गणगोत

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


आपल्या आवडत्या देवाची पूजा ज्या वेळी माणूस बांधू पाहतो त्या वेळी त्या देवासंबंधीची निष्ठा त्याचेजवळ वास करीत असते. या निष्ठेच्या पायी तो वाटेत ते करू पाहतो. पण त्या मार्गात कुणाला येऊ देत नाही. अशा वेळी त्यागाचे मनोरे बांधावे लागले अगर भावनेला बांध घालावा लागला तरी तो मागेपुढे पाहत नाही. देवाच्या चरणी आपला मनोभाव ठेवावयाचा व त्यायोगे मनाला शांती प्राप्त करून घ्यावयाची एवढेच त्याला माहीत असते. म्हणून जनलोकांच्या दृष्टीने अशी माणसे देवभोळी ठरतात. एकलकोंडी मानली जातात. आणि ह्या माणसांनाही देवाखेरीज दुसरे गणगोत आठवत नाही. त्या कारणाने त्यांचा आवडता देवही हा गोतावळा आवडीने जवळ करू पाहतो. जनाईने विठूदेवाला याच संदर्भात लेकुरवाळा म्हटले आणि कितीक साधुसंत मुलांबाळांच्याप्रमाने त्याच्या अंगाखाद्यांवर खेळविले.
लोकगीतकारांनी आपल्या स्मरणातील साधुसंतांच्या जीवनातील देवाविषयीचे अनुभव लोकगीतांतून सांगितलेले आहेत. अशा वेळी प्रत्यक्ष देवानेच मानई रूप धारण केलेले आहे. आणि त्याच्या विविध भक्तांनी देवाला मानुषीकरण करण्यास भाग पाडले आहे असे दिसून येते.
इथे अद्भुताचा वावर सर्वत्र दिसून येतो आणि भक्तिरसाची गंगा दुथडी भरून चालल्याचे पाहावयास गवसते. त्यामुळे सामान्यांच्या जीवनात प्रवेश केलेल्या देवाच्या सान्निध्यामुळे उभे राहिलेले असामान्य जीवन काळजाला जाऊन भिडते. आणि ह्या गणागोतांने देवाच्या चरणी वाहिलेली भावसुमांची माला अखंड सौभागयवती झाल्याचा अनुभव खात्रीने येतो. ती सदोदित ताजी व टवटवीत राहिलेली दिसून येते. त्यामुळे हा भावनाविष्कार देवापर्यंत केव्हाच पोहोचलेला असतो आणि त्या संदर्भात देवाने ह्या भक्तगणांच्या हाती दिलेल्या अमृताचा शिडकावा आपल्याही अंगावर आल्याखेरीज राहत नसल्याची सुखद स्मृती आपल्याला समाधान देत असते. म्हणून देवाच्या ह्या गनगोतांच्या सहवासाची अपूर्वाई आपल्याला पण जाणवते आणि मग आपणही ह्या गोतावळ्याशी सोईरसंबंध जोडण्याच्या खटपटीला नकळत लागून जातो !


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP