तृतीय पटल - योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन १

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


मनुष्याच्या हृदयात एक दिव्य कमल आहे. हे कमल दिव्य लिंगानें अर्थात् चिन्हांनी विभूषित झालेले आहे. या कमलाला बारा पाकळ्या असून त्या पाकळ्या क पासून ठ पर्यंतच्या बारा वर्णांनी अर्थात् चिन्हांनी सुशोभित झालेल्या आहेत. ( या पाकळ्यांवर विराजमान झालेले क, ख, ग, घ, ङ्, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, हे बारा वर्ण आहेत. )

या हृदयकमलात किंवा अनाहत चक्रात नानाविध वासनेने परिपूर्ण असलेला किंवा अलंकृत झालेला, अनादि असलेला, कर्माने बांधलेला व अहंकाराने संयुक्त अशा प्राणाचा निवास आहे.

प्राणाच्या वृत्तिभेदाने अर्थात् कार्यभेदाने या शरीरात जे विविध प्रकारचे वायू विद्यमान आहेत. त्यांची नावेही विविध प्रकारची आहेत. त्या सर्वांचे वर्णन करणे आम्हाला शक्य नाही अर्थात् या सर्व वायूंचे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही.

प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, व धनंजय ही प्राणाच्या मुख्य भेदांची दहा नावे आहेत. या शात्रात मी त्यांचे वर्णन केले आहे किंवा शास्त्राधारेच मी ही प्राणांची नावे कथन केली आहेत. हे सर्व वायू आपापल्या कर्माने प्रेरित होऊन शरीरात कार्यरत होतात किंवा त्या त्या कर्माच्या प्रेरणेप्रमाणे कार्ये करतात.

वर सांगितलेल्या दहा वायूंमध्ये पाच वायू मुख्य आहेत. या पाच वायूंमध्येही प्राण व अपान हे दोन वायू अत्यंत श्रेष्ठ कर्ते आहेत असे माझे ( महादेवाचे ) मत आहे.

हृदयात प्राण व गुदेमध्ये अपान राहतो. नाभिमंडलात समान व कंठामध्ये उदानाने स्थान आहे. व्यान हा सर्व शरीराला व्यापून राहतो.

नागादि जे पाच वायू आहेत ते शरीरात उद्गार काढणे, नेत्रोन्मीलन करणे, भूक व तहान लागणे, जांभई येणे व उचकी लागणे ही कार्ये करतात.

या प्रकारे किंवा विधीने अगर मार्गाने जो मनुष्य आपले शरीर हे ब्रह्मांड आहे असे जाणतो अर्थात् शरीरातच सर्व ब्रह्मांड सामावलेले आहे याचे ज्याला ज्ञान होते तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याला परमश्रेष्ठ गती प्राप्त होते अर्थात् सहस्रारात शिवशक्तीचे मिलन झाल्याने असा साधक मुक्त होतो.

ज्या रीतीने अत्यंत शीघ्रतेने योग सिद्ध होतो त्या संबंधी मी  ( महादेव ) आता विवेचन करतो. ही रीत किंवा विधी अगर साधन जाणणार्‍या योग्याला योगसाधनेत कष्ट होत नाहीत. हे सांगण्याचा अभिप्राय असा आहे की, संप्रदाय परंपरेने चालत आलेले योगसाधन विधीपूर्वक जाणून घेतल्यावर संप्रदायाची शक्ती शिष्याच्या शरीरात प्रेरित होऊन कार्यरत होत असल्याने शिष्यसाधकाला कष्ट होत नाहीत आणि विधीपूर्वक परंपरागत साधन प्राप्त न झाल्याने साधकाला कष्ट होतात. ॥१०॥

जी विद्या गुरूच्या मूखातून ऐकली व जाणली जाते ती विद्याच अवश्यमेव वीर्यवती अर्थात् सबल व सफ़ल होते. अन्य प्रकाराने प्राप्त होणारी विद्या म्हणजे गुरुमुखातून न ऐकलेली व न जाणलेली विद्या ही फ़लहीन, निर्वीर्य व दु:खदायक होते. याचा अर्थ असा की, गुरुमुखातून प्राप्त होणारी विद्या ही परंपराप्राप्त शक्तीसहित संक्रमित होत असल्याने ती शिष्याच्या ठिकाणी कुलकुंडलिनीची जागृती घडवून आणते. ही शक्तीच सर्व ज्ञानाची जननी किंवा ती स्वत:च सर्व ज्ञान व विद्या असल्याने तिच्या जागरणामुळे शिष्याची विद्या सबल, वीर्यवती व सफ़ल होते. गुरूने शक्तिपात केल्याशिवाय शक्ती जागृत होत नसल्याने व त्याच्या मुखातून निसृत् झालेल्या शब्दांनीच शक्तिपात होत असल्याने गुरुशिवाय विद्याप्राप्ती होत नाही म्हणजे विद्या सफ़ल होत नाही.

गुरूला सर्व प्रकारे संतुष्ट करून जी विद्या प्राप्त केली जाते त्या विद्येपासून शीघ्र फ़लप्राप्ती होते किंवा ती विद्या शीघ्र फ़ळ देणारी असते. अर्थात् शक्तिपाताने प्राप्त होणारी विद्या फ़ार लवकर सिद्ध होते, तिच्या सफ़लतेला विलंब लागत नाही.

गुरू हा पिता, गुरू ही माता व गुरू हा देव आहे यात काहीच संशय नाही. या करिता कर्म, मन व वाणीने गुरूची सर्व प्रकारे सेवा केली पाहिजे.

गुरूच्या प्रसादाने अर्थात् कृपेने म्हणजे शक्तिपातदीक्षा देऊन केलेल्या शक्तिसंक्रमणाने ( शिष्याच्या ) आत्म्याला सर्व प्रकारच्या शुभ गोष्टी प्राप्त होतात अर्थात् शिष्याला नित्य साधानाने सर्व शुभ गोष्टी प्राप्त होत जातात. या करिता गुरूची नित्य तत्परतेने सेवा केली पाहिजे. अन्यथा शिष्याचे कल्याण होत नाही. अन्यथा म्हणजे अश्रद्धेने सेवा अगर साधन करण्याने शिष्याचे कल्याण होत नाही.

गुरूला तीन प्रदक्षिणा करून त्याला उजव्या हाताने स्पर्श करावा. व नंतर गुरूच्या चरनकमलाला साष्टांग नमस्कार करावा.

श्रद्धावान पुरुषाला अर्थात् साधकाला निश्चितपणे विद्येची सिद्धी होते म्हणजे त्याचे साधन अंतिम शिवशक्तिसमरसीकरणाचा सिद्धीत रूपांतरित होते. जो साधक अश्रद्धावान आहे त्याला सिद्धे कदापीही प्राप्त होत नाही. या करिता साधकाने यत्नपूर्वक ( श्रद्धापूर्वक, निरंतर व अखंड ) साधन करणे श्रेयस्कर व उचित आहे.

सांसारिक व्यवहारात लिप्त असलेल्या मनुष्याची संगती किंवा मैत्री केल्याने अगर जो साधक स्वत:च विषयसुखात रंगून जातो त्याला योगसिद्धी प्राप्त होत नाही किंवा अशा साधकाला योगविद्येच्या सिद्धीचा संभव असत नाही. त्याचप्रमाणे जे साधक अविश्वासी आहेत म्हणजे ज्यांचा साधनावर व गुरूवर विश्वास नाही, जे साधक गुरूची पूजा करीत नाहीत व जे अधिक लोकांशीं संगती करतात अर्थात् ज्यांचा अनेक लोकांशी संबंध असतो त्यांनाही योग सिद्ध होत नाही. जे साधक खोटे बोलतात किंवा असत्य वादविवाद करतात, कठोर वचन बोलतात व गुरूला प्रसन्न किंवा संतुष्ट करीत नाहीत अशा साधकांना कदापीही योगसिद्धी प्राप्त होत नाही.

( गुरूवर व साधनावर नितांत ) विश्वास असणे हे योगसिद्धी प्राप्त होण्याचे प्रथम लक्षण आहे. याचा अर्थ असा की, गुरूकृपेने प्राप्त झालेले साधन म्हणजे विद्या ही निश्चित यशस्वी व सिद्धी प्राप्त करून देईल असा साधकाला विश्वास असणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. श्रद्धा असने हे दुसरे व गुरूपूजनात तत्पर असणे हे सिद्धीच्या प्राप्तीचे तिसरे लक्षण आहे. जीवमात्राच्या ठिकाणी समान भाव ठेवणे हे चवथे लक्षण आहे. इंद्रियांचा निग्रह राहणे हे पाचवे व परिमित भोजन करणे हे योगसिद्धी मिळण्याचे सहावे लक्षण आहे. योगसिद्धीचे अशी ही सहा चिन्हे किंवा लक्षणे आहेत. याशिवाय सातवे चिन्ह नाही. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP