नवस

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


आपल्या मनीची गोष्ट एखाद्याला सांगूनही जेव्हा कळत नाही आणि सांगायचा कितीही प्रयत्न केला तरी ती उमजतही नाही असं कधी कधी घडतं. अशा वेळी सांगणारा न् ऐकणाराही भुलून जातो. काय करावं कुणालाच समजत नाही. मनातील गोष्ट बरीक उसळ्या मारीत रहाते न् काही म्हणून काही एक सुचू दत नाही.
परवा माझं देखील असंच झालं. घरात माझ्या भावाच्या लग्नाकारणानं खंडीभर गणगोत जमा झालेलं न् नवी नवरानवरी घेऊन देवाला जायची भाषा चाललेली. पण एकाचा बेत दुसर्‍याला पटेल तरची गोष्ट ना ! आमच्या घरात नाईकबा कुळस्वामी तर पाव्हण्यांच्या घरात जोतिबा. तशात त्यांचे व्याही म्हणाले की, आमच्या घरी कुळस्वामिनी अंबामाता आहे. तर आणखी कोणी कोणी असाच आपापला मनोदय बाहेर काढला. म्हणजे प्रत्येकाची देवाची वाट वेगळी न् बरोबर तर नवरानवरी पाहिजेतच म्हणे ! रामा शिवा गोविंदा ! ! हे जमावंच कसं देवा ? आमच्या घरच्यांचा असा जीव उडून गेला की, कुणाला हो म्हणावं न् कुणाला नाही सांगावं याचं जसं काय गणित बसेनाच तर !
होता होता मग आठवड्याचे सगळे दिवस वाराप्रमाणं पुढं ठेवले. त्या त्या देवाचा वार शोधून घेतला. आणिक पूजेचा सोपस्कार गोळा करणार तर देवाच्या दारातील नगार नौबत कानांत घुमायला लागली, नजरेत गुलालाची फ़ुटलेली पेवं आली, नाकात उदकाडीची न् अबीरबुक्क्याची दरवळ घुसली, मनात नवरात्राचा उपास घोळला, पायाखाली चारी बाजूंनी फ़ुललेल्या वाटा आल्या आणिक हातात नैवेद्याचं ताट झळकलं. समोर फ़ुलमाळांचा उगानिगा चालला न् मनी उल्हासानं ठाण दिलं. म्हणताना मग मी आमच्या घरातील देवाला हात जोडले न् बोलले, “ देवा महाराजा, मी एक नवस बोलते. आमच्या घरात ज्याच्या त्याच्या देवाला आपापलं असं एकट्यानं जायची बुद्धी होऊ दे न् नवरानवरी तूर्तास तुझ्याच पाया पडू देत. म्हणजे हा वाद मिटेल आणि मांडवपरतणं झोकात होईल. एवढं माझं तू ऐकच देवा. मी तुझ्या नावानं मग आत्ता खडीसाखर वाटते न् वर्षाची मोठी एकादश्सी करीन म्हणते. ” आणि मग घरात होती नव्हती तेवढी खडीसाखर खरंच प्रत्येकाला वाटली तर ज्यानं त्यानं माझा नवस ताडला न् आपापल्या कुळस्वामीच्या गावाची वाट धरायचा बेत करीत म्हटलं कसं, “ घरच्या देवाचा नवस पहिल्यांदा पावला की कुळस्वामी भेटतोच. ” तशी मनाला एवढा आनंद झाला की, त्याची अपूर्वाई कुणी कुणाला सांगावी न् कोणत्या शब्दांनी तसली बोलणी व्हावीत ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP