रूपक - गोंधळ

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
प्रथम अवतारीं आई थोर ख्याति केलीवो । ब्रम्हयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप झाली वो ।
धुंडाळिला सागर आई शंखासुरा मिठी घाली वो । वधियले राक्षस ब्रम्हपुरीं त्वां स्थापिलें वो ॥१॥
ऐसी बहु लोकां माझारी आई खेळतसे गोंधळींवो । तेहतीस कोटि देवता सवें मेळवुनी मेळींवो ।
त्रासिले राक्षस भक्त जना प्रतिपाळींवो ॥२॥
कूर्म वेश धरुनी धरणी पाठीवरी धरिली वो । महेंद्र मंथन मेळीं आंबा वेगीसी पावली वो।
समुद्रमंथन करितां आई बरवा गोंधळ घाली वो । नारायण विश्वरुप देवा जैं त्वांच दिधलें वो ॥३॥
वराह रूप धरुनी आई थोर पवाडा केला वो । पृथ्वीच्या कैवारा घालिसी गोंधळ गाढा वो ।
वधिला हिरण्याक्ष त्याचा केला त्वां रगडावो । खेचर देवता धरणी धरियली दाढा वो ॥४॥
विक्राळ रूप धरुनी स्तंभ फोडुनी निघाली वो । सिंहनादें गर्जतां हाक त्रिभुवनीं गाजली वो ।
वधिला हिरण्यकश्यप अंतरमाळा गळां घाली वो । प्रर्‍हादाकारणें कैसी गोंधळीं नाचली वो ॥५॥
इंद्राच्या कैवारा आई सानें रूप धरिलें वो । बळिच्या द्वारा जाऊन भूमिदान मागितलें वो ।
त्रिलोक मोजिततं बळिस पाताळीं घातलें वो । मागुता येईल म्हणवुनी त्याचें द्वार त्वां रक्षिलें वो ॥६॥
जमदग्नि रेणुके कुशीं धरियेला अवतार वो । हातीं परशु घेउनी केला दैत्यांचा संहार वो ।
एकविस वेळ मेदिनी नि:क्षत्रिय करुनी फेडिला भूमिभार वो । वधिला सहस्रार्जुन कामधेनूच्या कैवारा वो ॥७॥
पितृवचनाकारणें आई वनवासासी गेली वो । अठरापद्में वान्नर मेळवुनी गोंधळ घाली वो ।
वधिला दशशिर लंका शरणागता दिधली वो । कौसल्या माउलि देवा बंदी सोडी केली वो ॥८॥
वसुदेवकुळटिळके तरी तूं कंसासुर मारिके वो । कुळांतकुळ तारिके तरी तूं कौरव संहारिके वो ।
पांडव प्रतिपाळके भक्तजनाशी तारके वो । तुझा गोंधळ गाता अंबे कोण वर्णूं शके वो ॥९॥
वेदमार्ग सांडुनि असुरें देवा गांजियलें वो । त्याचिया कैवारा आई त्वां सौम्यरूप धरिलें वो ।
बौद्धरूप धरुनी भक्तालागीं मोहिलें वो । कौसल्या देवता जे त्या रूपें त्वां दिधलें वो ॥१०॥
कलियुगाच्या अंतीं थोर होईल अन्नान्न वो । एके ठायीं होउनी खातील चारी वर्ण वो ।
तेव्हां पृथ्वी भारें तुजला येईल शरण वो । तेव्हां तूं पावसी कलंकी अवतार धरुनी वो ॥११॥
पुंडलिकाकारणें पंढरपुरीं केला वास वो । तुझा गोंधळ गातां थोर जिवा उल्हास वो ।
तूं माये माउली तुझा मज बहु विश्वास वो । विनई विष्णुदास नामा तुझा दासाचा मी दास वो ॥१२॥
२.
विठाई सांवळे डोळसे रंगा येईं हो ॥ध्रु०॥
कानीं कुंडलांची प्रभा । जैसे चंद्रसूर्य नभा हो ॥२॥
गळां वैजयंती माळा । कासे पीतांबर पिवळा हो ॥३॥
नाम म्हणे कृपावंता । झडकरी यावें पंढरिनाथा हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP