मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २५७ ते २६०

गोविंदकृत पदें २५७ ते २६०

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २५७ वें.

काय मी सांगूं देवा ! माझे जिविंचे गुज ।
पतितपावना रे ! आतं राखीं माझी लाज ! ॥ध्रुवपद.॥
जन्मतां गर्भवासीं क्लेश झाले जे भारी ।
नेणवे मजलागीं, तुज ठाउकें हरि ? ॥काय मी०॥१॥
दु:संगसंगतीनें चित्त व्याकुळ माझें ।
अपराघ थोर केले सांभाळावे महाराजें. ॥काय मी०॥२॥
संसारी सुख नाहीं, सुख तुझेचि पायीं ।
सप्रेम भक्ति देईं, मायबहिणी रामाबाई ! ॥काय मी०॥३॥
अपराध करीं क्षमा, गुरु नरहरिराया ! ।
देईम वा ! क्षेम मातें, गोविदाचा प्राणसखया ! ॥काय मी०॥४॥

पद २५८ वें.

येईं बा ! रघुराया ! राजिवनेत्रा । नगजापतिमित्रा ! ।
रामा सुकुमारा कोमलगात्रा । पद्माक्षिकलत्रा ! ॥ध्रुवपद.॥
येईं म्हणतां मज लज्जा वाटे । बहु दुष्कृत खोटें ।
पतितोद्धारण बिदे पायीं मोठें । त्रभुवनि बोभाटे ॥
तारीं तूं मजलागुनि अजपौत्रा ।नगजा०॥१॥
नाही तुमची सेवा मज घडली । विषयीं मति जडली ।
कांता कांचन ही मनिं आवडलीं । मति त्यांतचि बुडली ।
झाली निर्फळ देहाचि कीं यात्रा ।नगजा०॥२॥
ऐशा पतिताला कोण त्राता । प्रभु जानकिकांता ! ।
दात्या नरसिंहा कृपा करीं आतां । दे क्षेम समर्था ।
तारी गोविंददीना गुणपात्रा ।नगजा०॥३॥

पद २५९ वें.

कधीं येशील सीतारमणा ! । दीनावरि करुनि करुणा  ! ॥ध्रुवपद.॥
ब्रम्हांडनिवासा रामा । योगिजनमनविश्रामा ! ॥कधीं०॥१॥
तूं भक्तकाजकैवारी । मज अधमालागुनि तारीं ॥कधीं०॥२॥
गजनक्र तुवां धरिलें । मजला कां अव्हेरिलें ॥कधीं०॥३॥
गोविंद अधमाला तारी । हें संकट नाहीं भारी ॥कधीं०॥४॥

पद २६० वें.

शरयूतिरवासी देवा ! । कोठे गुंतला प्राणविसांवा ! ॥ध्रुवपद.॥
क्षणलवपल युगसम जातें वियोग कदापि न साहे ।
चांडाळे विघड बहु केला गति कोण करूं मी माये ।
आयुष्य बहुत विधीनें दिधलें प्राण न याजे ॥
चाल ॥ दु:खार्णवि बुडली काय ।
जिव माझा व्याकुळ होय ।
हिंसकगृहि पडली गाय ॥शरयू०॥१॥
आहा रे ! विधात्या नष्टा कां लिहिलें माझ्या भाळी ।
जन्मभर काय कसें हें तें नकळे मज ये काळीं ।
दुर्बुद्धि कसी उद्भवली इच्छिली मृगकांचोळी ॥
चाल । चुकले शरणागत पाळीं ।
दासीचें मन सांभाळीं ।
शरीराची झाली होळी ॥शरयू०॥२॥
साधू लक्ष्मण मजजवळी रक्षणार्थ देवर होता ।
विपरीत गति कर्माची म्यां छळिलें सद्नुणवंता ।
तोही मज त्यागुनि गेला कांतारीं जेथे भ्राता ॥
चाल ॥ तो दोष बैसला माथां ।
हा दुर्जन कोठे होता ? ।
नकळे मज याची वार्ता ॥शरयू०॥३॥
मार्गीं श्रम मज बहु होतां कुरवाळी अमृतहस्तें ।
कनुवाळू बहु दासाचा श्रमहारी निश्चळ चित्ते ।
गोविंदवरद नरसिंहा ! तूं निजपद दाखविं मातें ॥
चाल ॥ करुणाब्धि मज अधमातें ।
बा ! करीं भवाब्धीपरतें ।
सद्भावें नमिन पदातें ॥शरयू०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP