मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
जन्म - कथा २

श्रीगीता - जन्म - कथा २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ आर्या ॥
पार्थ म्हणे श्रीकृष्णा ! आले भट कोण कोण युद्धास ।
हें मज पहावयातें रथ माझा नेइ ऐन मध्यास ॥२४॥

॥ पद ॥ ( मालकस - त्रिवट )
दुष्ट कुटिल जो खल दुर्योधन ।
त्यांचें हित तें द्याया साधुन ॥
( चाल ) कोण आलें तरि युद्ध कराया ।
सत्पक्षाला जगिं तुडवुनिया ।
कुरुक्षेत्रामधें समरभूस या ।
त्यांचें करितों अधिं अवलोकन ॥२५॥

॥ लावणी ॥
हे चमु जणु महानदी, सैन्य हें निर ।
येथिला नक्रराजा हा, श्रीभीष्म कुणि न यावर ॥
गुरुराज वंद्य कृपद्रोण आम्हां निश्चिती ।
कुणि मित्र, पुत्र नी बंधू, सोयरे कुणी आसती ॥
इर्षेचा आला महापूर, थांबेना जरा ।
मिळणार नदी ही वाटे, मृत्युच्या महासागरा ॥२६॥

॥ श्लोक ( मालिनी ) ॥
स्वजन बघुन सारे पार्थ बोले प्रभूला ।
शिथिल सकल गात्रें कंप तेवी तनूला ॥
सुटुन धनु करीचें लागलें हें गळाया ।
वदन मदिय झालेम कोरडें देवराया ॥२७॥

॥ लावणी ॥
श्रीकृष्ण म्हणे आपणासी, काय करूं आतां ।
कोणत्या रितीं समजावूं, येधवा कुंतिच्या सुता ॥
मोहानीं जाहला व्याप्त सर्व विसरला ।
अपराध कौरवांचे ते, धैर्याचा लोप जाहला ॥
मुळचाच असे हा संत महासज्जन ।
या योगें वीरवृत्तीचा, बैसेल नाश होउन ॥
( चाल ) संतत्व तसें शूरत्व, असो जागृत, तरिच हा पार्थ ॥
रणीं झुंजेल । अवघ्यांचें कार्य होइल ॥२८॥

॥ दिंडी ॥
म्हणे अर्जुन कृष्णास देवराया ।
आप्त माझे असति हे रणाठाया ॥
अंत यांचा झालिया मदिय हातें ।
आहे जाणें मज भाग रौरवातें ॥२९॥

॥ पद ॥ ( शब्द शिलेच्यावरचे )
मोह जयासी सुटला । विचार तेथें मग मावळला ॥
( चाल ) मोहा पोटीं लोभ उपजतो ।
तोच नरांना जगिं नाचवितो ।
कुलक्षयाचा दोष न कळतो ॥
मग त्या मतिमंदाला । शहाणा म्हणवी तो आपणाला ।\
याचरितीं हे कौरव सारे ।
धुंद होउनी आले बारे ।
लढावयासी अतिशय निकरें ॥
मारूं जरी कीं याला । ज्ञाते दितिल दोषचि मजला ॥३०॥

॥ पद ॥ ( नृपममता )
युद्धाचिं लक्षणें आजी । विपरीत मला हीं दिसतीं ॥
मेल्यास इथें कौरव हे । निर्वंश आमुचा जगतीं ॥
( चाल ) आमुच्याच कृत्यें होईल ।
कुलधर्म नष्ट कीं सकल ॥
होउनी स्वैर बनतील ।
कुलस्त्रिया विमल ज्या सार्‍या । होतील त्याच कीं असती ॥३१॥

॥ श्लोक ( वसंत तिलक ) ॥
नाहीं मला मिळविणें जगिं राज देवा ।
या कौरवां वधुनिया बघ वासुदेवा ! ॥
मारोत तेच उलटें मजला रणीं कीं ।
तेणेंच गौरव खरा मम होय नाकीं ॥३२॥

॥ श्लोक - शार्दूल विक्रीडित ॥
हे सारे अतताइ, यांस वधितां ना पाप लागे जरी ।
भीष्म - द्रोण - कृपांसमान विभुती आहेत त्याभीतरीं ॥
त्यातें यांतुनी वेगळे करुनिया मी बाण सोडूं कसे ? ।
हाची प्रश्न उभा रणीं मजपुढें ना बोलवे फ़ारसें ॥३३॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म हा )
नाहीं आचरिले आर्यजनांनीं ज्या मार्गा आजवरीं ।
तुला तो कोठून पटला तरी ? ॥
ज्या मार्गाला दुष्कीर्ति फ़ळ तशि स्वर्गीं अधोगती ।
जियेला बुधजन ना चाहती ॥
( चाल ) तो कष्मलतेचा मार्ग तुला कोठूनी ! ।
अर्जुना ! आठवला सांग मला झटदिनी ! ।
नामर्द असा तूं जाउं नको होउनी ॥
युद्धवनींचा पंचानन तूं दुबळेपण टाकणें ।
लढाया रणीं उभें राहणें ॥३४॥
हें देवाचें भाषण ऐकून अर्जुन म्हणतो -

॥ पद ॥ ( प्रगटला किं )
पूजन करून ज्यांचें देवा ! पाय वंदणें तें ।
त्याच भीष्म - द्रोणां मारूं काय सांग हातें ॥
( चाल ) धनुर्वेद द्रोणांनीं तो पढवुनी अम्हांसी ।
धीर वीर केलें कृष्णा ! याच भारतीसी ॥
तेच वधू स्वार्थास्तव मी काय पुण्यराशी ? ।
जळो जळो हि पाशवि वृत्ती तुडवि जी नितीतें ॥३५॥
हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले -

॥ पद ॥ ( नृपममता )
करुं नये शोक तो ज्याचा । त्याचाच शोक तूं करिसी ॥
हें खरें असुनिया पार्था । ज्ञात्याचा आव तूं आणिसी ॥
( चाल ) जो ज्ञानें असें कीं पुरा, तयासी जरा, शोक नरवरा ।
कधिंच ना होतो । अज्ञानी गोता खातो ॥ निशिदिनीं ॥३६॥

॥ पद । ( पोरे नच थोर )
यावनाळ तोच खास । दाण्यासह कणिस ज्यास ।
येत, निवळ बाटुकास । मनुज ना पुसे ॥
कणिसरहित बाटुकासी । बैल गुरें खाति हर्षीं ।
वाटुक तें मानवासी । मुळिंच ना पटे ॥
हीच स्थिति आहे येथ । शोधुनिया पाहें त्वरित ॥
त्रिपुटीनें भ्रांत चित्त । होउं द्यावें ना ॥
पृथक् पृथक् त्रिपुटीचा । करुं नकोस कायमचा ।
विचार, बोल दासगणुचा । ध्यानिं नित धरी ॥३७॥
“ पहा ! जोंधळे येण्याला ताट; कणीस आणि त्याला आलेली कणसें मिळून जोंधळा म्हणतात. नुसत्या ताटाला व कर्णासाला जोंधळा म्हणून चालत नाहीं. कर्णासाशिवाय दाणे येत नाहींत व ताटाशिवाय कणीस येत नाहीं. याच क्रमाला ध्यानांत ठेवून चतुर माणसांनीं वेदांताचा उपयोग करून घ्यावा लागतो. कोणत्याहि त्रिपुटीचा आगमापासून निगमापर्यंत पूर्ण विचार करावा म्हणजे खरें ज्ञान होऊन तो मोक्षाचा अधिकारी होईल. या ज्ञानाची फ़ार मौज आहे.

॥ श्लोक ॥ ( वसंततिलक )
वेदांतशास्त्र अति उत्तम हीतकारी ।
तेंची सदैव आणणें आपुल्या विचारीं ॥
वेदांत पूर्ण कळल्यावरि त्या नराला ।
नाहीं कुठेंच भय, तो जगिं ईश झाल ॥३८॥
“ खरा वेदांत कळल्यावर जसा ईश्वर कर्तृत्ववान आहे तसा त्रिकालबाधित तत्त्वाला जाणणारा मनुष्यहि सर्वशक्तिमान होऊन ईश्वरपदाला पावतो. ” पण या ज्ञानांत दोन भेद आहेत.

॥ पद ॥ ( नृपममता )
अज्ञान अपेक्षित ज्ञाना । मानिना खरा जो शहाणा । साच कीं ॥
( चाल ) या ज्ञानिं ढोंग माजतें, भ्रमीं पाडितें, सत्य मिथ्य तें ।
कळें न बुद्धीसी । कोठून मोक्ष मग त्यासी ॥ अर्जुना ॥३९॥

॥ श्लोक ॥ ( इंद्रवज्रा )
अज्ञान सापेक्षित ज्ञान ज्याला । झालें करी तोच अशा कृतीला ॥
ना खालची तो कधिं घाण काढी । बरें दिसाया वरि शालजोडी ॥४०॥
“ अशा प्रकारचा मनुष्य ग्रंथावरून अगर कोणाचें ऐकून त्याचा अभ्यास करून किंवा थाटमाट करून साधुपुरुषाचा - ज्ञानीपुरुषाचा - दिखाऊ - पणापुरता आव आणील. पण तो खरा ज्ञानी होण्याची इच्छा करीत नाहीं. तो आपलीं घाण कृत्यें चांगुलपणाच्या शालजोडीनें झाकतो, पण आंत घाण तशीच ठेवतो.

॥ पद  ( राणी ती ) ॥
गोकाकि फ़ळें करण्याला । येतसें खर्च कितितरी ।
पाहण्यापलीकडे त्याचा । उपयोग नाहीं भूवरीं ॥
( चाल ) जांभूळ एक पैशास, खरें ये खास, तेच नकलेस ।
जबर किंमत । देणें भाग गणू सांगत ॥४१॥
या शाब्दिक व बेगडी वेदांताच्या कांहीं वाक्यांना बळी पडून तूं आपलें नुकसान करून घेऊं नकोस. तेव्हां खरें खरें ज्ञान प्राप्त करून घेऊन मोहाचा व लोभाचा त्याग कर, म्हणजेच खरा मोक्ष तुझ्या हातांत येईल.

॥ श्लोक ॥ ( पृथ्वी ) ॥
म्हणून भ्रमिं ना पडे आधि विचार याचा करी ।
सुबुद्धि निज ठेवणें सतत ती ठिकाणावरी ॥
तिला घसरुं तूं दिल्या गति न होय बापा बरी ।
मिळेल बघ मातिला यश तुझें सख्या भूवरीं ॥४२॥
लोभमोहांतील एकाचा उदय झाला कीं तो दुसर्‍याला साहचर्याकरितां बोलावितो आणि ते दोघे मिळून मनुष्यप्राण्याचा घात करतात. जो खरा सज्जन आहे तो कसलाहि प्रसंग आला तरी अनीतीच्या मार्गाला जात नाहीं. मला तूं तीन तीन वेळां भीष्मद्रोणांचीं नांवें काढून विचारतोस, पण तुला भीष्मद्रोणांची योग्यता समजली नाहीं.

॥ आर्या ॥
पुण्यश्लोक अश्या त्या भीष्म द्रोणांचिया सुचरितासी ।
आमूलाग्रह न आणिलें चित्तीं, म्हणुनी असें बरळतोसी ॥४३॥
“ अरे अर्जुना ! भीष्मद्रोण हे ज्ञानी असून त्यांनीं आत्म्याचें स्वरूप जाणलें आहे. तेव्हां -

॥ दिंडी ॥
समरभूमी सोडून पळाल्यास ।
अती होइल कीं दु:ख उभयतांस ॥
द्रोण म्हणतिल मी षंढ अर्जुनाला ।
धनुर्विद्येचा व्यर्थ बोध केला ॥४४॥
या दोन्ही गोष्टींचा विचार तूं कर. तुझा हा जो समजुतीचा घोटाळा झाला आहे तें अज्ञान नाहींसें करण्यासाठींच -

॥ दिंडी ॥
न्याय, नीति, व्यवहार सांगणारी ।
शुद्ध ज्ञाना चित्तांत ठसविणारी ॥
हात अठरा आहेत ज्या गितेस ।
अशी येइल तुज देवि सांगण्यास ॥४५॥
न्याय, नीति, व्यवहार व सर्व त्रिपुट्या कशा होतात वा कशा असतात याचें ज्ञान करून देणारी अठरा अध्यायांची श्रीमद्भगद्गीता माझ्या कृपेनें प्रगट होईल. ती सर्व तुला सांगेल. ” असें म्हणून देवानें आपल्या कृपादृष्टीनें अर्जुनाकडे पाहिलें आणि मोहदृष्टीनें कौरव सैन्याकडे पाहून गीता सांगण्यास सुरवात केली. तोच हा श्रीगीतेचा जन्म होय.

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP