मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
प्रिय कविते अमरसुते तेजाच...

शारदेस - प्रिय कविते अमरसुते तेजाच...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


प्रिय कविते अमरसुते तेजाची तूंच उज्ज्वले, खाणी;
मर्त्य जगीं अमर तुझी विश्वाला स्फूर्ति देतसे वाणी.
रविशशितारकमाला सायंतन मंगलें तुझीं माते,
तव अरण - वरुण - इंद्रहि, सुरलोका भूति अर्पितो तूंतें
ग्रहगोलांवरुनि तुवां मंगलता मूर्त आणिली खालीं;
हिमगिरिवर मानवता मुनिवदनीं बोल बोलती झाली.
आले पुण्य ऋषीश्वर, अवतरले भरतमंडलावरतीं;
स्वर्गाहूनी अधिक या भूमीची वाढली तयें महती,
तीं दिव्य अद्रिशिखरें हिममंडित सूर्यमंडलाखालीं
भासविती दिव्य उषा अक्षय कीं उतरुनी जनीं आली.
ते शुद्ध पूत निर्झर उज्ज्वलता मूर्त पसरिती पाहीं !
धांवति कडयाकडयाहुनि मधुगीतें धुंधकारुनी जाई.
पसरे कर्कश कानन. रान भरे’
घोर दरी किर्र करी मैदानहि थोर त्यापुढें पसरे.
असल्या चमत्कृतीचे पाहुनि नाना विलास नयनांहीं
या क्षुद्र मर्त्य देहीं आसक्ती अल्प राहिली नाहीं.
निर्झरमय, काननमय, गायनमय दिव्य जाहला देह,
सृष्टीचेंहि पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह.
मग गूढ अमूर्ताचीं मधुगीतें गोड गावया लागे,
आनंदरूप झाली मानवता, मृत्यु राहिला मागें.
ही सर्व कृपा देवी, तव चरणाचीच, शारदे, वाटे;
सान मनें हीं अमुचीं तेजाच्या तूंचि लाविलीं वाटे;
रविकिरणीं भासतसे कीं निर्झरतांडवांत नाचतसे
पुष्पांवर हांसतसे रूप तुझें क्षणिक मानवांस दिसे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP