अमृताचाद्रोण

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


त्या दिवशी अंगणात टिप्पूर चांदणं पडलेलं. सगळी धरणीच जशी काय उजळून निघालेली. त्या कारणानं मी गावंदरीच्या शेतावर नजर टाकली. माळवदावरून सारं शेत नजरेखाली घातलं. भरात आलेल्या पिकाला डोळे भरून पाहिलं. जोंधळा तरारून वर आलेला. कणीस टचाचून भरलेलं. शेत सुगीला आलेलं. म्हणताना जरा लांबवर बघितलं. नजरेच्या टप्प्यात शेत घेतलं. तशी लक्ष्मीआई बांधावर उभी. हाती अमृताचा द्रोण. माझ्या दादाच्या कामगिरीवर जणू ती संतोष पावलेली. खोपीतील घागरीतलं पाणी प्यायला मागतेली.
लक्ष्मीआईला बघून माझी तहानभूक हरपली. मी तिला हात जोडले. मनोभावे तिची पूजा केली. नेत्रांची पंचारती केली. आणिक ओळखपाळख नव्हती तरी बोलले बाई. म्हणाले कशी, “ आई लक्ष्मी, सोन्याच्या पावलांनी ये. तुला हळदकुंकंवाच्या पायघड्या घालते. माझ्या बंधूचा धरला पालव सोडू नकोस. माझ्या बाबांची सोपामाळी मी तुला दावते. ये तू ये. ”
आणिक बाई ती आली हं ! म्हणाली की, येते जोतं चढून वर आली. देव्हार्‍याच्या कोनात पाण्याचे हंडे होते. तिथलं पाणी प्याली. तिन्ही सांज झालीय म्हणाली. द्रव्याचा पुडा सोडला. हळदकुंकवाचं वाण दिलं. आणिक मोत्या पवळ्यांनी तिची ओटी भरली तर इथंच राहीन बोललेअए. माघारी जायची. नाही म्हणाली. घरधन्यांच्या पाठीवरून तिनं हात फ़िरवला. मोराचा पिसारा घे म्हणाली. आंदण दिला बोलली. तशी मग आमच्या बाप्पाजींनी घराची कवाडं उघडली. खिडक्या उघडल्या. चहूकडे दिवे लागले. गाद्यागिरद्या घातल्या. फ़ुलांच्या पायघड्या घातल्या. हंड्याझुंबरांचा लखलखाट झाला. किनखापाच्या उशा दिल्या. देवाची सवती खोली तिला दिली.
चांदीच्या घंगाळात पाणी विसणलं. जरीकाठी साडी नेसायला दिली. चौरंग मांडला. पाच सवाष्णी आल्या. न्हाणंधुणं झालं.  पिंजरीचं कुंकू ल्याली. राजाचुडे भरले. जडिताचं मंगळसूत्र ल्याली. सोन्याच्या पावलांनी घरभर फ़िरली. भाजीभाकरी पोटभर जेवली. दूध प्याली. अमृताचे प्याले देती झाली. सिंहासनी मग बसली.
सगळीकडे आनंदीआनंद झाला. आई लक्ष्मीच्या नावाचा जयजयकार झाला. धरणीची पूजा बांधली गेली. पुरणाच्या पोळीचा निवद झाला. खोबर्‍याच्या कानवल्याचं तोंडीलावण झालं. साखरभात मागचा पुढचा जेवली. सारं घर हसलं. सुखावलं. कष्टांचं चीज झालं. गाड्या भरून धनधान्य घरात आलं. दंड भुजा रेटून भावांनी गाड्या भरल्या. दारी अंबारीचा हत्ती झुलला न गावभर बंधूच्या कर्तबगारीचा डंका वाजला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP