मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें १९१ ते १९२

गोविंदकृत पदें १९१ ते १९२

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १९१ वें    

श्रीगणराज वरदकरमंडित विघ्‍नहरण शुभदानी ।
लंबोदर गुणमंदिर सुंदर सुरवरनरवरदानी ॥ ध्रुवपद.॥
सिंदुरचर्चित दिव्य तनू पितांबर जघनिं विलासे।
मंदरसम अतिसुंदर वपुवारि रविशशितेज प्रकाशे ॥ श्री० ॥१॥
ध्वजवज्रांकुश चिन्ह सकळ शुभयुग्‍म पदाब्‍िंज विराज ।
नखिं दशधा शशि जडला पदिं ब्रिद पैंजण त्रिभुवनिं गाजे ॥श्री०॥ ॥२॥
नागकटी कटिसूत्र सरळ वरि नभिसरोजी हीरा ।
रत्‍नजडितकरभूषणारजित शिरीं विलसित शुभ चीरा ॥श्री०॥३॥
नागानन मनरंजन भंजन ध्यानें भवभजकांचा ।
शुंडा सरळ वितंड द्विरद अति चंडपराक्रम ज्‍याचा ॥ श्री० ॥४॥
गंडस्‍थळमदमंडित स्रवती भृंगावळि रस घेती ।
शूर्पकर्ण वारि वारितसे परि पुनरपि धांवुनि येती ॥ श्री० ॥५॥
मृगमदर्तिलकविराजित मायाललित कपोल विराजे ।
पाशांकुशशुल अंगुलिकांतरिं दूर्वांकुर शिरिं साजे ॥ श्री०    ॥६॥
तो महाराज वरदगुरु गणपति अंतरसदनविलासी ।
सप्रेमें कनवाळु प्रसाद दिधला गोविंदासी ॥ श्री० ॥७॥

पद १९२ वें.

स्‍वच्छंदें नृत्‍य करीतो स्‍वानंदपुरनिवासी ।
त्रिभुवन जन मोहित झाले देहस्‍मृति नकळे त्‍यासी. ॥ ध्रुवपद. ॥
स्‍थिरचरजड चालविताहे सत्तेनें श्रीगणराणा ।
आरंभी स्‍तविती ज्‍यातें वंद्य श्रुतिशास्त्रपुराणा ।
ब्रह्मप्रियादिक सखे सारे, नर्तवितो लावुनि ध्याना ॥

चाल ॥
हालति ना पादप नाना ।
ॠषि मुनि तपि त्‍यागिति ध्याना ।
सुर विसरति अमृतपाना ॥ स्‍व० ॥१॥
        
गौतमसरिताजळ तेव्हां वाहतां ते वेग विसरली ।
नृत्‍यध्वनि मंजुळ तीच्या द्वयकर्णांच्या मधें शिरलीं ।
मृगव्याघ्रचमरि वैरातें त्‍यजुनि एके स्‍थळिं रमली ॥

चाल ॥    
द्वेषबुद्धि सर्तहि हरली ।
मनोवृत्ति तयाची फिरली ।
गणपतिच्या ध्यानीं मुरली ॥ स्‍व० ॥२॥
        
ॠषिकांता सरितेलागी आणाया गेली पाणी ।
जलकुंभ भरूं विसरली तटिं बसली न भरी पाणी ।
कामिनि एक वेणी विंचरतां मस्‍तकीं गुंतला पाणी ।

चाल ॥    
प्रेमाश्रु वाहती नयनीं ।
गणपति आणूं या ध्यानीं ।
 डोलतसे भुजंगावाणी ॥ स्‍व० ॥३॥
वीणा घेउनि विधितनया गातसे मंजुळ शब्‍दें ।
मृदंग हरि वाजवितो तालावरि नानाछंदें ।
विमानावरि बैसुनियां पाहताति सुरांची वृंदें ॥

चाल ॥    
दशशतफणि डोले आनंदें ।
निघती प्रेमाचे दोंदे ।
शिव नाचे ब्रह्मानंदें ॥ स्‍व० ॥४॥

यापरि तो सगुणावतारी स्‍वच्छंदें नृत्‍यकरिता ।
त्रिभुवनि स्‍थिरचर जिव सारे नाचति हृदि आनंदभारिता ।
गोविंद पुष्‍पांजळि घेउनि अर्पितसे गणेशमाथा ॥

चाल ॥    
सप्रेमें तत्‍पदिं नमिता ।
तूं प्रसन्न हो वरदाता ।
वरद हस्‍त ठेवीं माथा ॥ स्‍व० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP