मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीलाखाभक्त चरित्र १

श्रीलाखाभक्त चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
पयोब्धिनिकटीं असे पुरि पुनित पूर्वेकडे ।
जिचें स्मरण केलिया दुरित वासना ती झडे ॥
बलानुज उभा जिथें स्वजनताप वारावया ।
सुभक्त हरिचा तिथें म्हणति लोक लाखा तया ॥१॥

॥ पद ( तोंवरि तळमळ ) ॥
लाखा कोल्हाटी कोल्हाटी । साथी ज्या जगजेठी ॥ध्रु०॥
हीन कुलामधिं जन्म जयाचा, मोती निघिच्या पोटीं ।
पंकापासुनि कमल, परि तें बसतें हरिच्या मुगुटीं ॥
उच्च नीच हें न ये ठरवितां जातिवरुनि यासाठीं ।
दासगणु म्हणे, सुज्ञ खोबरें घेउनि त्यजि नरवंटी ॥२॥

॥ ओवी ॥
लाखा दरिद्री अत्यंत । एक कन्या तया प्रत ।
जी रूपवती बहुत । वाटे जन्मली रति पुन्हा ॥३॥

॥ दिंडी ।
आली कन्या तारुण्य - भरामाजीं । लोक झटती करण्यास तिला राजी ॥
सुबक सुंदर असल्यास धर्मशाळा । कोण ओलांडुनि पांथ जाय तीला ॥

॥ लावणी ॥
सर्वांग सुबक सुंदरा, फ़िरवि गरगरा, नेत्र जे ।
शत तरुणा भासती । परि त्या कामुक हापापती ॥
( चाल ) नेसली असे जी हीन फ़डकीं काळीं ॥
ना ल्याया जियेला नथ, बुगडी, बाळी ॥
जिचा वदनशशी परी नित तरुणा जाळी ॥
गणुदास म्हणे अस्सला, खुलवायाला, अन्य ना ।
उपयोगासी पडे । पहा तुम्ही विद्युत - मेघांकडे ॥५॥
लाखानें आपल्या मुलीला जवळ घेऊन म्हणावें कीं, बाई ! -

॥ श्लोक ॥
तारुण्य हें तव मुली ! मज फ़ांस वाटे ।
वा नीतिच्या पदपथावरले सराटे ॥
वा हा तुझ्या समज निर्मल वासनेला ॥
आला अही गमत दंश करावयाला ॥६॥

॥ पद ॥ ( नृपममता )
सौंदर्यरत्न हें साचें । उपयोगी ना गरिबाचें ॥
( चाल ) शोभती भव्य हर्म्यांत, एक नृपनाथ, बसवितां त्यांत ।
वडारी, त्याची । कमि होइल किंमत साची ॥ माधवा ॥७॥

॥ लावणी ॥
 सौंदर्य हेंच राजाच्या । कन्येस कां न बा दिलें ॥
वा पारिजात वृक्षाला । त्वां उकिरड्यांत लोटिलें ॥
( चाल ) कौस्तुभ मर्कटाकरीं, दीधल्या हरि, गती
ना बरी । त्याचि होईल । त्यायोगें जीव जाईल ॥८॥
मुलीला उपजतच कंठमाधुर्य लाभलें होतें. सायंकाळीं समुद्रकांठीं जाऊन तिनें मधुर गायन करून आपलें मनोरंजन करावें. अशीच एके दिवशी समुद्रकांठीं बसून ती पुढीलप्रमाणें मंजुळ गीत गात होती -

॥ पद ॥ ( बिहाग ) ॥
मुरलि कशास्तव ही करिं धरली ।
निरस असुनियां तुज प्रिय झाली ॥ध्रु०॥
गुजगोष्टी तूं हिजसी करिसी । परि ती कळवी त्या सकलांसी ॥
योग्य खचित ना ही प्रेमासी । कुठें रसिकता हरी ! तव गेली ॥९॥

॥ ओवी ॥
ती कन्यका ऐशापरी । गायन करितां समुद्रतिरीं ।
तों एक तरुण सामोरीं । येऊन उभा राहिला ॥१०॥
तो तरुण होता. तो राजपुत्र होता. त्याचें मन तिच्यावर बसलें व तो म्हणाला,

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
 रंभोरू ! वरि तू मला मग तुझें दारिद्र्य हें संपलें ।
तारुण्यें तुझिया तनूस रमणीं ! कीं आज श्रृंगारिलें ॥
जाई - मालतिला बहार असल्या भोक्ता तिला पाहिजे ॥
माझीया वचनास मान म्हणुनी त्वां येधवां देइजे ॥११॥
हें त्या राजपुत्राचें भाषण ऐकून ती थोडी चपापली. आपण गरीब व हा राजपुत्र तर श्रीमंत ही गोष्ट लक्षांत घेऊन ती म्हणते -

॥ पद ॥
तुझी माझी संगत केविं घडे ॥ध्रु०॥
लालासन्निध लालडि शोभे । खुलती न सिकता - खडे ॥
सिंह गजाच्या युथीं नसावीं । बुध म्हणती माकडे ॥
दसगणु म्हणे, हंसा चारा । मोतीं, न खाई किडे ॥ध्रु०॥१२॥
तें ऐकतांच राजपुत्र म्हणाला -

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
छे ! छे ! असें वदुं नको भलतेंच कांहीं ।
श्रेष्ठा न हीन दुषवी भुषवीत पाहीं ॥
कौपीन, भस्म, अहि भूषण शंकराला ।
का तो म्हणून जगिं या वद निंद्य झाला ? ॥१३॥

॥ पद ॥ ( भला जन्म )
सोमवंशींच्या शंतनुभूपें आवडीनें पर्णिली ।
कन्यका कोळ्याची गे ! भली ॥
( चाल ) श्रीजगन्नाथ पंडीत पुण्यपावन ॥
धादांत त्यानें ठेविली मुसलमानिण ॥
प्रेम मनापुन जेथें वसतें तेंच धरावें करीं ।
पडवें जुलमाच्या ना भरीं ॥१४॥
पण मुलीनें सांगितलें कीं, “ तूं म्हणतोस तें खरें आहे. पण -

॥ आर्या ॥
स्वतंत्रता ना मुळिं मज, मी माझ्या कीं अधीन पितयाच्या ।
त्याच्या सम्मतिवांचुन गोष्टि न करणें उचीत प्रेमाच्या ॥१५॥
राजपुत्र म्हणाला,

॥ दिंडी ॥
कण्वमुनिच्या त्या शकुंतलेला गे । भूप येउनि दुष्यंत वरी अंगें ॥
तया वेळीं तों कण्व कुठें होता । विचारा या तू गोष्टि आण आतां ॥१६॥

॥ पद ॥
अश्वपतीची सत्त्वशीला । कन्या अशीच धजली ॥
सत्यवाना शोधण्यासी । निजांगें वनांत गेली ॥
तूंही करी अतां तैसें । योग्य मजसि हेंचि दीसे ॥
तुझ्याविण ना सुचे कांहीं । तरु मी, तूं होइ वेली ॥१७॥
तें ऐकून मुलगी म्हणाली,

॥ पद ॥ ( कधिं तिला )
वदुं नको वृथा ऐसें । मी भूपतिची मुळिंच नसे ॥
( चाल ) कीं कन्या, जगमान्या, शकुंतला, सावित्री ॥
करुं तरी मग मि कैसें ? ॥१८॥

॥ ओवी ॥
ऐसें तयासी बोलुन । गेली कन्यका निघोन ॥
तिच्यायोगें तो तरुण । विरहें पोळला मानसीं ॥२९॥
लाखाची मुलगी निघून गेली. तें पाहून तो तरुणही निरुत्साही होऊन आपल्या मित्र मंडळीसह राजवाड्यांत गेला. ती मुलगी कोठें रहाते, कोणाची आहे वगैरे तपास केला, तेव्हां त्याला कळलें कीं, ती एका कोल्हट्याची मुलगी आहे व तिचा बाप खेळ करून पोरीसह आपलें पोट भरीत असतो. असें कळतांच त्या तरुणानें आपल्या सेवकास पाठवून त्या लाखा कोल्हाट्यास खेळ करण्यास मुलीसह येण्यास सांगितलें. सेवकानें ताबडतोब जाऊन लाखास निरोप कळविला; तेव्हां त्या लाखानें सांगितलें कीं,

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
अन्यत्र ना मदिय खेळ कुठेंच होई ।
या राउळाविण, तुला कथुं वर्म कांई ॥
येथेंच तिष्ठत सदा यजमान माझा ।
देवाधिदेव हरि हा यदुराय राजा ॥२०॥
“ महाराज ! मी या जगन्नाथमंदिराशिवाय कोठेंहि खेळ करीत नाहीं. ” राजपुत्राची वृत्ति चंचल झाली. त्या मंदिरापुढेंच येऊन खेळ पहाण्याचें त्यानें ठरविलें; आणि आपल्या लवाजम्यासह खेळ पहाण्यास येऊन बसला. तें पाहून लाखाला समाधान झालें. त्यानें मोठ्या अदबीनें राजपुत्रास मुजरा करून म्हटलें कीं,

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP