मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
कान्होपात्रा आख्यान १

कान्होपात्रा आख्यान १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
मंगळवेढीं शामा, नामें तीं विश्वयोषिता होती ।
तदुदरीं जन्माला, आली कान्हो न वर्णवे कीर्ती ॥१॥
मंगळवेढें गांवांत शामा नांवाची वेश्या राहत होती. तिची कान्होपात्रा नांवाची एक सुंदर मुलगी होती.

॥ कटिबंध ॥
सुकुमार, असे ती फ़ार, ठेंगणी मूर्ती ।
पाहून वदन तें पडे रतीची भ्रांती ॥ध्रु०॥
ओष्ठ ते प्रवलाप्री, कुटिल कच शिरीं, वक्रशा भ्रुकुटी ।
वाटते मदन ओढून धनू करी वृष्टी ॥
सर्वांग असुनि सुंदर, नेसण्या चिर, जरी जरतारी ।
मंडीत पाच - मोत्यानें तनू ती सारी ॥
कंठ तो बहुत मंजूळ, जणूं कोकीळ, वसंतीं बोले ।
ऐकतां जियेचें गान तें, नाटकी नव्हतें, वानुं कुठवर ।
पर्जन्य पडे गातांच राग मल्हार ॥
करि नित्य अभीनव - नृत्य यौवनें भरली ।
गणुदासवानि वर्णितां तियेला थकली ॥२॥
अशा प्रकारचें कान्होपात्रेचें सौदर्य पाहून गांवांतील गुलहौसी लोक तिच्या घराकडे खेपा घालूं लागले.

॥ आर्या ॥
चैनी, आंबटशोकी, धनिक तियेच्या घराप्रती येती ।
जेवीं मधुरपंक्ती, मधुबिंदू पाहुनी फ़िरे भंवतीं ॥३॥
एके दिवशीं एक वृद्ध श्रीमान् गृहस्थ येऊन कान्होपात्रेस म्हणूं लागले,

॥ पद ॥
स्मर - व्यथा शमवि वेल्हाळे, मी झुरत मनीं तुजकरितां ।
श्रीमंत धनिक मी मोठा, मम होय रमणि तूं आतां ॥
( चाल ) ठेवीन दासि सेवेला । पालखी बसुन जायाला ॥
फ़ुलबाग हवा खायाला ।
अशि छान पर्वणी जाण अली तुज आतां ॥
ना लोटि परिस मी परता ॥४॥
त्या वृद्धाची विषयवासना पाहून कान्होपात्रा त्यास म्हणते :

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
झालास तूं जरठ मी करुं काय तूंतें ।
ना योग्य पर्ण गळल्या चुत कोकिलातें ॥
आतां चिता तव व्यथा शमवील पाहे ।
श्रीविठ्ठला भज तुला यम हांसताहे ॥५॥
याप्रमाणें त्या श्रीमंत वृद्ध गृहस्थाचा कान्होपात्रेनें अपमान केल्यामुळें तो निघुन गेला. धनिकांची अवहेलना केल्याची हकिकत शामास समजली.

॥ ओवी ॥
अवमानितां धनिकांसी । शामा कोपली मानसीं ॥
कारटे अवदसा कैसी । आठवली ही तुजलागीं ॥६॥
शामा रागरागानें कान्होपात्रेस म्हणूं लागली : -

॥ पद ॥
विश्व - योषिता आपण जगाला, योग्य विचारा कांहिं करी।
जरठ तरुण द्विज यवन मुलें बसल्यास करी कां निवड तरी ॥
( चाल ) पाणपोई ती जशि पंथांत ।
तशि गणिका गे या जगतांत । कसें येईना तव ध्यानांत ॥
जटी तापसी यांनिं करीं, घेऊन खरी गे माळ हरी ।
बसुन जपावा वनांतरीं, मुलि योग्य विचारा कांहिं करी ॥७॥
याप्रमाणें शामानें कान्होपात्रेस उपदेश केला; पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. तिला कान्होपात्रेनें उत्तर दिलें :

॥ श्लोक ( द्रुतविलंबित ) ॥
शिकवि ना मज ही अनिती खरी । जडल काच न गे फ़ुटल्यावरी ॥
म्हणुनिया भलत्या मज आग्रहा । करि न गे जननी ! उगली रहा ॥८॥
पुढें एक तरुण गृहस्थ कान्होपात्रेकडे येऊन म्हणूं लागले :-

॥ पद ॥
वश तुवां मला व्हावें । स्मरसम रुप मम अवलोकावें ।
तरुण खचित मी तुज ठावें ॥ध्रु०॥
( चाल ) तरुण - तरुणिचा शोभे जोडा । विबुध रसिक मी नच गे वेडा ॥
व्यर्थ कुतर्का नच घ्यावें ॥वश०॥९॥
त्या तरुणाचें बोलणें ऐकून कान्होपात्रा म्हणते :

॥ श्लोक ॥ ( शार्दूलविक्रीडित ) ॥
पांगारी फ़ुलला फ़ुलें - क्रुनिया जोमांत आला जरी ।
पाचू - चंपक - पारिजात - तरुची, पावेल कां तो सरी ॥
आला कुक्कुट मत्त होउनि जरी, मोरापुढें नाचण्या ।
पावेना परि मान जाण सहसा, चासापुढें तो गण्या ॥१०॥
हें कान्होपात्राचें भाषण ऐकतांच तो तरुण गृहस्थ मुकाट्यानें परत गेला. पुढें तेथील यवन अधिकारी कान्होपात्रेकडे येऊन म्हणूं लागला,

॥ पद ॥
खाहेष हमकु गानेकी, नहि प्यारि समज तेरे तनकी ॥ध्रु०॥
( चाल ) गावोजि गजल ठुमरी तुम् । खुषदिलसे सुनेंगे वो हम्
नहि तुझे करेंगे कुछ कम् । ये देख थैलि रुपयोंकी, नहि प्यारि समज० ॥
याप्रमाणें तो अधिकारीं म्हणत आहे तोंच तेथील एक गुजराथी सावकार त्या ठिकाणीं आला व कान्होपात्रेस म्हणूं लागला :-

॥ पद ॥ ( गुन्हेगारी धन्याची )
तमे गावो गावो आवे गर्भा गावोजी ॥ध्रु०॥
( चाल ) गर्भा गावो झुंबरा गावो टप्पा गावो ख्याल ।
बद्धा गाणा हूं सामळीने तमने आपू शाल ॥१२॥
त्यांचें भाषण ऐकून कान्होपात्रा म्हणते :-

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
गाणें गाउनि मी न इच्छित पहा द्र्व्यास तेवीं चिरा ।
घालावी खरसूकरांपुढति कां नेऊनिया शर्करा ॥
सामाची जगिं होय किंमत खरी गातांच तज्ज्ञापुढें ।
डोंबारी रिझवी करें पिटुनिया ढोलास जा माकडें ॥१३॥
हें तिचें भाषण ऐकूण निरुपाय म्हणून ते दोघे निघून गेले. या प्रमाणें कान्होपात्रा चैनी लोकांना अनीतीपासून व विषयवासनेपासून परावृत्त करीत असे. एकदां वारकर्‍यांचा समुदाय मंगळवेढ्याहून पंढरपुरास जात असतांना त्यांचें अत्यंत प्रेमानें चाललेलें भजन कान्होपात्रेनें ऐकिलें :-

॥ अभंग ॥
रूपें सुंद्र सावळा । जेविं मदनाचा पूतळा ॥
जो कां धनिकांचा धनिक । बाप वैकुंठनायक ॥
अवघ्या कळा ज्याच्या हातीं । जो का भूपांचा भूपती ॥
तो हा चंद्रभागेतीरीं । उभा आहे पंढरपुरीं ॥
ज्याच्या प्राप्तीचें कारण । दिंडीपताका साधन ॥
भावें ‘ विठ्ठल ’ बोलतां । गणू म्हणे येतो होतां ॥१४॥

॥ ओवी ॥
वारकरी ऐसें बोलतां कान्हो धावली तत्त्वतां ॥
करूनियां नमन संतां । लीनवचनीं बोलली ॥१५॥

॥ लावणी ॥
माझि विनवणी, विनवणी हीच चरणीं
मला दाखवा चक्रपाणी ॥ध्रु०॥
बाळ नंदाचा, नंदाचा यशोदेचा
धनी जो दीन अनाथांचा ॥
पंढरीनाथ, पंढरीनाथ दावा
करावी त्याचि कशी सेवा ॥
तीहि हो सांगा कि रमारंगा
भेटवा मजसि पांडुरंगा ! ॥१६॥
कान्होपात्रेचें बोलणें ऐकून वारकर्‍यांना मोठें नवल वाटलें. ते तिला म्हणूं लागले,

॥ कटिबंध ॥
तूं मुळीं विश्वयोषिता, तुझीया चित्ता, विवेक कोठून ।
छानछोकि तसे गुलहौसि तुझे भगवान ॥ध्रु०॥
जा पुजी तया तूं नित्य साधि गे स्वार्थ क्षणिक वैराग्या ।
ना देइ खुळे पोरि तूं मनामधिं जागा ॥
पाहिल्या क्षेत्र पंढरी भक्तिनें खरी नाश विषयाचा ।
होईल तुला तो रुचेल मुळीं नच साचा ॥
चैनीस मिळेल रुक्सत तया क्षेत्रांत विसर मग चीर ।
आचरण्या विठूचें व्रत बहुत खडतर ॥१७॥
वारकर्‍यांचें बोलणें ऐकून

॥ आर्या ॥
ऐकुनि तद्वचना या, कान्होपात्रा मनामधें धाली ॥
शुभ्र - वस्त्र नेसुनिया, जरतारी चीर फ़ेडिती झाली ॥१८॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
टाकी उपानह तसे नग कांचनाचे ।
हे नाशवंत मज योग्य न संग्रहाचे ॥
घाला मला तुलशिची बहुशुद्ध माला ।
न्याहो कृपा करुनिया मज पंढरीला ॥१९॥
कान्होपात्रेला पूर्ण पश्चात्तप झाला. आजपर्यंत झालेल्या गोष्टींबद्दल तिला असें वाटूं लागलें कीं,

॥ लावणी ॥ ( त्यासि द्यावया )
व्यर्थ गोविलें चित्त अजवरी । चैनिच्यामघें सांडुनी हरी ॥ध्रु०॥
शिकुनि गान, तेविं तान आभिमान, विकत पूर्ण घेतला करीं ॥
नाशवंत, वपुहि सत्य, करुनि नृत्य, त्या धनार्थ, झिजविली खरी ॥
द्रव्यवान, पाहुनि मान, केलि लहान, संतचरण चुरिले ना करीं ॥२०॥
कवि म्हणतात : -

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
कुलावरुनि होत ना जगतिं या परीक्षा खरी ।
उसाजवळ वाढल्या महिवरी पहा सावरी ॥
सुरम्य नलिनीप्रती चिखल हाच माता - पिता ।
गुणज्ञ परि ग्राह्य जें धरिति जाण तेंची हतां ॥२१॥
कान्होपात्रेला पूर्ण वैराग्य आलेलें पाहून वारकरी तिला उपदेश करूं लागले.

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP