मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २

श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ पद ॥
मदिय प्रभव पाहण्यास घेउनिया चाल मला ॥
कौमुदी ती चंद्राविण दिसेल कशी सांग तुला ।
( चाल ) असेल जरे दरबारीं । बंदि नरा तरि मी नारी ॥
होइन बघ, हाच पहा वेष सुबक घेतियला ॥२१॥

॥ आर्या ॥
गोरखधृत स्त्रीवेषा पाहुन संतोष त्या कलिंगेस ।
झाला, नमुन म्हणे कीं लाजविलें त्वां खरें विधात्यास ॥२२॥
गोरखानीं कलिंगेला एक पद शिकविलें, व म्हणाले कीं, “ हें पद तूं दरबारामध्यें म्हण. म्हणजे पुढें काय होतें तें तुला समजेल. ” गोरखांनीं सांगितल्याप्रमाणें कलिंगा शिकविलेले पद दरबारामध्यें म्हणूं लागली.

॥ पद ॥ ( रजनिनाथ हा )
सतेज शीतल पूर्ण असूनी ।
झांकियला हा शशि जलदांनीं ॥ध्रु०॥
( चाल ) आतां कोठुन तेज तयाचें ।
प्रत्ययास ये तरि जगताचे ॥
दासगणु म्हणे वा खापरीचे ।
आड राहिलें रत्न दडूनी ॥२३॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
परिसुन गणिकेच्या या अशा गायनासी ।
मुदित न मुळिं झाले नाथ, हा बाण त्यांसी ॥
गमत विकल चित्तांलागिं कीं हो कराया ।
श्रवणपंथिं आलासे घेउनी साम साह्या ॥२४॥
इकडे गोरख मृदंग ( तबला ) वाजवितांनाहि बोलामध्यें अशी वाणी काढूं लागला कीं,

॥ सवाल ॥
योगी निरंजन ब्रह्म सनातन स्वरुप न छोडोजी अपना ।
“ आयाजी गोरख चलना मछिंदर पलभर यहां नहिं ठरना ”
चुवेके साथ न शेर रहे कबी ये मैने क्या तुमसे कहना ।
आयाजी गोरख चलना मछिंदर पलभर यहां नहिं ठरना ॥
“ विषयोंका कीचड यहांपे भरा है बात ये ख्यालमें लेना ” ॥
दासगनू कहे आयाजी गोरख सांई मछिंदर चलना ॥२५॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
वाद्यामधें उमटतां ध्वनि या परीचा ।
मत्स्येंद्रनाथ दचके स्वमनांत साचा ॥
पंचाननास बघतां मृग भीत चित्ता ।
‘ आयाहि गोरख...’ ध्वनी तशि होय नाथा ॥२६॥

॥ पद ( धपधपा ) ॥
पुरे दडुन बैसणें प्रगट गोरखा ! हो झणीं ।
खराच गुरुभक्त तूं तुजसमान नाहीं कुणीं ॥
मृदंग जडसा परी बनविला तुवां बोलका ।
सदा विजय हो तुझा मजसि भेट ये बालका ॥२८॥

॥ दिंडी ॥
दिला फ़ेकुन स्त्रीवेष गोरखानें ।
केलें वंदन सद्गुरुस आदरानें ॥
मान खालीं घालून उभा ठेला ।
आनंदाश्रू वाहती लोचनाला ॥२९॥
आणि साष्टांग नमस्कार घालून त्या मैनाकिनीला म्हणाले, “ आईसाहेब ! - ”

॥ पद ( भैरवी ॥
ठेवुं नको नाथाला, माते ॥
ब्रह्मांडाचा स्वामी मछिंदर । मेदिनी आसन ज्याला ॥
गंगा, गोदा, यमुना ह्या ज्या । दासि उभ्या सेवेला ॥३०॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
नाथाचें अविनाश वैभव असे नाहीं तुझे त्यापरी ।
कोल्ह्यानें निज कातडें करुनिया का भूषवाआ हरी ? ॥
शोभे कां उटि केशरी मृगमदा, खद्योत सूर्यापुढें ।
नाथा ठेवुन या गृहांत अपुल्या घेऊं नको यापुढें ॥३१॥

॥ ओवी ॥
ऐसें बोलतां गोरखनाथ । मच्छेंद्र झाले दु:खित ॥
वत्सा ! हें कर्म अनुचित । खरेंच म्यां केलें कीं ॥३२॥

॥ लावणी ॥
शोभें न तुझा मी गुरू, अनीतिचा तरु, मनाच्या आधिन कीं - जाहलों । विषया सेवित बघ राहिलों ॥
तुजला दिक्षा मीं दीधली, परि न उमजली, मजला तीच - किं रे राजसा । बनलों शाब्दिक ज्ञानी असा ॥
( चाल ) वैराग्यवनींचा तूंच किं पंचानन ॥
या विषयमृगाचें भय तुजला कोठुन ॥
मी मात्र बुडालों स्थितिंत अशा राहुन ॥
वैराग्य नराला कळे, परि न तें वळें, वळवी तोच गणु म्हणे खरा । इतरां मुळिं न हिशोबीं धरा ॥३३॥

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
सतेज, पिवळें, मृदु असलियास सोनें म्हणा ।
न येच पितळेप्रती पित म्हणून सोनेंपणा ॥
आचारशुचि पाहिजे प्रथमता विरागाप्रती ।
विरागि बनतो तपी, तपिंच भोगि ब्रह्मस्थिती ॥३४॥

॥ पद ॥ ( नृपममता )
महाराज कृपेनें अपुल्या द्वैताच्या वाटा सरल्या ॥ सर्वही ॥
( चाल ) विश्वांत वस्तु एकही, तुम्हाविण नाहीं, निराळा मीही ॥
न उरलों आतां । गणु बोले सद्गुरूनाथा ॥ येधवां ॥३५॥
तें ऐकून मैनाकिनी म्हणाली, “ गोरखा ! - ”

॥ आर्या ॥
मैनाकिनी म्हणे तूं असशिल जरि गोरखा गुरूभक्त ।
तरि जें गुरुंनीं केलें तें तूं करुनी यिथें रहा स्वस्थ ॥३६॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
होता का जगदीश मूर्ख म्हणुनी या वैभावा निर्मिलें ॥
अध्यात्मामधें सार ना लव, वदें ब्रह्मा कुणीं पाहिलें ? ॥
नाथाचा प्रिय शिष्य तूं म्हणून ही आली तुला पर्वणी ।
कौड्या मागत ना फ़िरें, बसुं नको वृक्षातलीं काननीं ॥३७॥

॥ पद ॥ ( नृपममता )
अध्यात्मशास्त्र गरिबाचें । उपयोगी धनिका नाहीं ॥
अवघीच कल्पना तेथें । ना अनुभव ये एकाही ॥
( चाल ) तारुण्य तुझ्या शरिरास, सेविं विषयास, मनांतुनि र्‍हास ।
होऊं दे त्याचा । गणुदास म्हणे लवलाही ॥३८॥
हें ऐकून गोरख म्हणाला,

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
मैनाकिनी ! करुं नको उगि वल्गना ही ।
अध्यात्म श्रेष्ठ अवघ्या जगतांत पाहीं ॥
अध्यात्मवैभव जगा करि थक्क साचें ।
आहे फ़िकें बल तयापुढतीं विधीचें ॥३९॥
मैनाकिनी म्हणाली -

॥ लावणी ॥
नको निघुंस कोरडा अभाग्या बुडून विभव - सागरी ।
घालिं न कपडे अंगिं तुझ्या तूं कर नुसते वर करीं ॥
दहींदुधानें न्हाणून लावूं उटणें नानापरी ।
हिना - चमेली यानें अपुलें सदरे वासित करीं ॥
जेवीं साखरभात, जिलेबी विसरुन जा भाकरी ।
पलंग निजाया आंत गदेला मच्छरदाणी वरी ॥
भोगुन सारें “ नश्वर, नश्वर ” मुखें म्हण वरच्यावरी ।
दासगणू म्हणे बोले नाथा मैनाकिनी यापरी ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 13, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP