पंचम पटल - अनाहतचक्रविवरणम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


हृदयस्थानामध्ये अनाहत नावाचे चवथे कमल किंवा चक्र आहे. या चक्राला किंवा कमलाला बारा पाकळ्या आहेत. या पाकळ्यांवर क पासून ठ पर्यंत म्हणजे क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ हे बारा वर्ण विराजमान झालेले आहेत. या कमलाचा रंग रक्तासारखा गडद तांबडा आहे. येथे ‘ यं ’ हे वायुबीज असून हे स्थान अत्यंत प्रसन्न किंवा रमणीय आहे.

या हृदयकमलामध्ये जे श्रेष्ठ तेज आहे त्याला बाणलिंग असे म्हणतात. या बाणलिंगाच्या केवळ स्मरणाने साधकाला इहलोकातील व परलोकातील उत्तम फ़ल आनन्दाने प्राप्त होते.

ज्या हृदयकमलात पिनाकी म्हणजे शिव हा सिद्ध आहे व काकिनी ही अधिष्ठात्री देवी आहे त्या अनाहतचक्राचे जो साधक नेहमी ध्यान करतो त्याच्या जवळ सुंदर स्त्रिया, देवता किंवा अप्सरा आदि मोहित व कामार्त होऊन येतात.

( हृदयकमलाचे ध्यान करणार्‍या ) साधकाला अपूर्व ज्ञान उत्पन्न होते व तो त्रिकालदर्शी होतो. त्याला दूरशब्दश्रवण म्हणजे खूप लांबचा शब्द ऐकण्याची व दूरदृष्टी म्हणजे लांबच्या सूक्ष्मतम वस्तू पाहण्याची शक्ती प्राप्त होते आणि तो आपल्या इच्छेने आकाशगमन करू शकतो.

( अनाहतचक्राचे ध्यान करणार्‍या साधकाला ) सिद्धांचे व योगिनींचे दर्शन होते. त्याला आकाश गमनाची अर्थात् सहस्रारात जाण्याची सिद्धी प्राप्त होते व जेवढ्या आकाशस्थित अर्थात् सहस्त्ररातील शक्ती आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त होतो. जो साधक योगी परमश्रेष्ठ व अविनाशी अशा दुसर्‍या बाणलिंगाचे ध्यान करतो त्याला खेचरी म्हणजे आकाश गमनाची व भूचरी म्हणजे स्वच्छेने जगात संचार करण्याची सिद्धी प्राप्त होते, यात काहीही संशय नाही. श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! या अनाहतचक्राच्या किंवा हृदयकमलाच्या ध्यानाचे माहात्म्य वर्णन करणे कोणालाही शक्य नाही; कारण ब्रह्मादि सर्व देवता हे ध्यानसाधन अत्यंत गुप्त ठेवतात अर्थात् अनधिकारी साधकाला सांगत नाहीत.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP