मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४

श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


भाग पहिला
॥ श्लोक ॥ ( वसंततिलका )
देवा ! अकिंचन मुळीं तव दास दामा ॥
हे ना कसें समजलें तुज सांग रामा ॥
त्वन्नाम हेंच आमुच्या धन संग्रहासी ॥
तें ना रूचेल गमते मम सोयर्‍याशीं ॥६१॥
हें ऐकून देव म्हणाले,

॥ गज्जल ॥ ( झाली प्रभात झाली. )
भ्यावें मुळीं न भ्यावें । लग्नास त्वरीत चल रे ॥ध्रु०॥
आहे जो बैल लगडीचा । सदनांत आपुल्या साचा ॥
तो वाहन नवरदेवाचा । मुठ घालुं तयावरि रे ॥
नको आणणें घागरमाळा । आयत्याच आहेत बैलाला ॥
गोमाशा विपुल कंठाला । ध्वनि त्याच मधुर करतिल रे ॥६२॥

॥ ओवी ॥
मारुतीच्या राउळांत । नाम्यास जा घेऊन त्वरित ॥
नंदादीपाचें तेल तेथ । याच्या अंगास लावावें ॥६३॥

॥ दिंडी ॥
चंद्रभागा घालील न्हाऊं त्याला ॥ हळद लाविल मल्हारि नामयाला ॥
कां कि भंडारा तेथ उणें नाहीं ॥ सहज अपुलें तेणेंच कार्य होई ॥६४॥

॥ आर्या ॥
ऐकुन वचन हरीचें, गोणाई लावि हात दैवाला ! ॥
निर्धन पुरुष जगीं या, विषय सदा होत कीं टवाळीला ॥६५॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
शिशुसह कधिं ज्ञाता ना विनोदा करीत
अससि जगिं अम्हांला तूंच कीं माय - तात ॥
कधिं न विसर याच तूजलागीं पडावा
म्हणुनि करि न ऐशा कौतुका वासुदेवा ! ॥६६॥
देव म्हणाले, मीं खरोखरच लग्न ठरवून आलों आहे आणि आज आपल्याला येथून निघालेंच पाहिजे.

॥ अभंग ॥
दामाशेटी गोणाबाई । नामदेअ शेषशायी ॥
चौघे मिळून लग्नासी । आले कल्याण ग्रामासी ॥
कळविला समाचार । व्याह्यालागीं तो सत्वर ॥
यावें आम्हांसी सामोरें । गणु म्हणे अत्यादरें ॥६७॥
सोयरा आला आहे हें ऐकून, गोविंदशेटीचे बाजूचे कांही लोक, व्याही कसा काय आहे, मुलगा कसा आहे, हें पाहण्यासाठीं, मोठ्या आतुरतेनें त्या लिंबाच्या झाडापाशीं आले.

॥ पद ॥ ( गोदावरिच्या पासुनी अंबे. )
यांतें पाहुनि कल्याणीचे जन खदखद हंसती ॥
कळली कां ही पंढरपुरची कशि आहे श्रीमंती ? ॥
अब्जाधिश हा दामाशेठी म्हणुनी अम्हांला ॥
मुनीम याचा येउनि येथें सांगुनि कीं गेला ॥
हजार ठिगळें या विहिणीच्या लुगड्याप्रति असति ! ॥
व्याही केवळ धनहीनांचा सार्वमौमनृपति ! ॥६८॥
गोविंदशेठीचे कांहें गुराखी वगैरे नोकर लोक होते, त्यांनीहि हा प्रकार पाहिला आणि ते गोविंदशेटीला येऊन म्हणाले कीं,

॥ छक्कड ॥ ( नको भकूस भटा० )
नाहीं, नाहीं, शेटि तुमचा व्याही बरा ॥
दिसतो भिकारी कीं आम्हां पुरा ॥ध्रु०॥ नाहीं नाहीं०॥
ठिगळाचा पाटाव नेसुनि आली ॥
विहिन व्याह्याला घोंगडी काळी ॥
पोराचा पोषाख कुंकु कपाळीं ॥
अवघें विलक्षण ध्यानीं धरा ॥
दिसतो भिकारी कीं आम्हां पुरा ॥ नाहीं नाहीं० ॥६९॥
कांहीं लोक म्हणाले,

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
असेल जड जाहली जरि तुझी तुला कन्यका
अडांत झणिं लोटणें परि अशास देऊं नका ॥
बळें ब बसवी हिरा कथिल कोंदणाच्या मधीं
समान हरिच्या पहा मुळिं न होय कोल्हा कधीं ! ॥७०॥
हें ऐकून गोविंदशेटी तेथें आलें व या तिघांना पाहून फ़ारच रागावलें तों इतक्यांत मुनीमाच्या वेषांत असलेला देव त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून गोविंदशेटी म्हणाले,

॥ पद ॥ ( प्रभु देई शांतिसुखा० )
वा ! दिधली थाप खाशी ॥ध्रु०॥
हीन दीनसा असुनी भिकारी । धनिक म्हणुनि कथिलें मजसी ॥
शेटि खुळा हा पुत्र बावळा । देऊं कन्यका मग या कैशी ॥७१॥
देवानें रागाचा आवेश आणिला आणि ते म्हणाले,

॥ दिंडी ॥
तुझ्यासाठीं मम शेटि गरिब झाला ॥ हीनवेषा घेऊन येथ आला ॥
विभुति कौपिन पाहून शंकराशीं ॥ दरिद्री कां गणितात कुणी त्यासी ॥७२॥

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
वेडेपणा नच असा करणें उगीच ॥
जें बोललों तुजशिं तें अवघेंच साच ॥
यासारिखा धनिक या जगतांत नाहीं ॥
पाणी भरीत कमला सदनांत पाही ॥७३॥

॥ ओवी ॥
साखरपुड्याची वेळ आली । तै विठ्ठलें माव केली ॥
ती ऐका श्रोते मंडळी । सांगतो तुम्हांकारणें ॥७४॥

॥ कुटाव ॥
भरगच्चीच्या गालीच्यावर । चौक भरला अभिनव सुंदर ।
नारळ शोभे नव कलशावर । खालि गव्हाची रास मनोहर ।
गणपति - वरूण पूजा झाली । भटां दक्षिणा बहुत मिळाली ।
कलश मुलीच्या लावुन भालीं । भगवंतानें ठेविला खालीं ।
नंतर अहेरा आरंभ झाला । वानूं कितिक मी त्या थाटाला ।
हातीं मुलीच्या शालू दिधला । भरजरतारी, पैठणीचा ।
बहुमोलाचा येवल्याचा । तसा पुण्याचा खण चोळीचा ।
तो जरतारी । बुट्टे जयावर असती भारी ।
अंगावरती शाल दुहेरी । लुगडीं साड्या यांचे बस्ते ।
धनवड इरकल सोलापुर ते । तलम सुताचे अमदाबादी ।
नागपुरी ती विणकर साधी । नग डोईचा बिंदि बिजवरा ।
मूद राखडी मौक्तिक गजरा । बाळ्या बुगड्या नथ नाकीची ।
गळ्यांत पेंडी नवरत्नांचीं । गोफ़ कंठा सरी सोन्याची ।
अवजड मोठी तिस तोळ्यांची । माळ दुहेरी थोर जव्याची ।
विशेष शोभा चंद्रहाराची । गोट पाटल्या तोडे बिलवर ।
दोदंडीं त्या वांक्या सुंदर । कंबरपट्टा तो कमरेवर ।
तोडर वाळे, पदीं सांखळ्या । लहान विरोद्या नी मासोळ्या ।
रमावरानें अर्पण केल्या । मानकरणी चकीत झाल्या ।
आपुल्या चित्तीं । म्हणती याची किति संपत्ति ।
कुबेर क्षुल्लक याच्यापुढती । राजाईचें उदया आले ।
नशीब आम्हां कळून चुकलें । तेंच गणूनें कवनिं गायिलें ॥७५॥
मग देव म्हणाले,

॥ श्लोक ( वसंततिलका ) ॥
आतां टिळा अमुचिया सम तूम अणावा ॥
जामात, देउन चिरा, झणिं गौरवावा ॥
निर्द्रव्य त्वां ठरविलें अमुच्या धन्याशीं ॥
आम्ही परी न चुकलों अपुल्या वचाशीं ॥७६॥
गोविंदशेटी म्हणाले,

॥ पद ॥ ( पांढरें धुवट० )
सागरा कुठुन चातुरा, लाजवी खरा, सांग ओहोळ ॥
कस्तुरी कुठें, कुठें गाळ मी, सज्जना ॥
सज्जना, अणुनि हे मना, वृथा हिणविना, उगीच मजशीं ॥
तयारी पुढील करी खाशी । नोवरी ॥
नोवरी, बोहोल्यावरी, नेऊनी खरी, लग्न लावा ॥
तसा हा दास पदरीं घ्यावा, हो । गणु म्हणे ॥
गणु म्हणे, अशा या रिति, करी विनती, तेणें श्रीपती, चित्तीं धाला ॥
उरकला तेथ सर्व सोहळा । तेधवां ॥७७॥

॥ ओवी ॥
बर्‍हाडी वरपक्षाचे । अवघे देव दिवीचे ॥
तेथ गोविंदशेटीचे । तेज पडावें कोठुनी ? ॥७८॥

॥ श्लोक शार्दूलविक्रीडित ) ॥
सावित्री, कमला, सती नगसुता, श्रीशारदा रेणुका ।
गार्गी, देवहुती, शची, अनुसया, आरुंधती, अंबिका ।
रेवा, भागिरथी, कृतांतभगिनी, गोदा जगत्पावनी ॥
कृष्णा भीमरथी मिळुनि अवघ्या लग्नास आल्या झणीं ॥७९॥

॥ दिंडी ॥
लग्न झालेसे बहुत कडाक्याचें हरीच्या त्या अत्यंत लाडक्याचें ॥
वधूपक्षाच्या सर्व वर्‍हाडासी ॥ करी अर्पण भगवान अहेरासी ॥८०॥
गृहप्रवेश झाला व गोणाबाईला अत्यंत आनंद झाला. ती देवाला म्हणाली,

॥ पद ( तेथेंच उभी कीं आलें० ) ॥
गोणाइ म्हणे, भगवंता ! शिणलासी पंढरिनाथा ! ॥ लग्निं या ॥
त्याची मी तुझी उतराई, होणार नाहीं केव्हांही ॥ विठ्ठला ! ॥
( चाल ) दुधभात एवढा तरी । खाइ श्रीहरी । माझिया घरीं ॥
करी न अनमाना ॥ गणुदास लागतो चरणां ॥ विठ्ठला ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP