अंक पहिला - भाग ५ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


विट : वसंतसेने , तूं मुकाट्याने उभी रहा, माझ्यापुढे किती बरें पळशील ?
शकार : मित्रा विटा , हिच्या भूषणांचा झणझण , खणखण असा गोड आवाज ऐकू येतो नाही बरें ? वसंतसेने , रामाला भिऊन जशी द्रौपदी पळाली तशी तूं मला भिऊन पळून जातेस काय ? बरें आहे. --
श्लोक
विश्वावसूची भगिनी सुभद्रा ॥ नेली जशी मारुतिनें समुद्रा ॥
तशी तुला मी धरितों पहा गे ॥ जातीस कोठें फिर शीघ्र मागें ॥१॥
चेट : अग ए वसंतसेने , ह्ये आमचं महाराज , राजाच्या लई मर्जीतली हायती. अस येड्या बायकुवानी काय करतेस ? येना राजी झालीस तर तुज ग काय ग्येलं ? आयतं रगडून मांस खायला मिळेल , दागिनं बी गावत्याल , अन ह्ये बघ -
लावणी
तरनि जान तूं बिजलीवानी , पोपट आमच धनी, होऊन बस ग मैना रानी ॥१॥ लइ गुलहौसी गडि मर्दानी ॥ तुजीबि भरजानी, आली रंगाला , अग नागिनी ॥२॥ नग भरगड्या झुपका नथनी, घालून मुरका हानि , मार पदर मग खुप साजनी ॥३॥
शका० : अगे वसंतसेने , रानात जसे कुत्रे कोल्हीच्या पाठीस लागतात, तसे आम्ही तुझ्या पाठीस लागलो असतां तूं माझे हृदय चोरुन पळून जातेस काय ?
वसंत० : अगे पल्लविके ! अगे परभृतिके !
शका० : ( भय पावून ) अरे मित्रा विटा , कोणे माणसे आली रे माणसें आली.
विट : थांब , मी ऐकतो.
वसंत० : माधविके , अगे माधविके !
विट : हा मूर्खा , अरे ती आपल्या दासींना हांक मारीत आहे .
शका० : काय , ती बायकांस हांक मारीत आहे का ?
विट : तर काय !
शका० : अं : ! एक सोडून शंभर बायकांस का हाका मारीना ! मी या मोठ्या सोट्याने त्या सर्वास ठार मारीन.
वसंत० : ( जवळ कोणी नाही असें पाहून ) अगबाई ! कोणीच जवळ नाही ! या दासी चुकल्या वाटतें . तर आतां तेथे मीच आपले रक्षण करावे, असे झाले .
विट :शोध ,शोध ,आपल्या दासींना आणखी शोध .
शका० : वसंतसेनेने ,तूं पल्लविकेस हांका मार , परभृतिकेश हांका मार,पाहिजे तर सार्‍या वसंतमासाला हांका मार ! पण मी तुझ्या पाठीशी लागलो असतां तुला कोण सोडवितो पाहूं -
श्लोक
तो भीम कीं तो जमदग्निपुत्र ॥ कीं येउं कुंतीसुत पंचवक्त्र ॥
तुझा पहा मी बुचडा धरीतों ॥ दु:शासनाची करणी करीतों ॥१॥
- वसंतसेने, अशी जर धडपड्लीस तर या तीक्ष्ण तरवारीनें तुझी मानच कापीन बघ ! (हसून ) अगे ,अशी भिऊं नकोस ; अशी घाबरु नकोस; मुकाट्याने वश हो . अगे , काळाला आमंत्रण करुन कशी वांचशील बरें ?

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP