अंक पहिला - भाग ८ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


विट : ( मनांत ) वाहवा, जी गोष्ट मनांत ठेवायची तीच हा मूर्ख उघड करुन बोलतो . काय म्हणावे याला ! असो. वसंतसेना चारुदत्तावर अनुरक्त झाली असे हा म्हणतो, योग्यच झालें . रत्नापाशीं रत्न गेले . ( उघड ) काय रे, कोणीलीपुत्रा, काय म्हणतोस ? जवळच डाव्या हाताला चारुदत्ताचें घर आहे ?
शका० : अरे हो - हो ! हा वरपुरुष कधी खोटे बोलला आहे का ? अरे , हें बघ , जवळच डाव्या हाताला त्याचें घर आहे.
वसंत० : ( मनांत ) फार चांगले झाले, डाव्या हाताला त्याचे घर आहे असें हा म्हणतो हें जर खरें असेल ,तर हा दुष्ट अपकार करीत असतां , याने हे घर दाखवून माझ्यावर उपकारच केला असे मी समजेन, कारण याने माझी आणि माझ्या प्रियाची गांठ घातली.
शका० : अरे विटा, उडदाच्या ढिगांत जशी काजळाची गोळी दिसत नाही, तशी ही वसंतसेना ही वसंतसेना ,दिसतां दिसतां एकदम दिसेनाशी झाली . किती रे काळोख हा !
विट : खरेंच .
पद -- ( चाल -- शैवाले युक्त जैसे. )
नभ वर्षे तिमिरधारा भूवरिसें दीसतें ॥
उघडे हे नेत्र माझे परि मिट्ले वाटतें ॥
दृष्टीची शक्ती सारी बघ येथे लोपते ॥
जैसी ती कुजनसेवा निष्फलता पावते ॥
शका० : विटा , आतां मी वसंतसेनेला शोधून काढतो.
विट : अरे , पण तिची काही खूण आहे का ?
शका० : खूण ? ती कसली बरें ?
विट : तिच्या अंगावरील भूषणांचा शब्द किंवा फूलांचा सुगंध .
शका० : नाकास फुलांचा वास ऐकूं येतो , पण अंधकाराने हे माझे कान भरले आहेत ,म्हणून भूषणांचा शब्द काहीं स्पष्ट दिसत नाही. ?
विट : अगे वसंतसेने ,
साकी
मेघाच्छादित चपलेसम तूं नच दिससी कवणाला ॥
पुष्पगंध तव नूपुररवहि सुचविल परि तो तुजला ॥
ऐके चतुरवरे ॥ माझें वच हें उमज खरें ॥
शका० : अरे , असे रागाने बोललास तर ती भिऊन जाईल रे . ’
वसंत० : हो खरेच. ( नुपूर वगैरे काढून हातात घेते व फुले एकीकडे फेकून देते. ) हे काय ! भिंत चाचपतां चाचपता हें परुसदार माझ्या हाताला लागले वाट्तें ? हो दारच ; हे बंद आहे . पण -
( हातात दिवा घेऊन रदनिका प्रवेश करते. )
वसंत० : अगबाई ! माझ्या नशिबाने दार तर उघडले ,पण या दिव्याला काय करावें ? ( पदराने दिवा मालवून आत जाते )
मैत्रै० : ( प्रवेश करुन ) अरे , दिवा कशाने गेला ? रदनिके , घालविलास दिवा !
रदनिका : मी काय करु ? वारा आला आणि गेला .
मैत्रै० : बर तूं बाहेर उभी रहा , मी चौकातून दिवा घेऊन येतो. ( जातो .)
शका० : विटा , आतां मी वसंतसेनेला शोधून काढतो.
विट : हं काढ .
शका० : ( इकडेतिकडे चांचपून ) विटा ,धरली रे धरली .
विट : हा मूर्खा ,धरलीस काय ? मी तो - विट !
शका० : तूं विट का ? तर हो एकीकडे . ( पुन: शोधून ) धरली रे धरली ,आतां मात्र खास धरली !
चेट : महाराज , ती नव्हे चेट है ह्यो .

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP