योगसंग्राम - प्रास्‍ताविक ८

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शेख महंमदांचा ‘योगसंग्राम’ म्‍हणजे परासाधनमार्गावर एक सुंदर रूपक आहे. शेख महंमदांची सर्वच रूपकें अगदी सुलभ, रोजच्या व्यावहारिक शब्‍दांत व वर्णनांत केली गेलेली आहेत. ‘गायका’ या रूपकांत जसें गोपाळाचे मिषानें वृत्तीप्रवृत्ती हींच गायाबैलखिल्‍लारें समजून त्‍यांच्या पालनदमनाचें चित्र अगदी सहजपणें रंगविले आहे; त्‍याचप्रमाणें हा ‘योगसंग्राम’ म्‍हणज जिवाशिवाचें किंवा शिवशक्तींच्या भांडणाचें रूपक आहे. यांत ‘आत्‍मा’ वीरानें ‘मन’ तेजियावर स्‍वार होऊन संकल्‍प, विकल्‍प, क्रोध, अहंकार, आळस, अंगमोडा, गुणावगुण, इत्‍यादि सर्व ‘देह’ राज्‍यांतील सरदारांचा पाडाव करून ब्रह्मांडशिखर गांठण्यापर्यंतची मजल सतराव्या अध्यायांत व पुढील विजयाचा भाग अठराव्या अध्यायाच्या पूर्वार्धांत आला आहे. तत्‍पूर्वीच्या प्रसंगांत संग्रामसाहित्‍याची तयारी व शत्रूची हेरी यांचे वर्णन आहे. शेवटी जोडलेल्‍या विषयसूचीवरून हा पूर्व कथानकाचा भाग लक्षांत येईलच. शेख महंमद मुमुक्षुला पराविद्येसाठी प्रथम आचारविचार शुद्धीची आवश्यकता पटवितात. नंतर शिष्‍यत्‍व मिळालेच तर शत्रूची हेरी करून त्‍याचबरोबर झगडणार्‍या तयारीचा मार्ग सुचवितात. शेवटी तयारी होतांच संग्राम देऊन आत्‍म्‍यानें कोणतीं शिखरें गांठून देहावर मात करावी व देहोपसर्ग विविध तापांपासून मुक्ति करून घ्‍यावी याचे दिग्‍दर्शन करितात. ह्या विवरणांत शेख महंमदांनीं गीता, भागवत, षड्‌दर्शनें, प्रबंध, शास्त्रें, पुराणें, कुराण आदींचा आधार घेतला आहे. पुराणांतील दृष्‍टांतासाठी घेतलेल्‍या कथाभागांत हिरण्यकश्यप व प्रल्‍हाद, पिंगळा, कर्कोटक व श्रावण यांच्या कथा थोड्या विस्‍तारानें दिल्‍या आहेत. विशेषतः पवित्रच पवित्राला जन्म देतें हा सिद्धांत असत्‍य, कर्मशुद्धीपेक्षां मनशुद्धीच श्रेष्‍ठ, साधुनिंदा त्‍याज्‍य व दाशरथी रामापेक्षां अनादि राम वेगळाच हे अनुक्रमें या कथावर्णनामागील संकेत होत. यांशिवाय शेख महंमदांनीं जे अनेक दृष्‍टांत दिले आहेत ते तत्‍कालीन लोक किती बारकाईनें सृष्‍टिनिरिक्षण करीत व सृष्‍टीशीं कसे तादात्‍म पावत याची चांगली कल्‍पना देतात. शेख महंमदांनी कलंकी अवताराचा व जगबूडाचा भाग बराचसा इस्‍लामी समजुतींवर आधारलेला आहे. इस्‍लामी धर्मियांचा ईश्र्वरनिवाड्यावरील दृढ विश्वास हाच मुख्यतः त्‍यांच्या प्रेतें व दफनस्‍थानें-मग ती कोणत्‍याहि धर्मियांची असोत-यांच्याबद्दलच्या जन्मजात आदराला कारणीभूत आहे. मात्र शेख महंमदांच्या या संकीर्ण निवेदनावरून तत्‍कालीन व तत्‍पूर्वकालीन विद्वान तत्त्वज्ञानांतील प्रमेयांच्या सत्‍यासत्‍यतेची जितकी कसोशीनें चिकित्‍सा करीत तितकी ते पुराणांवगैरेवरून दृष्‍टांतासाठी घेतलेल्‍या कथांच्या सत्‍यासत्‍यतेबद्दल किंवा ऐतिहासिक प्रामाण्याबद्दल चिकित्‍सा करीत नसत असें दिसून येते.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP