मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री भक्त गोराकुंभार चरित्र १

श्री भक्त गोराकुंभार चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
कुलालवंशीं झाले गोरोबा भक्त तेरढोकींत ॥
परिसा तच्चरितासी ज्या श्रवणें हो तराल भक्तनदिंत ॥१॥
संत - समुदायांत गोरोबांना काका म्हणत. गोरोबाकाका गृहस्थाश्रमी होते.

॥ दिंडी ॥
करुनि अपुला व्यवसाय कुलालाचा । ओढि गाडा जनरीति प्रपंचाचा ॥
परी रसना रत सदा रामनामीं । घडी भजनाविण जाइना रिकामी ॥२॥
भजन तर सारेच करितात. परंतु

॥ ओवी ॥
तयाचे ना लौकिकीं भजन । भजनीं हरपें देहभान ॥
मी करितों काय, आहे कोण । हीहि स्मृति नुरतसे ॥३॥
शिवाय -

॥ पद ( भेटीव मला झणिं ) ॥
मूर्तिमंत ती धनहिनता त्या नांदतसे सदनीम ।
कुंभाराचें वतन, विचारी गांवीं नच कोणी ॥
( चाल ) परि त्याची, नच खंती, लव चित्तीं, वाटत ती ।
ऐहिक सुखाला देऊनि फ़ांटा निमग्न हरिभजनीं ॥४॥
एक दिवस,

॥ ओवी ( जात्यावरची ) ॥
घेऊनिया घागर शिरीं । जाइ पाण्यासी सुंदरा ।
म्हणे, ‘ खेळत माझें इथें । तान्हे, सांभाळा त्या जरा ’ ॥५॥
इतकें सांगून ती पाण्याला निघून गेली. इकडे गोरोब चिखल तुडवीत होते. त्या गार्‍यापाशीं तें मूल रांगत आलें; व

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
चिरडुनि मृत झालेम मूल पायतळीं तें ।
परि न स्मृति तयाला गातसे विठ्ठलातें ॥
भरुनि जल घटासी कामिनी शीघ्र आली ।
सदनिं शिशु दिसेना; घाबरी फ़ार झाली ॥६॥
तिला घरांत मूल दिसेना, म्हणून ती गोरोबाजवळ आली. तों,

॥ दिंडी ॥
चिखल पाहुनि तो व्याप्त अशुद्धानें । कामिनी ती पिटि भाल निजकरानें ॥
म्हणे, ‘ लागो भजनास आग बाई ! । मूल मेल्या !  मारिलें करूं काई ? ’ ॥७॥
नवर्‍याच्या अशा वेडेपिसेपणाला विठोबाच कारण आहे, म्हणून ती त्यावर रागावली.

॥ आर्या ॥
पंढरिचा हा काळा आहे प्रत्यक्ष काळ संसारा ।
प्रापंचीक जनांनीं, याचा घेऊं नये कदा वारा ॥८॥
या शिव्यागाळीनें गोरोबा देहभानावर आले; तेव्हा त्यांना झालेले वर्तमान कळलें. मेलेल्या मुलाविषयीं शोक करीत असलेल्या कुटुंबाचें शांतवन करण्याच्या हेतूनें ते म्हणतात,

॥ पद ॥
ना मूल सखे, ! मृत झालें । आलें जेथुन तेथें गेलें ॥ येधवां ।
हीं मांस हाडें तन्माती । या मातिंत मिळलीं बघ तीं ” ॥
( चाल ) सुंदरी म्हणुनि ना करी, शोक तिळभरी, सखा श्रीहरी ।
जगत्रायिं भरला । गणु म्हणे भिमातटवाला ॥ पाहि गे ॥९॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
मरण नच जिवाला ती असे सर्व भ्रांती ।
ठकवित परि माया मानवां जाण गे ! ती ॥
म्हणुनि भ्रमित ऐसी गे ! सखे ! तूं न होई ।
स्थलिं स्थलिं भरलीसे माय माझी विठाई ॥१०॥
गोरोबाच्या या तत्त्वज्ञानानें बायकोला समाधान वाटण्याच्या ऐवजी उलट तिचा संताप वाढला. त्या भरांत ती म्हणते,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
आग लागो ज्ञाना तुझ्या । मूल मातीला मिलविलें ।
कशि विसरूं, पोटीं तया । नऊ महिने म्यां वाहिलें ॥११॥
गोरोबाच्या निमित्तानें सार्‍या संतांवर तोंडसुख घेण्यास तिने आरंभ केला.

॥ पद ॥ ( अजि अक्रुर )
कसे जाती ना मुडदे या संतांचे । जे जपती विठ्ठल वाचें ।
नसे मेल्यांना लाज तिळभरी बाई । विठुविण ना रुचते काई ॥
( चाल ) धन दारा मुलगे गोत । त्या ठायिं न रमते चित्त ।  
सन्मान त्या विषवत
जगिं दगडाच्या सम कीं जीवित यांचें । नको पाहणें मुख मेल्यांचें ॥१२॥

॥ ओवी ॥
संत - निंदा ऐकतां श्रवणीं । गोरोबा संतप्त झाले मनीं ।
थापटणें करी घेउनी । मारायासी धांवले ॥१३॥
गोरोबा आपणांस खरोख्रच मारणार हें पाहतांच त्या बाईनें प्रसंगावर युक्ति पण युक्ति शोधून काढिली.

॥ दिंडी ॥
पंढरीच्या विटेवरिल खविसाची । शपथ तुजला त्या डामर्‍या विठ्याची।
तनुस माझ्या लावूंस नको हात । तरिच काळ्याचा शोभशील भक्त ॥१४॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
कांतेनें अशि घालितां शपथ त्या आनंद झाला मनीं ।
बोले, ‘ फ़ार बरें समूळ सुटलों तापत्रयापासुनी ॥
आहे ही अवघी कृपा मजवरी त्या विठ्ठलाची खरी ।
ज्यानें भीमरथी - तटीं वसविली बोलें गणू पंढरी ’ ॥१५॥

॥ आर्या ॥
ग्रामीं पुकार झाला गोरा कुंभार भ्रमित कीं झाला ।
ज्यानें चिखलामाजीं भ्रांतीनें बाळ साच तुडवीला ॥१६॥
शपथेमुळें गोरोबांनीं संसारसुखावर पाणी सोडलें, इतकेंच नव्हें तर,

॥ पद ( भला जन्म ) ॥
केली शय्या पृथक तयानें त्या दिवसापासुनी ।
बुधहो ! टाकुनिया कामिनी ॥
पहा संताचें मन हें कैसें निश्चल शैलापरी ।
म्हणुनि त्या वश झाला श्रीहरी ।
( चाल ) मद लोभ ज्यापुढें थरथर कीं कांपती ।
कामास वाटतें भय ज्या पाहुनि चित्तीं ।
म्हणुन तयाचा चाकर होउन राबतसे श्रीहरी ।
गणु म्हणे श्रेष्ठ संत भूवरीं ॥१७॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
एके दिनीं रजनिनाथ नभीं उदेला ।
त्याचा प्रकाश पडतां, तम तो निमाला ॥
वाहे समीरण सुगंधित शीतसाही ।
झाली तयीं रमनि ती स्मरविव्हला ही ॥१८॥

॥ ओवी ॥
गोरोबाचे चुरितां चरण । महाराज उठले खडबडोन ।
कांतेप्रती पाहून । साष्टांग दंडवत घातलें ॥१९॥

॥ दिंडी ॥
माय माझी झालीस तूं सुशीले । म्हणुनि आतां नच करी असे चाळे ॥
मला प्राणाहुन अधिक असे साची । शपथ रंभोरू ! सावळ्या विठूची ॥२०॥
हें भाषण ऐकून बाई तर आश्चर्यानें थक्कच झाली. उलट नवर्‍याच्या वेडेपणाबद्दल हंसून ती म्हणत्ये,

॥ आर्या ॥
क्रोधांतिल, प्रेमांतिल जें भाषण खरें न मानावें ।
त्यांतुन मी अज्ञानी, अबला दुर्बल मनांत आणावें ॥२१॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
सूर्यानें जल शोषितां निजकरें संतप्त झाली धरा ।
देवा तोड त्वरें वदलिसें या भास्कराच्या करा ॥
हें का न्याय तिचें वदा वचन हो ! जें बोलली मेदिनी ।
प्रेमावांचुन क्रोध ये नच कधीं ही खूण बांधा मनीं ॥२२॥

॥ कामदा ॥
शपथ वाहिली भोवल्यावरी । ती कशी अतां विसरलां तरी ॥
अग्नि - ब्राह्मणां साक्ष ठेविलें । पदरिं तुमचिया मजसि बांधिलें ॥२३॥
गोरोबांनीं तिचें सारें म्हणणें ऐकून घेतलें आणि निर्वाणीचें उत्तर दिलें.

॥ पद ॥
त्या शपथेचें महत्त्व आतां उरलें नच कांहीं ।
त्यानंतर ही नवी घातली तूंच मला पाहीं ॥
( चाल ) म्हणुनियां, मज वायां, ये ठायां, शिणवायां
प्रवृत्त होऊं नको, तुला नच ये यश तें कांहीं ॥२४॥
या उत्तरानें तिच्या मनाला धक्काच बसला व आपण संसारसुखाला खरेंच आंचवलों असें वाटून ती दु:खाच्या भरांत पुन्हां देवावर संतापली.

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असून पति तो मला गतधवा स्त्रियांच्या परी ।
स्थिती मदीय जाहली जगतिं या, हरी हा अरी ॥
अम्हा खचित जाहला, वदति व्यर्थ यातें बरा ।
अशीच करण्या उभा कुटिल हा भिमेच्या तिरा ॥२५॥
पांडुरंगाच्या व पंढरीच्या वैभवाच्या आनंदांत गोरोबा रंगून म्हणत होते,

॥ अभंग ॥
शुभ अशुभची वार्ता नच जेथें । देत कैवल्यातें पांडुरंग ॥
बर्‍या वाइटाच्याहुनि जो निराळा । तोच हा सांवळा विटेवरी ॥
पंढरी हा हाट मुक्तीचा साजिरा । येताती बाजारा साधुसंत ॥
प्रेमभक्ती नाणें चाले पंढरींत । फ़रक भावांत होत नाहीं ॥
सायुज्य समीप स्वरूप हा माल । ठेविला सोज्वळ विकावया ॥
पंढरीच्या सुखा देवहि इच्छिती । लाळ घोटिताती गणू म्हणे ॥२६॥
अंत:करणांतलें दु:ख कुणाजवळ तरी सांगितल्याशिवाय मनाला विरंगुला वाटूं नये हा जो स्त्रीस्वभाव त्याला अनुसरून आल्या गेल्या शेजारणींजवळ ती आपलें दु:ख ओकूं लागली.

॥ पोवाडा ॥
करुं काय लागली काटि ग वंशासाठिं कारटें नाहीं ।
सागरीं बुडालें जहाज घराला इस्तु लागला बाई ॥
नवर्‍यानें घातिली माळ, जोडिला काळ, विठ्या लवलाही ।
टाळानें केलें तळपट सुचेना त्यास विठ्याविण कांहीं ॥
संसाररूप गोठ्यांत सुखाचे बैल, वांसरें गाई ।
बांधिलें होतें माझिया, मेल्याला तेंच पहावलें नाहीं ।
वैराग्यवाघ आणिला बळें अवतणें देउनिया गेहीं ।
त्या पाहून पळालीं ढोरं गणु म्हणे जीव घेउन लवलाही ॥२७॥

॥ आर्या ॥
पाहुन बाळ - लेणें बाळाचें, मदिय चित्त जळफ़ळतें ।
जैसे वादळ होतां निधिजळ वर्षाऋतूंत खळबळतें ॥२८॥

॥ ओवी ॥
एके दिवशीं सरितेवरी । मिळाल्या कुलाल - सुंदरी ।
वर्में काढून नानापरी । बोलती एकमेकींतें ॥२९॥

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
नको येऊस आमच्या मधें । पाणी भराया कारण ।
आम्हीं पुत्रवंत्या सई । तूं वांझोटी पापिण ॥३०॥

॥ लावणी ॥
नाहि तुझी साउली बरी न संगतखरी, काळें तें करी, येथुन लौकरी ।
आम्ही चालिरितिच्या बाया, गरत कीं कुलवंताच्या पोरी ॥
जिचा नवरा पुरुषांतुन केला कीं तुनं, काळवदन, आपुलें जाण दाखवूं नाहीं ।
करुं नको वृथा सिणगार मढ्याला तेरणेंत जीव देई ॥
जातवाल्या बायांनीं याप्रमाणें हिणवावयास व पतीची निंदा करावयास लागल्यावर त्या घरंदाज पतिव्रतेला तें सहन झालें नाहीं. तिनें त्यांना सडेतोड उत्तर दिलें.

नको दिमाखाचं बोलणें, माझा साजणं, ग पंचानन, दुजा अर्जुन, शोभला बाई ।
शपथेच्या सांपळ्यामध्यें अडकला सिंह उपाय त्या नाहीं ॥३१॥

॥ दिंडी ॥
वाद होउनि यापरी फ़ार तेथें । निघुनि गेल्या कामिनी स्वगृहातें ॥
वधू गोर्‍याची रुष्ट फ़ार झाली ॥ माहेरासी जावयातें निघाली ॥३२॥
नवर्‍याच्या कानांवर घालून जाणें ही आपली मर्यादा जाणून ती म्हणत्ये,

॥ आर्या ॥
मातृगृहा मी जात्यें ना तरि मोडा झणीं तुम्ही शपथ।
त्या शपथेनें एक्या होते निंदा वृथाच जगतांत ॥३३॥

॥ श्लोक ( इंद्रवज्रा ) ॥
वानोत निंदोत सुखें मलाही । त्याचें मला तें सुखदु:ख नाहीं ॥
श्वानाचिया पाहुनि भुंकण्याला । वाटे भिती काम वद कुंजराला ॥३४॥

॥ ओवी ॥
गोर्‍याचें ऐकून वचन । कांता निघाली जळफ़ळोन ।
संसार कराया लावीन । तुला तरीच खरी मी ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP