मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
बोलवितात । विक्राळ यमाचे ...

यमाचे दूत - बोलवितात । विक्राळ यमाचे ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


बोलवितात । विक्राळ यमाचे दूत,
गिरिशिखरावर आ पसरोनी,
काळ्या अंधारांत दडोनि,
किंवा पडक्या बुरुजावरूनी,
शब्द येतात । ‘चल नको बसूं जगतांत’

खोल खोल भेसुर दरडींत,
पडक्या घोर जुन्या विहिरींत
अगवुनि पिंपळ वर येतात
ते म्हणतात । ‘चल जगांत दुसर्‍या शान्त’

परिस्थितीचीं कठोर भूतें
क्षणांत करिती शून्य मनातें,
पूर्वस्मृति मग ताजी होते.
जळतें त्यांत । हृदयाचें होऊनि भूत.

क्षणभर सांपडतां एकांत
विचारलहरी उदबवतात,
विझते प्रेमाशांची ज्योत,
पेट घेतात - हे असंख्य वणवे आंत.

पुस्तुअक वाचायाला घ्यावें,
कवितेनें कीं मन रमवावें,
सृष्टीचें सौंदर्य बघावें,
हृदयीं तों तों । हा विकार द्दढतर होतो.

वेडें भूत बनोनी जावें.
लिहिलें दैवीं काय असावें,
न कळे तोंड कुठें लपवावें,
कां छळतात - हे असे यमाचे दूत ?

धांव धांव सदया जगजेठी !
दया करीं रे दीनावरतीं,
आशा तुजवांचुनिया परती
नुरली कांहीं - जननी गे, धांवुनि येईं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP