प्रसंग सहावा - प्रकृतिपुरुष-लक्षण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐसें संपलें शब्‍दाचें विंदान । सांगेन प्रकृतिपुरुषाचें लक्षण । वेगळाले करूनियां महिमान । टीका बयाजवारेसी ॥१००॥
प्रकृतिपुरुषाचें अंगसंगें ऐका । सवेगे विकासल्‍या अष्‍ट नायका । त्‍या सांगतों ऐकावें उन्मेखा । श्रोती श्रोतेपणीं ॥१०१॥
बाळपण तरुणपण पालटे । वार्धक्‍य शेवटी विटोनि फाटे । प्रकृति देहढाळ न पालटे । अहेव अवतरणी ॥१०२॥
उदकीं शेवाळ अनेक जीव जनीं । तैसी हे प्रकृति-पुरुषाची मिळणी । जीवांमाजी जीव उद्भवोनी । विस्‍तार वाढवी वाढे ॥१०३॥
जसी लहरी आवरेचिना समुद्रा । तैसी प्रकृति आवरेच ना चतुरां । नेऊनि आदळली अशुभ अनाचारा । परतोनि पस्‍ताविले ॥१०४॥
नर नारद आत्‍मज्ञानी संपूर्ण । यावेगळें त्रैलोक्‍याचें गमन । कळि लवितसे अवगुण । देहें प्रकृतिभाव ॥१०५॥
श्र्वान हरण एके खाणीचा ठेवा । भिन्न भिन्न प्रकृतींचा चाले दावा । त्‍यामाजी संचरती शक्तीच्या मावा । द्वैत दावा धरूनियां ॥१०६॥
गरूडा पाठी आरूढे मुरारी । सेवकराज म्‍हणवी परोपरी । प्रकृति किरडांचें भक्षण करी । निज सेवक होऊनियां ॥१०७॥
रिद्धि सिद्धि हनुमंत बलात्‍कारी । नित्‍य हृदयीं रघुनाथ उच्चारी । उडोनि फळें पानें भक्षण करी । देह प्रकृतिसंगें ॥१०८॥
आहार निद्रा मैथुन भयभीता । पाप न्याहाळितां प्रकृतीची सत्ता । रुसे ठाके लाजे मागे मान्यता । स्‍वभाव प्रकृतीचा ॥१०९॥
थोरांत बैसल्‍या भीड सांकडी । पोरें खेळवितां वाचा करी बोबडी । मोहें पाघळुनि शेंबुड फेडी । ते प्रकृति देहढाळ ॥११०॥
रडे फुंदे गहिंवरे शोक करी । अनेक रंग करी परोपकारी । निंदा कुचेष्‍टा दंभ भरोउमरी । प्रकृति स्‍वभावें ॥१११॥
पळे सळे दिमाख करित असे । मोडी हात पाय चोळी पुसिपुसे । डोळे फिरवी ढवाळी बोलतां हांसे । प्रकृतिचेनि संगें ॥११२॥
शुच अशुच भावना भावितां । बोले ना बोले अबोला धरितां । ही प्रकृतीची अवलक्षणता । तुम्‍ही अवधारा श्रोते हो ॥११३॥
विसर पडे आठवी चटपटीं । स्‍वप्नीं लिंगदेहासंगें सांगे गोष्‍टी । ही मनासंगें चंचळता मोठी । प्रकृति वासनेची ॥११४॥
हेतु चित्त मन पवन जागृति । कृपेसंगें तुर्येची असे वस्‍ती । यालागीं स्‍वप्नीं सावध प्रकृति । पुरुषसंगें ॥११५॥
स्‍थूळ स्‍वप्नीं आवरणाचा बडीबा । सांगो नेणें ते कृपा आरंभा । स्‍थूळ रक्षावया गुंतली वालभा । प्रकृतिसंगें ॥११६॥
जागृतींत सांगावया आरुता । जागृति स्‍वप्नीं सांगावया नाहीं सत्ता । ते ओळखा अविद्येची कल्‍पनता । स्‍थूळ प्रकृतिसंगें ॥११७॥
ऐसी प्रकृतिपुरुषाची संवाद मिळणी । त्‍यांत मिश्रित पंचमा साजणी । आहिक्‍यीं येरूनयेरांचे गुणीं । अष्‍टधा गुणीं प्रकृति ॥११८॥
ज्‍या अविद्येसी प्रकृतीची उन्मत्तता । विचार लोपूनि होय दुश्र्चिता । काकुलती येऊनि म्‍हणे मागुता । कृपा भिक्षा घाली ॥११९॥
सर्वदा एकरूप आत्‍मा असे । त्‍यांत प्रकृति शक्ती भिन्न भिन्न तमासे । आभासोनि भासतां करी तमासे झांसे । येरूनयेरांचे ॥१२०॥
पुरुष प्रकृतीस व्याला पितेपणें । भ्रतार म्‍हणोनि पर्णिला तिनें । तो तीस बोभावे सुनेच्या नात्‍यानें । ऐसें दोहीचें सन्निधान ॥१२१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP