो दिवस एकादशीचाही होता. केदारच्या सांगण्यामुळे सर्वांनी एकादशीचा उपास केला होता.  उंट घेऊन जाणार्‍या  लोकांचाही उपासच होता. संध्याकाळी खंडणी घेऊन जाणारे लोक दु:शासनाजवळ येऊन पोचले. दु:शासनाने खंडणी मोजली. आणि त्या लोकांना जेवून घ्यायला सांगितले. लोक म्हणाले, “ महाराज, आज आम्ही जेवणार नाही. केदारमहाराजांच्या सांगण्यावरून आम्ही आज एकादशीचा उपास केला आहे. ”
“ केदारमहाराज ? .... कोण केदारमहाराज ? ”
“ आमचे नवे राजेसाहेब. ”
“ कोणीं त्यांना अधिकार दिले ? ”
“ थोरल्या सरकारांनी.  ”
दु:शासनाला उलगडा होईना म्हणू तो स्वत: केदारच्या राजधानीत गेला. त्याने मुद्याचे बोलणे काढले, “ नवे राजे कुठायत ? आम्हांला कळले म्हणून आलो.... आणि काय हो, गादीचे अधिकार राजांना विचारून का नाही दिले ?.... त्यांना कळवलेही नाहीत ?... ”
तेव्हा राजा म्हणाला, “ आम्ही कोणाला अधिकार द्यायचे हा प्रश्न आमचा खाजगीतला आहे.... ”
दु:शासनाला हे उत्तर आवडले नाही. तरी तो म्हणाला, “ पाहू देत तरी नवे राजे आम्हांला.... ”
केदरची आणि दु:शासनाची गाठ पडली. केदारला पाहून दु:शासन विचारात पडला. आणि केदारकडे निरखून पहाता पहात त्याची खात्री पटली की, हा केदार नाही. हा शंभूच माझ्या मुलाच्या मार्गातला काटा... याचा उजव्या हाताचे सहावे बोटच सांगतेय ही गोष्ट. अस्सं.... हे पोरटे जिवंत सुटले म्हणायचे... पण एकदा सुटले म्हणून पुन: सुटेल काय ?.... दु:शासनाच्या मनामधले विचार दुसर्‍या कोणाला कसे कळणार ?
दु:शासनाने बोलणे केले, “ महाराज, आपण आमच्या महाराजांना न विचारता गादी अधिकाराचा समारंभ केलात. आपली निवड योग्य असली,  तरी महाराजांना काय वाटेल ?.... पण हे पहा, मी काही कागाळी करणार नाही महाराजांकडे. एक अट मात्र. या केदारजींनी एक चिठी घेऊन माझ्या मुलाकडे गेले पाहिजे. माझे फ़ार जरुरीचे काम आहे. चिठी केदारजींनीच नेली पाहिजे. ”
‘ हो ’ ‘  ना ’ करता करता राजा कबूल झाला. चिठ्ठी घेऊन मदनकडे केदार निघाला. वेळ दुपारची होती. कंटाळून केदार एका झाडाखाली निजला. योगायोगाने दु:शासनाची मुलगी विषया आपल्या मैत्रिणींबरोबर खेळत तिकडेच आली होती. झाडाखाली निजलेल्या राजबिंड्या केदारकडे मोठ्या आश्चर्याने पहात तिने त्याच्याजवळ पडलेली थैली उघडली. थैलीतली चिठी पाहिली.
“ अगबाई ! ही तर बाबांची चिठी. दादाला लिहिलेली.... चिठी घेऊन येणार्‍याला थोडाही विचार न करता विष देणे, कार्य सिद्धीस नेणे... छे ! इतक्या चांगल्या माणसाला विष देण्याची बाबांची कल्पना नसणार. चुकून इथे काही लिहायचे राहून गेले असेल. ” असा विचार करून विषयेने चिठीस दुरुस्ती केली. गवताच्या काडीने डोळ्यांतले काजळ काढून तिने विष या शब्दापुढे या लिहिले; आणि ती मोठ्या आनंदाने निघून गेली....
नंतर केदार जागा झाला. आणि लगबगीने मदनच्या गावी, घरी गेला. मदनने चिठ्ठी वाचली. आणि त्याने लगोलग लग्नसमारंभाची तयारी करून घेतलेअए, त्याची ही लगबग केदार पहातच राहिला. चिठीत अशा प्रकारचे काम लिहिले असेल, अशी कल्पनाच त्याला नव्हती.... मोठ्या थाटामध्ये लग्नासमारंभ उरकला गेला. विषया खुषीत होती. केदार चकित झाला होता, तरी तोही आनंदात होता. लग्नानंतर जेवणे चालू असताना दु:शासन आला.... आपल्या दारात चालू आलेला उत्सव पाहून आणि सनईचौखड्याची आवाज ऐकून तो बुचकळ्यात पडला. येवढ्यात मदन धावत आला आणि म्हणाला, “ बाबा, तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही केले आहे मी. ”
दु:शासन म्हणाला, “ मदन, ती चिठी कुठाय ? ”
मदनने चिठी दाखवली. आणि विषच्या जागी विषया पाहून त्याची चांगलीच फ़टफ़जिती झाली. दैवयोगामुळे त्याचा वैरी त्याचा जावई होऊन बसला होता !.... पण दु:शासन हाडाचाच दुष्ट होता. तो मनात म्हणाला, “ माझी लाडकी मुलगी विधवा झाली तरी हरकत नाही.... पण हा शंभू वाचता कामा नये. ”
आणि त्याने एक योजना आखली. त्याने केदारला सांगितले, की “ जावईवुवा, तुम्ही एकट्याने आई अंबाबाईच्या दर्शनाला जायचे. आज रात्री अकरा वाजता. आणि मग पहाटे जोडीने दर्शनाला जायचे.... देवीचे देऊळ जवळच आहे. ” आणि मारेकर्‍यांना सांगितले की देवीच्या गाभार्‍यात लपून बसा. आणि अकरा वाजता जो माणून दर्शनाला येईल त्याची खांडोळी करा.
ठरल्याप्रमाणे केदार रात्री अकराचे सुमारास एकटाच अंबाबाईच्या देऊळाकडे निघाला....
एवढ्या वेळात झाले होते काय की, राजाच्या कानावर प्रधानाच्या मुलीच्या लग्नाची बातमी गेली होती. राजाला दु:शासनाचा राग आला. एक तर दु:शासनाने राजाला लग्नाची माहिती दिली नव्हती, बोलावलेही नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, राजाने आपली मुलगी चंद्रिका हिला चांगले स्थळ पहाण्यासाठी दु:शासनाजवळही बोलणे केले होते... आणि राजाला साहजिकच वाटले, की चांगला मुलगा पहाण्यात आल्याबरोबर दु:शासनाने आपल्यास न कळवता आपलीच मुलगी उजवून टाकली.
राजाने तातडीचा निरोप पाठवला की, नवरदेव मला पहायला आहे. ताबडातोब इकडे पाठवा. निरोप मिळाला मदनला. मदन गेला घाबरून. राजाची मर्जीं खपा न व्हावी म्हणून त्याने घाईघाईने देवीच्या पूजेचे ताट केदारच्या हातातून घेतले; त्याला राजवाड्यवर पाठवले, आणि तो स्वत: देवळात गेला !....
इकडे राजाने केदारला पाहिले. राजाला केदार इतका आवडला की, त्याने वेळ घालवला नाही. त्यानेही आपली मुलगी चंद्रिका हिचा विवाह केदारबरोबर मोठ्या धूमधडाक्याने साजरा केला. दु:शासन सोडून सगळ्या मंत्र्यांना नि सरदारांना त्याने बोलावले होते. लग्नाची वरात मोठी निघाली. दु:शासनाच्या वाड्यावरून देवीच्या दर्शनासाठी चालली. गडबड ऐकून दु:शासन बाहेर आला. पहातो तर राजाच्या मुलीच्या लग्नाची वरात ! कुळस्वामिनीच्या दर्शनाला निघालेली... आणि जावई कोण ? तर तोच तो शंभू !
दु:शासनाला क्षणभर घेरी आली. आणि सावध होऊन तो देवळाकडे धावत पळत निघाला. त्याच्या जिवात जीव नव्हता.... मारेकर्‍यांनी तर कामगिरी फ़त्ते झाल्याचे नुकतेच येऊन सांगितले होते.... शंभू तर सही सुटला होता. सलामत.... मग मारला गेला कोण ? दु:शासन देवळात आला,  आणि आपला लाडका मुलगा मदन मारला गेल्याचे पहाताना त्याला इतका जोरात धक्का बसला की, त्याने लगेच तलवार खुपसून घेऊन आपला नाश करून घेतला !...
इकडे वरात देवळाजवळ आली. राजा, केदार व चंद्रिका देवळात आली. राजाने व केदारने देवीपुढचें ते दोन बळी पाहिले, आणि त्यांच्या लक्षात सार्‍या गोष्टी आल्या. आपण वाचलो म्हणून केदारने देवीला मोठ्या आनंदाने नमस्कार केला. चंद्रिकाही देवीपुढे वाकली.... आणि केदारने देवीला साकडे घातले, “ आई, जगदंबे, बाळपणापासून मी तुला पुजत आलो. मी तुझी जी भक्ती केली, तिचे मला काही तरी फ़ळ दे.... मी जास्त काही मागत नाही. माझ्या लग्नाच्या आनंदाच्या प्रसंगी दु:शासन,  आणि मदन यांचे बळी पडाले. किती झाले तरी दुष्ट का होईना दू:शासन माझा सासरा आणि मदन माझा मेव्हणा.... मदन तर किती सरळ मनाचा.... दोघांनाही तू जिवंत केले पाहिजेस !.... आई, माझे येवढे मागणे पुरे कर.... नाही तर माझा तिसरा बळी पडलाच म्हणून समज... ”
देवी अंबाबाई खरेच कोड्यात पडली.... दु:शासनासारख्या दुष्टाला आणि मदनासारख्या भोळ्याला जिवंत करायला ती राजी नव्हती. पण केदार चाही तिला बळी घ्यायचा नव्हता. आपला एकनिष्ठ भक्त आहे केदार. आणि दुसरे म्हणजे ‘ नवखंड पृथ्वीचे राज्य तू भोगशील ’ असे सहस्त्र ब्राह्मणांचे विद्वानांचे आशीर्वाद केदारला मिळाले आहेअत. सम्राटाचा तो जावई तर झालाच आहे.... माझ्या गुणी केदारला गमावून बसू काय ? शेवटी तिने केदारचे मागणे पुरे करायचे ठरवले. ती केदारला म्हणाली, “ बाळ, तुझा हट्ट मी मानते.  तुझ्या उजव्या हाताचे सहावे बोट काप, आणि रक्ताची धार दोघांच्या मुखात सोड. ते जिवंत होतील. ”
केदारला आनंद झाला. त्याने देवीने सांगितल्याप्रमाणे केले. दु:शासन नि मदन जिवंत झाले. दु:शासनाला अगदी शरमल्यासारखे झाले. त्याने केदारचे पाय धरले. केदार चटकन बाजूला होत म्हणाला, “ सारी जगदंबेची कृपा. ” मदनने केदारला मिठी मारली.... सर्वांना आनंद झाला. दु:शासनाने लगेच प्रधानकी सोडल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे त्याने केदारला लहानपणी संभाळणार्‍या दासीलाही मुक्त केले.
केदार आता राजाचा जावई झाला असला, तरी तो स्वत:ही एक राजा झालेला होता. मोठ्या महाराजांच्या पाया पडत त्याने घडलेली सारी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला, “ बाबा, ही सारी जगदंबेची कृपा. ”
आपल्या देखण्या, गुणी सुनांना आणि केदारला आशीर्वाद देत म्हातारा राजा सुद्धा म्हणाला, “ खरंच.... सारी जगदंबेची माया आहे ही.... ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP