मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीसांवतामाळी चरित्र १

श्रीसांवतामाळी चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
कृष्णागरु चंदन करि वन अवघे जेंविं सौरभें युक्त ।
तेवीं होय भुषविता अरणग्रामास सांवता भक्त ॥१

॥ दिंडी ॥
माळियाच्या वंशांत जन्म झाला । कधीं ‘ ओनामा ’ नाहिं पठण केला ॥
वेद वदला हो ! जेथ ‘ नेति नेति ’ । असें त्यानेम धरियलें ब्रह्म हातीं ॥२॥

॥ पद ( हा काय तुमचा ) ॥
कृषिकर्म हाच व्यवसाय जयाचा खडतर जो जगतीं ॥ध्रु०॥
मोठा हांकितां हांकितां जाती सरुनी दिन राती ।
शीतोष्ण करि सहन, ना वसन, बहु दैन्य ।
पळ घटका ना मिळे जयाला कधींहि विश्रांति ॥३॥
श्रीसांवतेबुवांनी पत्नी एक दिवस त्यांना म्हणाली, “ आषाढी आली आहे, तेव्हां तुम्ही ज्या श्रीपांडुरंगाचें अक्षय भजन करितां, त्याचे दर्शनाला आपण जाऊन येऊं. ” श्रीसांवतेबुवा म्हणाले,

॥ पद ( धुमाळी ) ॥
विठ्ठल वापी, विठ्ठल मोट, विठ्ठल नांद्या बैल ग ! ।
विठ्ठल पाणी, विठ्ठल हांकिता, त्याविण हें काय होईल ग ! ॥ध्रु०॥
विठ्ठल शेत, विठ्ठल वाफ़ा, विठ्ठल नांगर वखर ग ! ॥
घडि घडि विठ्ठल विठूस भेटे; मग कां व्हावें अधीर ग ! ॥
विठ्ठल बेणें बिठ्ठल उगवे, विठ्ठल अवघ्या जगांत ग ॥
मग कां डोळे बांधुनि भटकूं दुर्धर माया वनांत ग ! ॥
दासगणु म्हणे मायागांठण थोडी करितां सैल ग ! ॥
बघणारासह स्थावरजंगम रूप विठूचें होइल ग ! ॥४॥
हें ऐकून बायको गप्प बसली. पण, त्यांच्या लहान मुलीला, तें आईचें गप्प बसणें आवडलें नाहीं.

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
“ लोक गांवींचे चालले । गालि भलून पंधलपुला ॥ ले जाऊं चला ॥
‘ आहे ’ म्हन्ती ‘ तेथें उभा । विते विथ्थल सांवला ’ ॥ ले पाहूं चला ॥
जाऊं, पाहूं बाबा ! त्यासी । दोले भलून पंधलपुलीं ॥ ले पाहूं हली ॥
माल, बुक्का वाहुन तया । शिल थेऊं पायांवली ॥ हो लवकली ” ॥५॥
मुलीचें तें भाषण ऐकून,

॥ दिंडी ॥
आला गहिंवर दाटून सांवत्याला । धरी पोटीं उचलून कन्यकेला ॥
म्हणे, ‘ प्रेमा ऐसाच हरीपायीं । ठेव बाळें ! यापरी जोड नाही ’ ॥६॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
गुंफ़ी त्वरें सुबक हार मुली ! फ़ुलांचे ।
जाई, गुलाब, तगरी, बटमोगर्‍याचें ॥
ठेवावयास पुढतीं कणसें मकांचीं ।
आणीं भरीव कवळीं निवडून साची ॥७॥

॥ अभंग ॥
जात होते वारकरी । क्षेत्र लक्षूनी पंढरी ॥
त्यांसी वंदाया कारण । आला सांवता धांवून ॥
मूल खालीं उतरून । घेई पदीं लोटांगण ॥
करी विनंती प्रेमेंसी । “ उभे रहा पुण्यराशी ॥
मज करूं द्या पूजन । तुम्ही अवघे नारायण ॥
मेदिनी ही वीट साची । तुम्ही मूर्ती विठ्ठलाची ॥
त्रिभुवन हें पंढरी । ज्ञानरूपी भिवरातिरी ॥ ”
गणु म्हणे ऐशा रीती । करी सांवता विनंती ॥८॥
श्रीसांवतेबुवा मुलीस म्हणाले,

॥ पद ( कधीं तिला० ) ॥
नमन या करीं आतां । भावें ठेवुनि पदिं माथा ॥न०॥ध्रु०॥
हे नच बाले ! वारकरी ।
साच हरी, पुजन करीं, पाय धरीं, अति आदरीं ।
संशया धरिं न चित्ता ॥न०॥९॥

॥ आर्या ( गीति ) ॥
घेउनि सुगड करीं तें संतांचे पाय धूत ती बाला ।
आनंदें थबथबलें मन, आला प्रेमपूर नेत्राला ॥१०॥
पूजा झाल्यावर श्रीसांवल्याची मुलगी वारकर्‍यांना म्हणाली, ‘ महाराज,

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
सांगा जाऊन पंधलपुलीं । आमुच्या त्या मायबापाला ॥ हो विथ्थला ॥
पोल सांवत्याची पाहते । वात शेताच्या बांदाला ॥ हो अलनाला ॥
आम्हि मजूल देवा तुझे । काम कलितों शेतांतलीं ॥ ले तुझ्या हली ॥
बाबा माझा मोता हांकी । माय दुपालच्या अवसली ॥ ले दले धली ॥
सांगा पिकला आहे मळा । नवि नवाल नाना पली ॥ ले अले हली ॥
तूं मालक ये पह्याला । आम्हि कशि कलितो चाकली ॥ ले तुझि हली ॥
उभा उदीम ह सोदुन । आम्हि आल्यास पंधलपुलीं ॥ ले श्लीहली ॥
लाग येइल तुजला विभो ! । भय बाबाच्या अंतलीं ॥ ले वाते हली ! ” ॥
हें मुलीचें भाषण ऐकून, वारकर्‍यांना परमावधीचें आश्चर्य वाटलें.

॥ अभंग ॥
“ येणें असल्या चाल पोरी ! । आम्ही नेतों पंधरपुरीं ॥
ज्याचा ध्यास तुझ्या मनीं । तोच दावूं चक्रपाणी ॥
तुझा बाप अभक्तांचा । आहे शिखामणी साचा ॥
जवळ सहा कोसांवरी । क्षेत्ररजा ही पंढरी ॥
असुनियां जो न गेला । भेटण्यासी त्या विठ्ठला ” ॥
गणु म्हणे ऐसें वदतां । कल्या कानीं ठेवी हाता ॥१२॥
मुलगी म्हणाली,

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
तुम्ही विथूचे पाहुने । मान सन्मानाचे धनी ॥ हो या जनी ॥
आम्ही त्याच्या घलचे आहों । थेवु तलतूदीलागुनी ॥ हो म्हनवुनी ॥१३॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
कन्येचें वच तें वसंत बरवा त्या भक्त वृक्षा नवी ।
आनंदातिशयें करूनि फ़ुटली रोमांच ती पालवी ॥
आलीं नीति - फ़लें तया म्हणुनि जो भारें बहू वांकला ।
तेथें तो तरुकोटरीं मन करी कोकील कोलाहला ॥१४॥
या वारकर्‍यांच्या भाषणानें श्रीसांवतेबुवांना राग न येतां, त्यानीं उलट विनयानें प्रश्न केला कीं, “ महाराज !

॥ आर्या ( गीति ) ॥
‘ भक्ताभक्त ’ म्हणाया उरतो अवकाश तो कुठें सांगा ? ।
मानूं नका निराळें जगतापासून रुक्मिणीरंगा ॥१५॥
वारकरी त्यांच्या भाषणानें खवळले व म्हणाले,

॥ पद ॥
“ वेदान्त तुझा कुनबटा ! आम्हां हलकटाअ ! नको सांगूंस ।
जन्मूनि तुवां शिणविलेम वृथा जननीस ॥ध्रु०॥
लोलूप, भवीं तूं सदा, हरीच्या पदा, कदा ना भजसी ।
वेदान्त वदुनि पोकल आम्हां फ़सवीसी ॥
आम्हि आहों विठूचे भक्त, प्रिय अत्यंत, त्यजुनि घरदारा ।
करुनियां वारि हा देह झिजविला सारा ॥
करुं नको, वृथा बरोबरी, आमुची खरी आम्हांसी गाथा ।
आहे तोंडपाठ गायत्रितुल्य तो आतां ॥
तुळशिचें काष्ठ हें कंठिं गीता बघ पाठि पताका स्कंधीं ।
लोळती पदीं आमुच्या तुझ्यासम नंदी ” ॥१६॥

श्रीसांवतेमहाराज मुलीला म्हणाले, “ बाळ, तुझा निरोप सांगण्याइतकी यांची योग्यता दिसत नाहीं. तेव्हां,

॥ पोवाडा ॥
“ ऊठ बाळे ! चाल लौकरी, मळ्याभीतरीं, साउली खरी, पडल तुजवर ।
या वारकर्‍यांच्या बोकांडावर भूत बहुत खंबीर ॥ चल बाळे ग तूं ॥ध्रु०॥
या भुताचि न्यारी तर्‍हा, फ़िरवि गरगरां, पाहुनि भोंवरा, भवीं बुडवीत ॥
सुखदु:स्वरूप दुर्धर शिळेवर पाय धरुनि आपटीत ॥ चल बाळे ग तूं ॥१॥
या भुतें ज्यास झडपिलें, त्याचें ना भलें, कधीं जाहलें आण ध्यानांत ।
गणुदास म्हणे या भुता घालवी बाप पंढरीनाथ ॥ चल बाळे ग तूं ” ॥१७॥
सांवतेबुवा वारकर्‍यास म्हणाले,

॥ पद ( जा जा झणीं ) ॥
जा जा जा तुम्ही । पंढरीला जा जा ॥ध्रु०॥
समंध दुर्धरसा, पाठीं आहे खासा । म्हणवोनी या गमजा ॥
मोठा मांत्रिक तो, समंध घालवितो । पंढरिचा विठुराजा ॥१८॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
अज्ञान भूत तुमचें निवटावयाला ।
पंचाक्षरी जवर तो नुमगे कुणाला ॥
जा हो ! तुम्ही शरण त्य प्रभुराज पायीं ।
तारो तुम्हां मदिय ती जननी विठाई ” ॥१९॥
वारकरी म्हणाले,

॥ पद ( झंपा ) ॥
“ मुढा ! दाविना वदन काळे करावें । पुढें आमुच्या ज्ञान ना तें कथावें ॥
आम्ही तेजोनिधी सूर्य, खद्योत तूं ॥ त्याच कां त्वां आम्हां दीपवावें ” ॥२०
सांवतेबुवा म्हणाले,

॥ पद ( सोहनी : ताल त्रिवट ) ॥
ज्ञान - रवि तुम्हि मुळिचें ॥ ज्ञा० ॥ध्रु०॥
अभिमानाच्या ग्रहणें केलें । व्याप्त आज परिसाचें ॥ ज्ञा० ॥
ग्रहणयुक्त तें मंडल होतां । नांव नुरें तेजाचें ॥ ज्ञा० ॥२१॥

॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित ) ॥
येथें तो नसल्यास मीहि तुमच्या संगें पहाया हरी ।
येतों पंढरिला मुलीसह अतां त्या चंद्रभागा तिरीं ॥
किंवा घालुनि आण माझि हरिला जाऊन ऐसें पुसा ।
देवा वास वदा तुम्ही खचित हो ! केलांत कोठें ? कसा ? ॥२२॥
हें ऐकून वारकरी म्हणाले,

॥ अभंग ॥
मूर्खा ! पाषाणाची मूर्ति । कैसी होईल बोलती ॥
तेथें नुसता धरणें भाव । मानूनियां तया देव ॥
बैल पोळ्याला पूजिती । परी पाहूं जाता माती ॥
पूजा अवघी बैला पावे । माती मातीपणें राहे ॥२३॥
हें ऐकून श्रीसांवतेबुवा म्हणाले,

॥ पद ( मूर्तिमंत भीति ) ॥
शिव ! शिव ! हें काय तुम्ही वचन बोलतां ।
मानुं नका द्वैत असें मानसी वृथा ॥ शि. ॥ध्रु०॥
भिन्न भिन्न द्रव्यें एकत्र मिळवितां ।
होइल कधिं काय खरे एकरूपता ? ॥ शि० ॥
द्रव्य जें पुजाल त्यांत पूज्य लागतें ॥
त्याविण ती कधिंहि पूजा त्या न पावतें ॥
काष्ठिं अग्नि म्हणुनि पहा काष्ठ पेटतें ॥
चुलिंत दगड घातल्या न काम भागतें ॥ शि० ॥२४॥
वारकर्‍यांनीं विठोबाला दगडाची मूर्ति म्हटलें, हें मुलीला पडलें नाहीं. ती म्हणाली,

॥ पद ( नागीणि चपल० ) ॥
“ ना मूल्ति खचित दगलाची । श्लीहलिची अहो विथुची ॥ ना० ॥ध्रु०॥
लजि दगलाचा तो प्लभु असतां । तली मला हा कैसा देता ।
फ़िकिल तया अमुची ॥ मोठी ॥ ना० ॥
जशी कोमली पंखाखालीं । घेउनि अपुलीं पिलें सांभाली ॥
आम्ही तशीं त्यांचीं ॥ लेंकलें ॥ ना० ॥२५॥

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
न्या ही धन्याला वानगी । क्लुपा कलून माझ्यावल ॥ हो झलकल ॥
मका, चाकवत, भोपला, । घोल, मेथी, कोथिंबील, ॥ हो गाजल ॥
बहु आवदें मनापुन । आमुच्या त्या लुक्मिनिला ॥ हो धनिनिला ॥
ऊंस दोलका, पदवल । शेंगा चवलीच्या नी खिला ॥ हो पांधला ॥२६॥

॥ ओवी ॥
वारकरी तें ऐकुनी । आश्चर्यचकित झाले मनीं ॥
“ ही मूल वेडी म्हणोनी । ‘ भाजी देआ द्या ’ म्हणे ” ॥२७॥

॥ दिंडी ॥
चला जाऊं हो वेळ बहुत झाला । नको घेणें हा सवें शाक - पाला ॥
उगिच ओझें घेण्यांत अर्थ काय ? । काय सुजला यासाठीं देवराय ! ॥२८॥
मुलीनें पंढरपुराकडे तोंड केलें व हात जोडून ती मोठ्यानें ओरडली.

ओवी ( जात्यावरील )
‘ अले ! मायबापा ! विथ्थला ! । कोन निलोप माझा तली ॥ ले तुज हली ! ॥
‘ देवा ! दुबलीचा सांगेल । येइ बसून गलुदावली ॥ ले झलकली ” ॥२९॥
अशी देआची प्रार्थना करीत मुलगी तेथेंच बांधावर बसली. इकडे,

॥ आर्या ( गीति ) ॥
द्वादश आदित्यांनीं सादर त्या उचलेल्या तदा भाज्या ।
म्हणती देऊं चला ही भक्ताची भेट पंढरीराजा ॥३०॥
आदित्य रुक्मिणीकडे आले.

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
“ नमो भुवनसुंदरी ! कमलजे जगन्नायिके ! ॥
दिसे अखिल विश्व हें तव विलास तो अंबिके ! ॥
अचिंत्य जगतां तुझें स्वरुप त्याहि ब्रह्मापरी ॥
अशीं उभयतां तुम्ही सगुण या भिमेच्या तिरीं ॥३१॥
‘ आईसाहेब !

॥ पद ( नृपममता ) ॥
ही भेट स्विकारीं साची । जननि गे ! तुझ्या नातीची । भीमके ! ॥
ती मूल असे माळ्याची । बहु लहान पांच वर्षांची । भीमके ! ॥
( चाल ) लडिवाळ, तिचें तें बोल, नसे त्या मोल, ज्ञान परि खोल,
जसें ज्ञात्याचें, तें काय वदावें वाचें । रुक्मिणी ! ” ॥३२॥

॥ पद ( भला जन्म हा० ) ॥
हात चिमुकलें; वर्ण सांवळा झिंज्या तोंडावरी
आलेल्या वामकरें सांवरी ॥
सुडकें ओचें होते वरी ॥
चोळी मुळिं ती अंगीं नव्हती; लोळुन भूमीवरी ।
विनंती वारकर्‍यांची करी ॥
( चाल ) बाप ! ही वानगी नेउन पंढरपुरा ॥
द्या विटेवरिल त्या राहिरमेंच्या वरा ॥
‘ या मळा पहाया ’ म्हणुनि विनंती करा ॥
ऐसें वदली पोर तियेचा मान कुणी ना करी ॥
राहिलीं उभि मग दीनापरी ॥३३॥
आपली नात कोन असावी, हें रुक्मिणीच्या लक्षांत आले. ती म्हणाली,

॥ श्लोक ( भुजंगप्रयात ) ॥
“ झणीं द्या कुठें भेट माझ्या मुलीची ” । वदूनीं असें माय लोकत्रयाची ॥
करानें करी त्या पुढें पल्लवाला । खरे संत ते वंद्य लोकत्रयाला ॥३४॥

॥ पद ( आज शाम ) ॥
“ आज काम योग्य हें त्म्ही खरें बजाविलें ॥ध्रु०॥
तिकडे हें सकल जरी । जातें न मिळतेंच तरि ।
प्रेम बहुत संतांवरि । मजहुनीहि आगळें ” ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP