मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
नागबलि प्रयोग

नागबलि प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


कर्त्यानें ब्राह्मणांच्या सभेला प्रदक्षिणा करावी. नमस्कार करावा. तिच्यापुढें गाई व बैल यांची किंमत ठेवून अथवा त्याचें अर्धी किंमत ठेवून सपत्नीक अशा माझ्या ह्या जन्मीं अथवा जन्मांतरी ज्ञानानें अथवा अज्ञानानें जो सर्पवध झाला असेल त्या दोषाचा परिहार करण्याकरिता आपण प्रायश्चित्त सांगा. आपण “ सर्व धर्म जाणणारे ” अशा अर्थाचें श्लोक बोलून आपण माझ्यावर अनुग्रह करावा, असें बोलून नमस्कार करावा. त्यांनीं चवदा कृछ्र प्रायश्चित्तानें अमुक प्रत्याम्नायद्वारानें पूर्वांग आणि उत्तरांगसहित प्रायश्चित्त केल्यानें तुझी शुद्धि होईल असा उपदेश केल्यावर देशकालाचें संकीर्तन करून सभेनें सांगितलेले चवदा कृच्छ्र प्रायश्चित्त सांगितलेलें त्याच्या प्रत्याम्नायानें करीन असा संकल्प करून क्षौर इत्यादि विधिपूर्वक प्रायश्चित्त करावें. क्षौर न केलें तर दुप्पट असा २८० कृछ्रांचा प्रत्याम्नाय करावा. पूर्वोच्चरित अशा प्रकारच्या पुण्य तिथीवर माझा सर्पवधाचा दोष परिहार होण्याकरितां ब्राह्मणाला लोहदंडाचें दान अथवा त्याचें मूल्य दान करीन असा संकल्प करून ब्राह्मणाची पूजा करून स्वस्ति असो असें बोलावें. हा लोहदंड सर्पवधाचा दोष हरण करणारा हा दक्षिणासह अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या ब्राह्मणाला मी देत आहे हा तुम्ही घ्यावा. नंतर “ देवस्यत्वा० ” पृष्ठ ९४ ओ. १ असा मंत्र बोलून मी घेतो असें ब्राह्मणानें बोलावें. नंतर गुरूची आज्ञा घेऊन प्रियंगु, तांदुळ, सातु गहूं अथवा तीळ ह्यांपैकी कोणत्या तरी एका पिठानें पंचगव्यांत भिजवून सर्पाची आकृति करावी, ती आकृति सुपांत ठेवून सर्पाची “ एहिपूर्व० ” या मंत्रानें प्रार्थना करावी. नंतर “ भुजंगेशाय० ” या मंत्रानें आवाहनापासून तो षोडश उपचारांनी पूजा करावी, पुष्पांजलि देऊन नमस्कार करावा. हे सर्पा हा बलि घे, माझा अभ्युदय कर असें बोलून पायस इत्यादिकांचा बलि समर्पण करावा. हात आणि पाय धुवून आचमन करावें. नंतर शुद्ध भूमीवर उभे राहून प्राणायाम करून संकल्प करावा कीं, पत्नीसह माझ्या या जन्मीं अथव दुसर्‍या जन्मीं ज्ञानानें अथवा अज्ञानानें माझ्या हातानें झालेल्या सर्पवधापासून झालेल्या दोषाचा परिहार करण्याकरितां तसेंच माझें दारिद्र्य व अनपत्यत्व निवारण होऊन आयुष्मान् व गुणवान् व सच्छील पुत्रपौत्रादि संतति वृद्धीकरितां सर्पसंस्कार करीन अस संकल्प करून स्थंडिलावर लौकिक अग्नि स्थापन करून अन्वाधान करावें. ह्या सर्पसंस्कार होमाचे कर्मामध्यें देवताचा स्वीकार करण्याकरितां अन्वाधान करीन. स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३७ प्यारा ६ “ चक्षुषी आज्येन ” पर्यंत म्हणून ह्या ठिकाणीं प्रधान देवता अग्नि, वायु आणि सूर्य इतक्या आहेत, इतक्यांना उद्देशून भूर्भुव:स्व: अशा व्याहृतीनें सर्पाच्या मुखांत प्रजापतीला तुपानें आणि बाकी उरलेल्या तुपानें सर्पाला उद्देशून सद्य:होम करीन. दोन समिधा अग्नीचे ठिकाणीं हवन करून नंतर अग्नीचे अग्नेयदिशेस जमिनीवर पाणी शिंपडून चिति करावी. अग्नीला ( स्थंडिला सभोवती ) व चितीला परिसमूहन करावें. अग्नेयदिशेस अग्र केलेल्या दर्भांनी परिस्तरण करावें, त्यावर सहा पात्रें ठेवून इध्माधानापासून तों आघारचक्षूष्पर्यंत सर्व कर्म ( स्थालीपाक पृष्ठ ३९ प्यारा १० पासून पृष्ठ ४६ प्यारा २३ पर्यंत करावें. ) नंतर सर्पाला घेऊन दक्षिणेस शिर करून त्या चितीवर ठेवावा, पाण्याला आणि कानाला स्पर्श करून अग्नीजवळ यावें. नंतर प्रधानहोम करावा तो “ व्यस्तसमस्त ”० येथून “ ॐभू:स्वाहा ” येथपर्यंत म्हणून अग्नीमध्यें हवन करावें, हे हवि तुझे आहे माझें नाहीम असें बोलावें. अशा रीतीनें भुव:स्वाहा व स्व:स्वाहा म्हणून अग्नींत आहुती घालाव्यात. नंतर ॐ भूर्भूव:स्व:स्वाहा म्हणून चवथी आहुती सर्पाच्या मुखांत घालावी. उरलेलें तूप स्रूवनेंच सर्पाचे देहावर शिंपडावें. येथें स्विष्टकृत् इत्यादि नाहीं. स्रुवा तेथेंच ठेवून यज्ञाचीं पात्रें बर्हिषावर ठेवावींत. नंतर चितीला प्रदक्षिणा करावी. नमस्कार करावा क्षमा मागावी, हातानें घेतलेल्या चमसजलांनीं ( यज्ञपात्रांत ) उदक घेऊन ॐ भूर्भुव:स्व: म्हणून सर्पावर हातानें पाणी शिंपडावें. “ अग्नेरक्षांणो० ” हा मंत्र म्हणून सर्पाला अग्नि द्यावा, “ ॐ नमोअस्तु० ” हे मंत्र म्हणून उपस्थान करावें “ कर्कोटक० ” येथून “ नमोनम: ” पर्यंत म्हणून जळलेल्या सर्पाचे उपस्थान करावें. नंतर “ त्राहित्राहि० ” येथून “ क्षमस्वमे ” येथपर्यंत म्हणून प्रार्थना करावी. स्नान करून यावें. “ भूर्भुव:स्व: ” म्हणून दूध व तूप अग्नीवर शिंपडावें. सर्प जळल्यावर उदक अग्नीवर सिंचन करावें. येथें अस्थिसंचयन करावयाचें नाहीं, हें सर्व सव्यानेंच करावें. त्यानंतर स्नान करून आचमन करावें आणि घरीं जावें. कर्त्यानें पत्नीसह शौनकमते तीन दिवस आशौच धरावें आणि भूमीवर निजून हविष्यान्न खावें ब्रह्मचर्यव्रतही पाळावें. बौधायनाच्या मतानें एक रात्र अशौच आहे.
नंतर चवथ्या दिवशी सचैलस्नान करून आठ ब्राह्मणांना निमंत्रण देऊन आचमन करून प्राणायाम करून देशकालाचें संकीर्तन करावें. नागबलीचे अंगभूत असें ब्राह्मणभोजन करीन असा संकल्प करून सर्प स्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, अशाच रीतीनें अनंतस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, शेषस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, कपिलस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, नागस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, कालिकस्वरूपी ब्राह्मनाला हे पाद्य शंखपालस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य, भूधरस्वरूपी ब्राह्मणाला हें पाद्य अशा रीतीनें क्रमानें त्या आठ ब्राह्मणांचें पाय धुवून त्यांच्याकडून आचमन करवून व आपणही स्वत: आचमन करून ब्राह्मणांना पूर्वेस तोंड करून अथवा उत्तरेस तोंड करून बसवावें आणि सर्पस्वरूपी ब्राह्मणाला “ भूर्भुव:स्व: ” असें बोलून आसन द्यावें, असेंच अनंत स्वरूपी ब्राह्मणांला “ भूर्भुव: स्व: ” असें बोलून आसन द्यावे. ह्याप्रमाणें आठांनाहीं तें तें सर्पाचें नांव घेऊन व्याहृतीनें आसन द्यावें. अशाच रीतीनें क्षणही करावा. अशाच रीतीनें सर्प इत्यादिकांचें नाम घेऊन आपण यावें असें म्हणावें. हेम सर्पस्वरूप हें तुला गंध दिलें आहे, अशाच रीतीनें धूप, दीप, वस्त्र इत्यादि द्यावें. अशा रीतीनें दुसर्‍याचेंही पूजन केल्यावर चौंकोनी मंडलावर पात्रें ठेवून खीर भक्ष्य पदार्थ इत्यादिक वाढून गायत्रीमंत्रानें प्रोक्षण करावें; पाणी फ़िरवावें हें वाढलेलें अन्न सर्पाला अमृतरूप असो व पुढें वाढावयाचें तेंही अमृतरूपी तृप्ती होईपर्यंत असो, हे अन्न माझें नाहीं. अशा रीतीनें सर्व सर्पांच्या नावाप्रमाणें सर्व ब्राह्मणांना करावें. आचमन झाल्यावर पूर्वेस अग्र केलेल्या दर्भावर हे सर्पा, हा तुझा बलि आहे माझा नाही, इत्यादि आठ नामात्मक मंत्रांनीं पिंडंरूपीं पायस बलीचें अर्पण करावें. वस्त्र इत्यादिकांनीं पूजन करून ब्राह्मणांना तांबूल देवून विसर्जन करावें. हे सर्व कृत्य सव्यानेंच करावें.
नंतर स्थंडिलाच्या पूर्वेस सप्तधान्यावर महीद्यौ० ( पृष्ठ ८ ओ. ९ ते पृष्ठ ११ ओ. ३ पर्यंत ) विधीनें स्थापन केलेल्या कलशावर वंशपात्र ठेवून त्यावर वस्त्र ठेवावे व त्या वस्त्रावर सुवर्णाचा नाग प्राणप्रतिष्ठापंचामृतस्नानपूर्वक नागगायत्रीमंत्राने स्थापन करून पुरोषसूक्तानें अभिषेक करावा. गुळ, दूध, तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. षोडशोपचारपूजा करून “ ब्रह्मलोके० ” इत्यादि श्लोक.
म्हणून प्रार्थना केल्यावर आचार्याची पूजा करावी. केलेल्या सर्पसंस्कार कर्माची सांगता होण्याकरितां हा सोन्याचा नाग, कलश, वस्त्र आणि दक्षिणा ह्यांसह तुम्हांला देत आहे. ह्या सुवर्ण नागदानानें अनंतादि सर्व नाग प्रसन्न होवोत. नंतर त्या आचार्याला वृषभासह कृष्णवर्णाची गाय अथवा तिचें मूल्य द्यावें. नंतर दंपतीचें पूजन वस्त्र, अलंकार इत्यादिकांनी करावें. यथाशक्तीप्रमाणें दुसर्‍या ब्राह्मणांचेंही पूजन करून “ यस्यस्मृत्या० ” हा मंत्र म्हणून मी जें सर्पसंस्काराख्य कर्म केलें आहे; तें सर्व कर्म तुम्हां ब्राह्मणांच्या वचनाचरून आणि श्रीपरमेश्वराच्या प्रसादे करून परिपूर्ण असो, तसें असो असें ब्राह्मणांनी बोलावें. नंतर कर्माची सांगता होण्याकरितां यथाशक्त्यनुसार ब्राह्मण भोजन करावें आणि त्यांना भूयसीदक्षिणा देऊन कर्म समाप्त करावें. असा हा नागबलि प्रयोग संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP