मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
कान्होपात्रा आख्यान २

कान्होपात्रा आख्यान २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ अभंग ॥
नको कस्तुरिचा टिळा । आतां गोपीचंदन भाळा ॥
नको म्याना, घोडागाडी । पायी पहावी भिवराथडी ॥
ओली कोरडी भाकर । जाण देईल शारर्ङ्गधर ॥
करी वासनेची होळी । मुखीं विठ्ठलनामावळी ॥
न अदे अश्रद्धेसी जागा । मनी विष्णुमय जगा ॥
मानी संताचें वचन । अधिक माये प्राणाहून ॥२२॥
कान्होपात्रा शुभ्र वस्त्र नेसली त्या वेळीं ती कशी दिसूं लागली तें पहा.

॥श्लोक (शार्दूलविक्रीडित) ॥२३॥
कान्हो ती बहु शोभली परि तया श्वेतांबर नेसुनी ।
वैशाली दिनपौर्णिमेस विलसे जैसी पहा यामिनी ॥
बहीं भाव तिचा तयावरि दुजी ती कंजकन्या बरी ।
किंवा ती उठली असेल हरि हो भक्तीचिया सागरीं ॥
कान्होपात्रा विरक्त हौऊन वारकर्‍यांबरोबर पंढरीस जाण्यास निघाली.

कान्हो झाली विरक्त । हें कळले जननीप्रत ॥
तै शाभा आक्रंदत । येती झाली ते ठायां ॥२४॥
त्यावेळी कान्होपात्रा वारकर्‍यांच्या घोळक्यांत मोठया प्रेमाने भजन
करीत उभी होती. तिला पाहून शाभा खूप संतापली आणि वारकर्‍यांना
वाटेल तशी बोलू लागली.

॥पद ॥
बर्‍या घातल्या गळ्यांत माळा पोरी फितवाया ॥
टाळकुटय़ांनी अला कशाला, सांगा ये ठांय़ा ।
फितवीली, पोर भली, गप्पा सांगुनिया ॥
तुम्ही तुकडे मागत फिरतां, जिणे तुमचे वायां ।
वाटोळे, हो काळें, तुमचे येथुनियां ॥
एकादशी ती निव्वळ लिहिली तुमच्या नशिबी या ।
हिंजडयासम तुम्हि नाचत फिरतां, टाळ्या पिटुनियां ।
शंख करा, पिटा उरा, बहा पंढरिराया ॥२५॥
शामाचा वारकर्‍य़ांवर अपशब्दांचा भडिमार चाललेला पाहून कान्होपात्रेस
वाईट वाटलें. ती आईस म्हणाली

॥श्लोक ( वसंतलतिका ) ॥
संता नको दुखवु अर्पुनि वाक्शरांते ।
हे मानवां भवनदींतुनी पार नेते ॥
यद्दर्शने दहन होतिल गे त्रिताप ।
हे भेटवीतिल मला विठु मायबाप ॥२६॥
कान्होपात्रेचे बोलणे ऐकून शामा जास्त रागावून कान्होपात्रेस म्हणते,

॥दिंडी ॥
नको अक्कल शिकवूस मला पोरी । भिकार्‍यांची या गाऊ नको थोरी ॥
संगतीने यांच्या न बरे झालें । कुणाचेही जगिं आवजरी बाळे ॥२७॥
शामाने याप्रमाणे वारकर्‍यांनी खूप निंदा केली; परंतु वारकर्‍यांनी त्याकडे
मुळीच लक्ष दिले नाही, व कान्होपात्रेस तेथेच ठेवून श्रीपांडुरंगाचे भजन करीत ते पंढरीला निघाले,

॥ओवी ॥
शामाचे ऐकता दुरूत्तर । संत निघाले सत्वर ॥
लक्षूनियां पंढरपुर । भजन करित हरिचे ॥२८॥
वारकरी आपल्याला टाकून तसेंच पंढरीला निघाले हे पाहून कान्होपात्रा धांवत जाऊन त्यांच्या पुढे आडवी झाली व म्हणू लागली,

॥कटिबंध ॥
पहातां असे धांवली, कान्हो ती भली, लोळु लागली, ।
तयांच्या पायी । सोडितां मला कां योग्य तुम्हां हें नाहीं ॥
ही नव्हे साधुची रति, आणा ध्यानांत, मला समवेत, ।
चला घेऊनी । बाप हो! मुलिस घाला या हरीच्या चरणीं ॥
जरि जाल मला टाकून, तरि मी प्राण, साच देईन, आणा हे चित्तीं ।
गणुदास म्हणे या नावं हरीची भक्ती ॥२९॥
कन्होपात्रेची तळमळ पाहून वारकरी तिला म्हणतात,

॥आर्या ॥
फार बरे चाल मुली, आमुच्यासंगे विठूस भेटाया ।
वैराग्यार्क तुझा नच, जावो, अस्ताचलास टेकाया ॥३०॥
अनीतीमार्गास लावणार्‍या आईचा त्याग करून शेवटी

॥दिंडी ॥
येइ कान्हो यांसवे पंढरीस । राउळी तो पाहिला श्रीनिवास ॥
तिचें चित्तहि तेथून घे न जाया । शिशू आनंदे माय बघूनिया ॥३१॥
श्रीपांडुरंगाला पाहातांच कान्होपात्रेला अतिशय आनंद झाला. तो देवाचे मोठया
प्रेमाने भजन करू लागली. ती देवास म्हणते,

॥पद ॥ (राग-भैरवी, ताल-धुमाळी)
मोरे नंदाजीके लाल तोरी शाम तनु बहु हारी ॥
(चाल) वेद तुमारे जश गुण गावे । ऐसे तुमको दुध पिलावे ॥
गोकुळमो ब्रिजनारीं ।जगत तुमारें लागत पय्यां ।
वो तुम ब्रिजमो चारत गय्या । राधा करत थटोरी ॥
दासि भयी है लछमी तुमारी । सबके कारन तुम गिरिधारी ॥
करे गोरसकी चोरी । दासगून कहे संतन खातर ॥
अब तुम ठाडे पंढरि भीतर । लेउ बलय्या तोरी ॥३२॥

॥गज्जल ॥
कदमोंके पास, आरज करती मैं, ॥
सुननेवाला तूं शहानहा है ॥
(चाल) तूं खुदा, तूं करीम तूं रहीम ॥
खता करना माफ मेरा यहि कहना है ॥३३॥
कान्होपात्रा पंढरीस भजनानंदांत काळ कंठीत असतां,

॥आर्या ॥
मागें मंगळवेढीं, झाला तो बहु तपास कान्होचा ॥
कांकीं तिजवर होता, डोळा तिथील ठाणेदाराचा ॥३४॥
ठाणेदाराच्या मनांत कान्होपात्रेला बेदरच्या बादशाहास नजर करून त्याची मर्जी संपादन करावी असे होते,

॥ओवी ॥
त्याच्या ऐसें होतें मनीं । की कान्होवेदरा नेउनी ॥
नजर करावी शाहालागुनी । मर्जी तयाची संपादण्या ॥३५॥
म्हणून त्यानें कान्होपात्रेच्या स्वरूपाचे वर्णेन करून एक खाजगी पत्र बेदरला पाठविलें.

॥कटिबंध ॥
भूतळी, जाइची कळी, स्वरूप मंजुळी, लाजवी रतिला ।
अशि सकल कलासंपन्न कान्हो वेल्हाळा ॥
अणिदार, जियेचे रदन, मृगीपरि नयन, पाहुनी वदना ।
वाटेल लाज साचार रोहिणीरमणा ॥
बहु भव्य जियेचें भाल, अधर ते लाल, जिच्या नाकाची ।
ठेवण हुबेहुब काय कळी चाफयाची ॥
चालणें जिचे गजगती, गान तें अती, शुध्द सुस्वर ।
तुळलिया जिच्या वर्णास उणें भागार ॥३६॥
पत्रांतील वर्णन कारकुनानें शहाला वाचून दाखविले तेव्हां,

॥आर्या ॥
ऐकुनि स्वरूपवर्णन त्या रमणींचे शहा मनीं घाला ।
घाला नच हो केवळ, नागासम साच डोलता झाला ॥३७॥
कान्होपात्रेच्या स्वरूपाचे वर्णन ऐकून तिच्याविषयी बादशहा अत्यंत
आतुर झाला व त्यानें ताबडतोब तिला आणण्याकरिता शिपायास हुकून केला. तेव्हा शिपाई ताबडतोब मंगळवेढयास जाण्याकरिता निघाले.
॥लावणी ॥
चालले अरब रोहिले शिपाइ चातुर ।
चमचमती भाले तरवारी, कटियार ढाल खंजिर ॥
बंदुकी आणिक जेजाला कराविन हाती ।
घोंडयांच्या वाजती टांपा, सांडण्या उंट धावती ॥
वार्‍याने फडफडती दाढया, जणूं काय खडी ।
सैन्याची निशाणे त्या हो, जय शब्द करी गुडगुडी ॥
हलकारे आणिक चपरासि घाटे बांधून ।
लागले पळाया मागें, पोटाची आग दारुण ॥
भिमथडी तट्टें मजबूत बटकि त्यावरी ।
मेण्यास भोई ते बारा, गुण म्हणे वानुं कुठवरी ॥३८॥
शिपाई, बटकी वगैरे सर्वजण मंगळवेढयास येऊन दाखल झाले. त्या वेळीं कान्होपात्रा पंढरपुरास होती. बादशहाच्या हुकुमाप्रमाणे तिला बेदरला पाठवावयास पहिजे. ही अडचण पाहून ठाणेदार फार घाबरला. परंतु बाजू सावरून धरण्याकरिता मोठ्या नम्रतेने त्यानें बादशहास कळविलें की,

॥गज्जल ॥ ताल-दादरा
लिखनेके लिये, लाचार हूं मै कान्हो यहां नही ॥
बदमाश बडी है हुजूर, वो यहांसे भाग गयी ॥
चंदरोज लवाजमे को यहां रोख लेता हूं ।
मिलतेहि उसे मै बिदरको भेज देता हूं ॥३९॥
ठाणेदारांचे याप्रमाणे पत्र शहास मिळाल्यावर तो फारच आतूर झाला व त्याची पुढीलप्रमाणे स्थिती झाली.
ठाणेदारांचे याप्रमाणे पत्र शहास मिळाल्यावर तो फारच आतुर झाला व त्याची पुढीलप्रमाणे स्थिती झाली.

॥श्लोक (पृथ्वी) ॥
अतूर तृप जाहला म्हणत ये कान्हो कशी ।
करांगुलि करुनिया गणित दीन तो मानसी ॥
अनंगशर झोंबला निज न ये तृपालागुनी ।
सदैव निरखी पथा बसून भव्य वातायनीं ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP