मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
कसें हाकारूं । शीडाविण दु...

दुबळें तारुं - कसें हाकारूं । शीडाविण दु...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं
तुडुंब सागर भरला आहे,
तुष्ट काल झंझानिल वाहे,
तुफान तेणें खेळत राहे,
कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ? १

सुखदु:खाच्या लाटा येती,
क्षुब्ध समुद्रातें त्या करिती,
तेणें उपजे चित्तीं भीति
कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ? २

षडिपु जलचर पसरुनि जाळें
स्वैरगतीनें फिरती सगळे,
ओढुनि घेतिल नौका स्वबळें,
कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारुं ? ३

मायावंतीं भ्रमेल का हें ?
भमतां प्रलयीं बुडेल का हें ?
चित्ता चिंता जाळित आहे;
‘कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ?’ ४

पार पाहतां न दिसे कांहीं,
दुसरा त्राता कोणी नाहीं,
सदा भयाची जाचण हृदयीं,
कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ? ५

नको नको हा प्रवास याचा !
अब्धि नव्हे दरबार यमाचा;
सोडुनि द्यावा पंथचि याचा,
कसें हाकारूं । शीडाविण दुबळें तारूं ? ६


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP