अंक पहिला - प्रवेश ३ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


[ दुर्गा सासर्‍याच्या वाड्याकडे चालली असतां मागून तुळाजी येतो. ]
तुळाजी -- अरे ही आमची भावजय ! पोराला कडेवर घेऊन कुणीकडे निघाली बरें ! ( जरासा पुढें जाऊन ) अरे ही आमच्याच वाड्याकडे वळली. हं ! समजलों. ही बाबासाहेबांकडे तोंड पसरायला जात असेल. ठीकच आहे ! पोटांत आग पेटली म्हणजे कुर्रा कसा राहणार ! बरें आहे जा म्हणावें ! तोही म्हातारा पक्का खप्पी आहे ! तो हिला आणि हिच्या कारट्याला एक क्षणभर देखील दारापाशीं उभें राहूं द्यायचा नाहीं. मीही पण मागच्या दरावाजानें आंत जाऊन बसतों. म्हणजे काय काय मजा उडेल ती ऐकायला सांपडेल. ( असें म्हणून झटकर जातो. पुढल्या दरवाजापाशीं जाऊन पोहोंचते. )
दुर्गा -- अग बाई ! हा तर बंद केला आहे ! देवा ! आमच्या आजाणपजांच्या वेळीं श्रीमंताच्या घरीं आंधळ्यापांगळ्यांना, दीन अनाथ माणसांना सदा मुक्तद्वार असे म्हणून सांगतात तें काय तर मग ! ती धर्मबुद्धि आतां कोणीकडे गेली ? धर्मात्मा कुणी राहिलाच नाहीं का ? नाहीं तर मेला माझ्याच फ़ुटक्या नशिबाचा हा खेळ म्हणावा झालें ? ( दारावर हळूच धक्का मारते. ) कुणी आहे का ? दार उघडा.
मुलगा -- ( कडेवरूनच दरवाज्यावर भराभरा हात आपटीत ) अले दाल उघल किले.
[ काळ्या गडी दिंडी उघडून बाहेर येतो. ]
काळ्या -- काय कार है इचिभन ! उगिच का लावलिया पिरपिर आं ? जनुका कुणी अवतनच धाडल व्हत ! आमच धनी कस हैती तुला दकल न्है व्हय ? हत कोन तुला येबी म्हन्नार न्है न् कायबी न्है. का आल का ध्यानांत ?
दुर्गा -- कां बाबा ! पण तुझे धनी घरांत आहेत का ?
काळ्या -- माज धनी घरांत हैति. कां ?
दुर्गा -- जिवाजीराव कुंभे इथेंच राहातातना ?
काळ्या -- व्ह व्हय. हतच र्‍हात्यात. त्ये माज धनी न् मी त्येंचा चाकर. पन् बाई त्येची चवकशीं तुला कशापायी ?
दुर्गा -- कशापायी म्हणजे ! तुला नाहीं का ठाऊक मी कोण ती ?
काळ्या -- मला न्है बा ठाव. तुला कंधीं बगितल्यावानी वाटतया. पन् आमी पडलों चाकरमानस, तवा अमास्नी कुनाची वळख असली तरी बी न्है म्हन्न भाग पडतया. का म्हुन् न्है इचारलस ?
दुर्गा -- कां बरें ?
काळ्या -- का बर म्हंजी ? आम्हासनी धन्याची खेटर बसत्यात म्हुन्. ( असें म्हणून दिंडी झांकूं लागतो. इतक्यांत बाहेरून कोंडाऊ या नांवाची दुर्गाची कुळंबीण येते. )
कोंडाऊ -- हं दिंडी लावूं नकोसरे. मेल्या देवानें तुला सोन्यासारखें तोंड दिलें आहे, नि असें घाणेरडें काय बोलतोस तें ? मी आपली इथें बाजूला उभी राहून ऐकत होतें. म्हटलें काय काय बोलतो तें तरी पाहूं. चांगलें सुधें बोललास तर नांवाला डाग लागेल वाटतें ? ही बाई कोण म्हणून समजलास तूं ! ( काळ्या तिच्याकडे रागानें बघतो. )
दुर्गा -- तूं आलीस म्हणून बरें झालें. नाहीं तर यानें कांहीं माझी दाद लागूं दिली नसती. दिवस फ़िरले म्हणजे चाकरमानसें सुद्धां फ़िरतात बरें !
कोंडाऊ -- या माझ्या सोन्याच्या तुकड्याला आंत जायला अटकाव म्हणजे काय ! ( मुलाचा मुका घेते. ) बाईसाहेब, तुम्ही चला आंत. ( दुर्गा आंत जाते. ) काळ्या, तुला किनई अगदीं कळत नाहीं. आडदांड कुठला ! कुणाला काय म्हणावें न् कुणाशीं कसें वागावें, हें आतां तरी नीट ध्यानांत ठेव.
काळ्या -- अग उग बस ! तुला मी मागपुन् वळकुन है. तुला अदुगर कोनी हटिकल व्हत ? गुमान आल्या वाटन जाव, त्ये दुसर्‍याचं कोरड्यास ढवळायची तुला का जरूर ? तूं म्हन आंत जा ! बाबासाइबाची खेटर बसत्याल मला. तिला भाइर काढतीस का मी धरूं रट्याला ?
कोंडाऊ -- असें बोलूं नये काळ्या. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या वडील सुनेला, नि तिच्या मुलाला आंत जाऊं दिलें नाहींस, तर लोक शेण घालतील कीं तुझ्या तोंडांत ! घरच्या माणसांना कारे कोण आडिवतें ?
काळ्या -- मग कस कर म्हन्तीस ? आमी पडलो हुकमाची मानूस. तवा हुक्मापरमान् वागाय व्हावे. बर, पन् ही बाई कशापायीं आलिया हत ! कंच काम है ? माज्या आदुगर तूं या वाड्यांत र्‍हायली व्हतीस म्हुन् इचारतो. ही चांगली, अस जर सार जन म्हन्त्यात इक्त असून शेनी हिच्या सासर्‍यान - मंजी आमच्या बाबासाइबानीं हिच अस का हाल मांडल्याती ?
कोंडाऊ -- हं तें मी सांगतें. तुला ठाऊकच आहे कीं, मी कांहीं तिखटमीठ लावून सांगणारी बायको नव्हें. जें आहे तें थोडक्यांत, पण खरें खरें तेवढें सांगतें.
काळ्या -- हं सांग तर. तूंबी लइ गमती म्हातारी हैस !
कोंडाऊ -- मेल्या अजून चाळिशी सुद्धां उलटली नाहीं, नि इतक्यांत मी म्हातारी झालें कारे ?
काळ्या -- बर र्‍हायल ! तरनी जान् फ़टाकडीवानी हैस झाले ? पन् म्होरं सांग.
कोंडाऊ -- बरें तर ऐक. तुझ्या बाबासाहेबांचा थोरला मुलगा चंद्राजीराव म्हणून होता. त्याच्यावर बाबासाहेब अगदीं जीव कीं प्राण करीत असत. तोही पण रूपानें काय, गुणांनी काय, खरोखर वाखाणणी करण्यासारखा होता. एखाद्या राजाच्याच पोटीं यायचा, पण नशीब खोटें म्हणून यांच्या पोटीं आला होता इतकेंच. तेव्हां काय झालें - हो - किती झालें तरी मेली पोरबुद्धि कीं नाहीं ! त्या चंद्ररावानें आपल्या इष्टमित्रांना न विचारतां बाबासाहेबांचेंही भय न बाळगतां, या दुर्गाबरोबर आपल्याच हट्टानें खेड्यांत जाऊन लग्न केलें.
काळ्या -- कस म्हत्लस, हट्टान ! छे ! ह्ये तर त्येनी लइ वंगाळ काम क्येल. मी म्हन्तो तिची तरी कबुली घ्येवी की न्है ?
कोंडाऊ -- तसें नव्हेरे. तिची कबुली होती. पण तिला आई नाहीं, बाप नाहीं. तेव्हां तिच्याकडून हुंडापांडा काय मिळणार ? म्हणून बाबासाहेबांच्या मनांतून तिला आपली सून करून घ्यायचें नव्हतें. समजलास !
काळ्या -- हां ! आल ध्येनांत. इचिभन समदीं भाण्ड्रण पैशापायीं ! ह्योच हंडाभर हुंडा घावला असता, मंजी बाबासाब खुस झाल असत. कैकाड्रनीवाणी असती तरी बी तिला त्यांनीं आपली सून करूनशेनी घेतली असती ! बर म्होरं ?
कोंडाऊ -- म्हारे काय कपाळ ! आपल्या मुलानें आपल्यास विचारलें देखील नाहीं म्हणून बाबासाहेबांची त्याच्यावर खप्पा मर्जी झाली. पुन: तोंड देखील पहायचा नाहीं म्हणून त्यांनीं खंडोबापुढें शपथ वाहिली. नाहीं तर त्याच तुळाजीरावाला पाहून बाबासाहेबांच्या तळपायाची तिडीक मस्तकाला जात असे. बरें ! पण मेलें कायसें म्हणतात किनई त्यांतली गत. मी म्हणतें इतकें करून तरी त्यांचा राग जावा कीं नाहीं ! पण म्हातारपणचा राग तो ! सरकाराचे कान फ़ुंकून शेवटीं चंद्ररावाला जवरदस्तीनें लढाईवर धाडला, तो बिचारी तिथेंच आपटला ! झालें. आपटलें रामायण न् काय ?
काळ्या -- अरेरे ! गरीब परानी ! बर म्होरं ?
कोंडाऊ -- पुढें इच्याच पयागुणानें तो मेला, असें म्हणून तिला वाडा बंद केला.
काळ्या -- बग इचिभन कसा वाकडा इनसाब ह्यो ? नवर्‍यापायीं त्येच्या बायकुच हाल. लई दिस मी हिला अशीच बगतुया.
कोंडाऊ -- त्यांतून तरण्या ताठ्या बायकांनीं नवर्‍याशिवाय दिवस काढायचे म्हणजे फ़ार कठीण आहे बाबा. कुणावर असा प्रसंग येऊं नये एवढेंच खरें.
काळ्या -- अग त्ये बग, बाबासाब आन् ती तुझी बाई बोलत्याती. जा वाईच बाजूला उभी र्‍हा जा. मी बी सद्रवर बसतों. ( असें म्हणून दोघेंही जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP