मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ५

श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ५

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( मध्यमखंड )

॥ आर्या ॥
कंठमणि श्रीहरिचा उद्धव जो वर्णिला पुराणांत ॥
पुण्यश्लोक असा तो, ज्या म्हणती नामदेव जगतांत ॥१॥

॥ दिंडी ॥
मुलेंबाळें नामयाप्रती झाली ॥ परि न संसारि चित्त मुळीं घाली ॥
सदा बैसे एकांतिं राउळांत ॥ भजन रंगीं रंगलें असें चित्त ॥२॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
एके दिनीं धरुनिया कर नामयाचा ॥
बोले पिता करुनिया स्वकठोर वाचा ॥
वेड्या, अतां भजनवेड झणिं त्यजावें ॥
अयतावळास सदनीं बसुनी शिवावें ॥३॥
गोणाई म्हणाली,

॥ ओवी ( जात्यावरील ) ॥
आलों पोशित आम्ही तुला । जगीं नाम्या रे आजवरि ॥
आतां येथुनि संसाराचें । ओझें अवघें तुझिया शिरिं ॥४॥
राजाबाई म्हणाली,

॥ पद ॥ ( अहो काय हाय हें० )
पतिराज, आज हे ऐका । भवसौख्या या विटूं नका ॥ध्रु०॥
धडाडिनें व्यापार करा हो । दैन्य घरासी आणूं नका ॥प०॥
उगि आळसानेम प्रापंचाकडे । काना डोळां करुं नका ॥पति०॥
मुलें म्हणाली,

॥ कटिबंध ॥
करि करि, आम्हां सत्वरि, नाहीं ही बरी, अंग बघ आतां ॥
फ़ाटून गेलिसे नवी शिवावी, ताता ! ॥
बाळुच्या गळ्यामधि सरि, कडीं ती करीं, टोपि भरजरी, छान डोक्याला ॥
त्यापरी अणावी नवी तुम्ही आज मजला ॥
( चाल ) बाळुचा बाप बाजारा जातसे ॥
येतांनीं मुलांना खाऊ अणितसे ॥
तुम्ही करा आमच्यासाठीं झणिं तसें ॥
हरघडि बाळु आपुला । चिडवितो मला । म्हणेम कुठें तुला ।
दांडु विटि भंवरा । गणुदास म्हणे यापरी बोलला नारा ॥६॥
महादा म्हणाला,

॥ ओवी ॥ ( जात्यावरील )
बालुच्या बापापलि । तूं जाऊनि बाजालाला ॥
काजु पेले बलफ़ी खवा । खायासाठीं आणी मला ॥७॥
नामदेव मुलांना म्हणाले,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
अशाश्वत असे मुला सकल हे विचारा करी ॥
बसूनि सदनामधें सतत आठवावा हरी ॥
गळ्यांत अपुल्या धरी तुळशीच्या शुची भूषणां ॥
तरी सफ़ल जन्म ह जगति होय नारायणा ! ॥८॥

॥ ओवी ॥
नको मागूस रे माधवा । लाडु खाया बाजारीचे ॥
‘ हरी, विठ्ठल, केशव ’ अशा । करी सेवन पक्वानाचें ॥९॥

॥ दिंडी ॥
असे नामा सांगतां अर्भकांसी ॥ राग आला बहु तदिय कुटुंबासी ॥
तुम्ही अपुले ना ढंग मुलां सांगा ॥ नका शिकवूं ध्यायास पांडुरंगा ! ॥१०॥

॥ पद - ( सगुण गुण माया० ) ॥
दिसे वरि भोळा, अंतरीं विठू हा काळा ॥ध्रु०॥
हा देव नव्हे आहे भूत । या नादे बुडाले बहुत ।
मी तुम्हां जोडिते हात । नको हा चाळा ॥अंतरीं०॥
या भूतें हरिश्चंद्राला । डोंबाचे घरीं राबविला ।
या नादे उपाशी मेला । सुदामा भोळा ॥अंतरीं०॥
होऊन भटाचें पोर । चकविला बलि नृप थोर ॥
कवि करितां तदिय प्रतिकार । फ़ोडिला डोळा ॥अंतरीं०॥
या भुता काढण्या पाही । एकही जगामधिं नाहीं ।
त्या महाभूताचे पायीं । ठेवि गणु भाळा ॥अंतरीं०॥११॥
हें बायकोचें रागाचें भाषण ऐकून नामदेव म्हणाले,

॥ श्लोक - ( शिखरिणी ) ॥
हरी या दोषाला, किमपिहि नसे पात्र सुभगे ! ॥
नसे मोठा कोणी प्रभुविण जगीं शोधुनि बघे ॥
कृपेनें कीं त्याच्या बहुत तरले या त्रिभुवनीं ॥
विठू हा सर्वांचा जननि - जनिता सद्गुरु झणिं ॥१२॥
॥ लावणी ॥
ना छळिलें हरिश्चंद्रास उलट रक्षिलें ॥
प्रत्यक्ष जान्हवीकांठीं दर्शन नृपा दीधलें ॥
जिवलग सुदामा मित्र दरिद्रि जरी ॥
त्या दिली पुरी सोन्याची, हे ख्यात जगाभीतरीं ॥
( चाल ) ठेवून बळीच्या शिरीं । पाय आदरीं । वंद्य जगभर
तयासि केलें ॥ गणु म्हणे भाग्य लाधलें ॥१३॥

॥ आर्या ॥
पौराणीक कथा या, कविविरचित सार यांत ना कांहीं ॥
मृगजल जलास भासवि, परि प्यायां उक्त तें जसें नाहीं ॥१४॥
असा उभयतांचा संवाद चालला असतां दामाशेटीला वाटलें, हें काम आतां जास्तच चिरडीस जाईल, म्हणून त्यानेम नामदेवाचा हात धरिला आणि त्याला निक्षून सांगितलें कीं,

॥ पद ॥ ( घर आने दे जाने श्याम सुरारि. )
हे ढंग मुला नच बरवे ॥ध्रु०॥
पिकलीं पानें आम्ही उभयतां ॥ आम्हां पुत्र तूं कीं एकुलता ॥
कांहिं तरि हे लव आण चित्ता ॥ तूंच आम्हां पोसावें ॥ध्रु०॥
जाई नामया बाजाराते ॥ आयतावळ कीं विकावयातें ॥
धन मिळवुनिया पोटापुरतें ॥ सुखें हरिस मग गावें ॥ध्रु०॥१५॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
त्यजूनि गज - कातरी करि तुंवा विना घेतला ॥
अशूभ अवघे कसे अवडलें टिळा भोपळा ॥
सुईंत नच ओंविला चुकुन तूंहि दोरा कधीं ॥
म्हणून नच राहिला तुजशिं मान शिंप्यामधीं ॥१६॥

॥ अभंग ॥
शिंप्यांचीं लेंकरें बाजारासी जातीं ॥ शिवीत बैसतीं अहोरात्र ॥
तुज नाहीं त्याचें किमपि भूषण ॥ सदा नारायण जपतोसी ॥
घोड्यावरी आजी कापड घालुन ॥ कराएं गमन बाजाराला ॥
गणुदास म्हणे, पित्यानें या परी ॥ बोधिला तो घरीं नामदेव ॥१७॥

॥ दिंडी ॥
अशा सर्वांच्या बघुन आग्रहाला ॥ निघे नामा बाजार करायाला ॥
अला घेउन घोड्यास महाद्वारीं ॥ विचाराया देवास प्रेम भारीं ॥१८॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
कलत्र जननि पिता मजवरी बहू कोपले ॥
‘ द्विपाद पशु ’ या परी मजसि साच संबोधिलें ! ॥
अतां करुं कसें ? मला विरह पह तुझा साहिना ! ॥
असें म्हणूनि ठेविलें शिर पदीं असूं लोचनां ॥१९॥
अशी त्याची स्थिती पाहून देव म्हणाले,

॥ पद ॥ ( नृप ममता रामावरती० )
संसार खनी दु:खाची ॥ जरि आहे, नाम्या ! साची ॥ या जनी ॥
म्हणूनि का तिला वद भ्यावें ॥ धैर्यानेम तिशीं झगडावें ॥ नामया ॥
( चाल ) पोहणार असेल जो खरा । तो न भी पुरा । शोध मनिं जरा ।
उडी टाकून ॥ परतिरा जाय पोहून ॥ नामया० ॥२०॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
शूरास शौर्य चढतें समरांगणांत ॥
ना तो उगीच फ़िरवी असि आगरांत ! ॥
वैराग्य हें अचरुनी भविं दाखवावें ॥
शब्दें उगे निरुपणें न जगा कथावें ! ॥२१॥

॥ ओवी ॥
उघडे बागडें झांकण्यास । निर्माण शिंपी महीस ॥
राजापासून रंकास । तेच झांकिती वस्त्रानें ॥२२॥

॥ कटिबंध ॥
नामया ! जगाचे भरी, पोट शेतकरी, मळ्याभीतरी, करुनिया कष्ट ॥
यावीण नाहीं त्रिभुवनांत कोणी श्रेष्ठ ॥
तैसाच वर्ग दूसरा, तुमचा खरा, अहे चातुरा, जगा उपयोगी ॥
कर सेवा मशि कल्पून जगाच्या जागीं ॥
( चाल ) लाडक्या, सुखें बाजारा ॥ जा, करी ॥
बसलों मी आहे तव बाळा ॥ अंतरीं ॥
बोलुनि असें प्रेमानें ॥ श्रीहरी ॥
फ़िरविला मुखावरि हात, पंढरीनाथ, जगाचा तात, बली जगजेठी ॥
गणुदास म्हणे जो उभा भिमेच्या कांठीं ॥२३॥
असें सांगून देवानेम नामदेवाची समजूत घातली आणि त्याला बाजाराला पाठवून दिलें.

॥ दिंडी ॥
महुद भाळवणी हाट बसला कपड्याचे भक्तराज बाजारी ।
परि ना कोणि गिर्‍हाइक हांसत बसले तयास शेजारी ॥२५॥
शिंपी म्हणूं लागले,

॥ पद ॥ ( नृपममता रामावरती. ))
किति चतुर दामाशेटि । हा गार हिर्‍याचे पोटीं । जन्मला ॥
( चाल ) हा बसे नेत्र झांकुन । दुकान लावुन । मुखें करि भजन ।
ढंग हें ऐसें ॥ मग यावें गिर्‍हाइक कैसें ॥ याकडे ॥२६॥

॥ श्लोक ( उपजाति ) ॥
शेटी असावा बहुभाष साचा । वाढे तरी तो धन मान त्याचा ॥
जो मौनतेला बसतो वरून । त्यातें विचारी जगतांत कोण ? ॥२७॥

॥ पद ॥ ( पंढरि नामाचा बाजार )
ओसरला बाजार निघाले उदमी घरा साचार ।
ज्याच्या त्याच्या कसे कमरेला रुपयांचा झणकार ॥
घोडें पळतां सहज होतसे हर्ष मना अनिवार ।
त्याच्यासंगें नामदेवही लादुन घोड्यावरती ॥
माल आपुला असे निघाला भजनिं प्रेमा फ़ार ।
टोचुन पुसतां बळेंच उदमी त्यासी नामा सांगे ॥
माझी विक्री किफ़ायतीनेम भोशावरी होणार ॥२८॥

॥ आर्या ॥
माळावरि भोशाच्या होता वेताळ एक वाटेंत ॥
लहान मोठे धोंडे ज्याभंवतीं रोविलें असंख्यात ॥२९॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
उदयगिरिस येई सूर्य प्राची दिशेला ॥
बघुनि तम तयातें कंदरीसी दडाला ॥
झुळुं झुळुं झुळुं वाहे शीत वारा प्रभातीं ।
कृषिवल जन शेतीं बैसुनी शेक घेती ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP