अंक पहिला - भाग ६ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


वसंत० : आर्या विटा, मी अबला स्त्री आहे.
विट : म्हणूनच जिवंत राहिलीस .
शका० : आणि म्हणूनच मेली नाहीस !
वसंत० : याचे दयेचे भाषण ऐकून देखील मला भयच वाटते. ( उघड ) आर्यश्रेष्ठा ,या तुमच्या करणीवरुन मला असे दिसते की , माझे हे अलंकार घ्यावे असे तुमच्या मनात आहे.
विट : छे-छे , असे मनातदेखील आणूं नकोस.अगे बागेला शोभा देणारी जी लता तिची फुले का कोणी तोडितो ? तुझे अलंकार आम्हाला काय करायचे ?
वसंत० : तर मग हें काय असे करितां ? मनांत तरे काय आहे तुमच्या ?
शका० : अग मी सांगतो . मी वरपुरुष, मनुष्यवासुदेव , थोर म्हणून माझ्या मनांत जो हेतु आहे , तोच तूं पूर्ण करावा , हेंच आमचें म्हणणे आहे आणि दुसरे गे काय ?
वसंत० : (रागावून ) शिव - शिव ,काय बोलतोस हें ? हो एकीकडे , हें बोलणे तुला शोभत नाही.
शका० : मित्रा विटा , ही कलावंतिणीची पोरटी मनांतून या वरपुरुषावर सुप्रसन्न होऊन म्हणते,’ एकीकडे चल ’ आणि म्हणते , तूं थकला आहेस,भागला आहेस . ’ खरेंच गे वसंतसेने ,तुझ्या पाठीस लागलागून मी अगदी दमून थकून गेलो आहे ,हे तूं खरें ओळखलेस.
विट : ( मनांत ) वाहवा ! ती काय बोलली आणि हा मूर्ख काय समजला ! ( उघड ) वसंतसेने , तूं हें वेश्यापणाला अगदी विरुध्द बोललीस. -
साकी
तनुविक्रय तूं करिसि धनास्तव योग्य न हें मग तुजला ॥
तरुण सधन जन येत असावे नित्यचि निज सदनाला ॥
मनिं हें दृढ वाही ॥ प्रिय अप्रिय जन सम पाहीं ॥१॥
-आणखी पहा -
पद - ( चाल - कैसा बनायाबे )
शुद्र विप्रवर मूर्ख चतुर नर स्नान कराया जाती ॥
एका वापीमधें म्हणूनी कां दोषास्पद ती होती ॥
तैसी सुंदर तूं गणिका ॥ भोग्या अससि सर्व लोकां ॥१॥
विप्र क्षत्रिय वैश्यहि एका नौकेमाजीं बसती
मयुर वायस एक लतेवरि बैसुनि विश्रम घेती ॥
तैसी सुंदर तूं गणिका ॥ सेव्या अससि सर्व लोकां ॥२॥
वसंत० : अरे , गुण हाच प्रीतीला कारण आहे, बलात्कारानें प्रीती होत नाहीं समजलास ?
शका : अरे मित्रा विटा , कामदेवाच्या उत्सवासाठी बागेंत यात्रा जमली होती , त्या दिवसापासून ही गर्भदासी ,त्या भिकारड्या चारुदत्तावर अनुरक्त झाली आहे आणि म्हणून माझ्यावर सुप्रसन्न होत नाही. पण सांभाळ बरें ! त्या चारुदत्ताचे घर जवळच डाव्या हाताला आहे ; तर ती तुझ्या हातून सुटून् जाणार नाही असे कर आणि माझ्या हातून सुटून जाणार नाही असेहि कर.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP