चतुर्थ पटल - योनिमुद्राकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


ब्रह्मयोनीच्या मध्यभागी कन्दुक किंवा कामपुष्प अर्थात् काम बाणासारख्या उज्वल, कोटाई सूर्याप्रमाणे प्रकाशयुक्त आणि कोटी चंद्रांप्रमाणे शीतल अशा कामदेवाचे ध्यान साधकाने करावे. त्याच्या वर सूक्ष्म ज्योतीच्या ज्वालेसारखी चमकणारी, चिद्रूप म्हणजे चैतन्यस्वरूप व परमश्रेष्ठ अशा सतराव्या कलेच्या रूपाने असणारी कुलकुंडलिनी शक्ती आहे. त्या स्थानीच साधकाने आपले म्हणजे जीवाचे अर्थात् शिवाचे व कुंडलिनी शक्तीचे म्हणजे चिद्रूप चैतन्य शक्तीचे एकीकरण होत आहे असे चिंतन करावे. ( जीव म्हणजे संकुचित शिव होय. )

( ज्यावेळी कुडकुंडलिनी शक्ती जागृत होते ) त्यावेळी जीव ब्रह्मयोनीपासून निघून कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी व कोटी चंद्रांप्रमाणे शीतल असलेल्या ब्रह्ममार्गाने अर्थात् सुषुम्ना नाडीच्या मार्गाने स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन शरीरांना क्रमाने ओलांडून ऊर्ध्वगमन करतो. याचा अर्थ असा की, ज्यावेळी कुंडलिनी शक्ती सुषुम्नामार्गाने सहस्रारकडे जाऊ लागते त्यावेळी ती स्थूल, सूक्ष्म व कारण या तीनही शरीरांना कारणीभूत होणार्‍या किंवा उत्पन्न करणार्‍या शक्तींना आपल्यात समाविष्ट करून घेते. या नंतर ही शक्ती अर्थात् जीव स्वर्गातील म्हणजे सहस्रारातील परमानन्दकारक, पांढर्‍या व लाल अशा संयुक्त रंगाचे अर्थात् गुलाबी रंगाचे, अत्यंत तेजस्वी व अमृताच्या धारेचा वर्षाव करणार्‍या दिव्य अशा कुलामृताचे पान करून पुन्हा ब्रह्मयोनीमध्ये येऊन स्थिर होतो. याचा अर्थ असा की, साधन करताना कुंडलिनी शक्ती सहस्रारात गेल्यावर तेथे ती शिवाशी एकरूप झाल्याने तिला अमृतपान घडते व त्यानंतर पुन्हा ही शक्ती अर्थात् जीव आपल्या मूळच्या जागी येऊन स्थिर होतो.
ब्रह्मयोनीच्या स्थानी ( सहस्रारातून अमृतपान करून आलेला जीव म्हणजे शक्ती किंवा प्राण अर्थात् प्राणवायू ) पुन्हा त्या स्थानापासून मात्रायोगाने अर्थात् प्राणायामाने किंवा शक्तिचालनाच्या साधनाने निघून सहस्रारात जातो हे निश्चित आहे. यात काहीही असत्य नाही. ही ब्रह्मयोनी प्राणासारखीच आहे असे मी या तंत्रातच म्हटले आहे.

( अशा प्रकारे साधनाने ) तो काल इत्यादींनी युक्त असा शिवात्मक म्हणजे शिवस्वरूप जीव पुन:पुन्हा सुषुम्नामार्गाने प्रस्थान करीत अर्थात् ऊर्ध्वगामी होऊन चंद्रमंडलात जाऊन अमृतपान करून पुन्हा ब्रह्मयोनीमध्ये येऊन लय पावतो किंवा स्थिर होतो. या बंधालाच योनिमुद्रा म्हणतात. संसारात अशी कोणतीही वस्तू नाही की, जी केवळ हा बंध केल्यानेच सिद्ध होणार नाही किंवा असाध्य असेल. याचा अर्थ असा की, योनिमुद्रा सिद्ध केल्यावर सर्व काही सिद्ध केल्यासारखेच आहे. ॥७॥८॥

जे मंत्र छिन्नस्वरूप, कीलित म्हणजे बांधलेले किंवा अर्धांग झालेले, स्तंभित, दग्ध, शिररहित, मलिन, तिरस्कृत म्हणजे अनावर किंवा त्याग करण्यास योग्य असलेले, मंद, बाल म्हणजे कमी प्रभावाचे, वृद्ध म्हणजे पूर्ण प्रभावाचे, प्रौढ म्हणजे मध्यम प्रभावाचे, यौवनगर्वित म्हणजे उग्र स्वभावाचे किंवा उत्तीजनात्मक, भेदयुक्त, भ्रमात टाकणारे किंवा भ्रांती उत्पन्न करणारे, सप्ताहांमुळे मूर्च्छित अर्थात् क्रियाहीन झालेले, शत्रुपक्षाला हितकारक असणारे, निर्वीर्य म्हणजे सामर्थ्यहीन, सत्त्वरहित, सत्त्वहीन व खंडित होऊन शंभर तुकड्यात विभाजित झालेले आहेत असे सर्व प्रकारचे मंत्र वरील प्रकाराने योनिमुद्रा सिद्ध करून केल्यावर अत्यंत शीघ्र व प्रकर्षाने सिद्ध होतात. जर सद्गुरूंनी ह्या मंत्रांची ( शक्तिसंक्रमणासह अर्थात् शक्तिपातासह ) दीक्षा दिली; तर हे मंत्र सिद्धिप्रद व मोक्षदायक होतात. त्याचप्रमाणे साधक योग्याच्या मुखातून मंत्राचे शुभाशुभ म्हणजे शुद्ध व अशुद्ध शब्दांनी उच्चारण झाले; तरी हे मंत्र योनिमुद्रेच्या बंधनाने अर्थात् ही मुद्रा करून मंत्रजप केल्याने ते सर्व सिद्ध व अनुकून होतात. गुरूचे हे कर्तव्य आहे की, जिज्ञासू साधकाला मंत्राचा अधिकार प्राप्त व्हावा या करिता त्याने त्याला विधीपूर्वक या मुद्रेची दीक्षा द्यावी व साधकाकडून हजार वेळा त्याचा अभ्यास करून घ्यावा. याचे तात्पर्य असे की, जिज्ञासू साधकाने सद्गुरूला शरण जाऊन दीक्षा घेतली पाहिजे. सद्गुरूचेही हे कर्तव्य आहे की, आपल्याकडे आलेल्या साधकाला योगविद्येत पारंगत करण्यासाठी विविध प्रकारे शिक्षण दिले पाहिजे अर्थात् त्याला विविध प्रक्रिया शिकविल्या पाहिजेत. त्यामुळे शिष्यापासून साधनातील कोणतीही प्रक्रिया किंवा प्रकार गुप्त राहणार नाही.

जरी साधकाने एक हजार ब्रह्महत्या केल्या आणि त्रैलौक्याचाही घात म्हणजे त्रैलोक्यातील सर्व प्राण्यांचाही संहार केला; तरी तो या योनिमुद्रेच्या बंधनाने अर्थात् ती लावून साधन केल्याने ( तिच्या प्रभावामुळे ) तो पापात लिप्त होऊ शकत नाही किंवा पाप त्याला लिप्त अर्थात् स्पर्श करू शकत नाही. गुरूचा घात अर्थात् हत्या करणारा, मद्यपान करणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीशी रममाण होणारा अर्थात् तिच्याशी व्यभिचार करणारा व अशाच प्रकारची अनेक पातके करणारा साधक या योनिमुद्रेच्या बंधनाने अर्थात् ती सिद्ध केल्यावर त्या पापांमुळे बांधला जात नाही अर्थात् त्या पापांची फ़ळे अशा साधकाला स्पर्श करू शकत नाहीत.

या करिता मोक्षाची आकांक्षा असणार्‍या साधकाने योनिमुद्रेचा नित्य अभ्यास करणे उचित आहे किंवा त्याचे कर्तव्य आहे. या मुद्रेच्या अभ्यासामुळे साधकाला सिद्धी मिळते व त्यामुळेच त्याला मोक्षाची प्रापती होते. अभ्यासामुळेच ज्ञानाची प्राप्ती होते व अभ्यासामुळेच साधकाची योगात प्रवृत्ती होते म्हणजे त्याला योगाभ्यास करावा असे वाटते. अभ्यासामुळे योनिमुद्रा सिद्ध होते आणि अभ्यासानेच वायूचे साधन होते म्हणजे इडा - पिंवलांच्या द्वारा संसारोन्मुख होऊन वाहणारा वक्र किंवा अधो वायू सरळ होऊन तो सुषुम्नामार्गाने ऊर्ध्वमुख होऊन संचार करू लागतो. अभ्यासामुळेच साधक कालवंचना अर्थात् कालाचे उल्लंघन करूं शकतो किंवा कालापासून आपला बचाव करतो. अभ्यासानेच सादह्क मृत्युंजय होतो आणि अभ्यासयोगानेच त्याला वाक्सिद्धी व इच्छेप्रमाणे आचरण करण्याची शक्ती प्राप्त होते. या सर्वाचे तात्पर्य असे कीं, साधकयोग्याने नेहमी आळस सोडून अभ्यासात तत्पर राहिले पाहिजे; कारण सर्व सिद्धींचे कारण अभ्यास आहे किंवा अभ्यासामुळे सर्व सिद्धी होणे संभव आहे.

ही योनिमुद्रा परम गोपनीय म्हणजे गुप्त राखण्यास योग्य अशी आहे. या करिता ही अनधिकारी पुरुषाला कधीही देऊ नहे अर्थात् सांगू किंवा शिकवू नये. जरी प्राण कण्ठाशी आले; तरी सुद्धा ही मुद्रा अनधिकार्‍यास देऊ नये किंवा देणे उचित नाही. ॥२०॥

(  महादेव पार्वतीला म्हणतात ) हे देवी ! आता मी जो योग किंवा योगाचे साधन सांगतो ते साधकाला परमसिद्धी प्रदान करणारे आहे. ( हे योगाचे साधन म्हणजे सिद्धयोग किंवा शक्तिपातयोग असून ) ते परम दुर्लभ आहे म्हणजे शक्तिपातयोगदीक्षा देणारा गुरू या भूतलावर प्राप्त होणे व त्याच्या द्वारा शक्तिसंक्रमण होणे दुर्लभ आहे. जे परमसिद्ध योगी आहेत त्यांनी ही परम दुर्लभ योगविद्या गुप्त ठेविली पाहिजे अर्थात् “ अशिष्याय न देयं ” हे पथ्य सांभाळून सत्शिष्यांना ती देऊन या योगाची धारा अक्षुण्ण ठेविली पाहिजे.

ज्यावेळी सद्गुरूच्या प्रसादाने म्हणजे त्याने परंपराप्राप्त शक्तीच्या द्वारा केलेल्या शक्तिपाताने अर्थात् शक्तिसंक्रमणाने ( अनादि कालापासून निद्रिस्त असलेली ) कुंडलिनी शक्ती जागृ होते; ( त्यावेळी सुषुम्णामार्गाने तिचे ऊर्ध्व संचलन होत असल्याने ) सर्व पद्मांचा अर्थात् मूलाधारापासून सहस्रारापर्यंत असलेल्या सर्व चक्रांचा व सर्व ग्रंथींचा म्हणजे ब्रह्म, विष्णू व रुद्र ग्रंथींचा भेद होतो. याच अर्थ असा की, सुषुम्णेच्या द्वारा प्राणवायू ब्रह्मरंध्रापर्यन्त सरळपणे संचार करू लागतो. त्याची वक्र म्हणजे संसारोन्मुख गती नाहीशी होऊन तो सरळ गतीचा अर्थात् परमात्मोन्मुख होऊ लागतो.

या करिता सर्व प्रकारचे प्रयत्न करून साधकाने ब्रह्मरंध्राच्या मुखापाशीच ( ऊर्ध्व गमनाचा मार्ग अडवून ) झोपलेल्या कुंडलिनी देवीला जागृत करण्याकरिता मुद्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, शक्तिपात करणारा सिद्ध गुरू जर साधकाला प्राप्त झाला नाही; तर त्याने मुद्रादि बाह्य साधनांच्या आलंबनाने अभ्यासपूर्वक ही शक्ती जागृत करणे नितांत आवश्यक आहे. जोपर्यंत ही शक्ती जागृत होत नाही तोपर्यंत साधकाला मोक्षप्राप्ती होत नाही. जागृत कुंडलिनी शक्तीमुळे उपस्थित होणारे अंतरंग साधन हेच अमृतदायक, मोक्षकारक व सिद्धीप्रत नेणारे असून इतर अन्य सर्व साधने ही बाह्य साधने असून ती साधकास चित्तशुद्धीच्या पलीकडे नेण्यास असमर्थ असतात.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP