शेख महंमद चरित्र - भाग १४

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


महिपतिबाबांना नंतर बारा वर्षांनीं हे प्रसंग दोन नसून तो एकच होता असें पटलें व एकनाथ गुरूची अवज्ञा करतो ही विचारसरणीहि अनुचित वाटली असावी म्‍हणून या दोन कथांतील फक्त दुसराच प्रसंग अधिक विस्‍तारानें लिहिलेल्‍या ‘भक्तलीलामृतां’ तील एकनाथांचे आख्यानांत दिला आहे. त्‍याचा महत्त्वाचा भाग महिपतीच्याच शब्‍दांत देतो. ‘‘राजयाच्या आज्ञेकरोनि । सदरेसी न जाती तये (भृगुवासरी) दिनीं । ऐसी पद्धति घातली त्‍यांनीं । महत्‍कार्य जाणोनि आपुलें ॥१५६॥
पर्वताच्या मस्‍तकीं साचार । असें एक विशाल सरोवर । बहुत निर्मळ तेथींचें नीर । दुजयाचा पायरव तेथें नसे ॥१५७॥
.....सहस्त्र लिंगें करोनि पूजित । विधियुक्त ते समई ॥१७३॥
पूजाविसर्जन करोनि समस्‍त । मग जगद्‌गुरूसी आणित । तंव तेथें पातलें अनुसुयासुत । परि वेष दिसत मलंगाचा ॥१७४॥
....मग बैसोनि उभयतां निकटीं । आत्‍मसुखाच्या बोलती गोष्‍टी । एकनाथ ऐकोनि कर्णसंपुटी । संतोष पोटीं मानित ॥१८१॥
मग मृत्तिका पात्र काढोनि पाहें । जनार्दनासी आज्ञापी दत्तात्रय । पैल ती कुतरी बैसली आहे । तरी दूध लवलहिं काढावें ॥१८२॥
ऐसी आज्ञा होतांचि निश्र्चिती । जनार्दनें साहनक घेतली हातीं । कुतरी दोहोनि सत्‍वर गती । दुग्‍ध काढिती पात्रभर ॥१८३॥
स्‍वस्‍थानीं बैसले अवधूत । तयापुढें आणोनि ठेवित । वाळके कुटके (माधोकरींतील) काढोनि त्‍वरित । त्‍यामाजी चुरित स्‍वहस्‍तें ॥१८४॥
......जनार्दन आणि दत्तात्रेय मूर्ति । उभयतां एके पात्रीं जेविती । स्‍वानंदरसी जाहलि तृप्ती । कर शुद्ध करिती तेधवां ॥१८८॥’’.
नंतर एकनाथास पात्र धुवावयास सांगितले. त्‍यांनी सरोवरांत धुवावयास नेलें. प्रथम आंतील उच्छिष्‍ट प्रसाद म्‍हणून सेवन केला. नंतर त्‍यांस त्‍या मलंगानें खरे स्‍वरूप दाखविलें असा पुढें शेवट केला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP