संतचरित्रे - नरसी मेहता

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त ॥१॥
वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यीं ॥२॥
तया कुळीं झाला भक्तराज पाहीं । धन तें सर्वहि धर्म केलें ॥३॥
अकस्मात्‌ नगरींत यात्रेकरी आले । द्वारके चालिले देवकाजा ॥४॥
मार्गीं बहु कष्ट चोरीव आगळी । म्हणोनि मंडळी भयाभीत ॥५॥
समागमें द्रव्य निभावे कैसेनि । यालागीं चिंतनी हुंडियेचे ॥६॥
ग्रामाचे भीतरीं हिंडती घरोघरीं । हुंडी द्यावी बरी द्रव्य घेईं ॥७॥
ऐसें ऐकतां ते लबाड छळक । उत्तर हो देख देते झाले ॥८॥
नरसी मेहता परम भक्त थोर । आहे सावकार हुंडीवाला ॥९॥
तयाचे निकटीं जावे बहू त्वरें । तुम्हासी तो खरे वाटे लावी ॥१०॥
म्हणोनि प्रेमाचे यात्रेकरी साचे । पुसत मेहताचे घरा आले ॥११॥
देखतांचि मेहता समोरा उठोन । येऊनि नमन करिता झाला ॥१२॥
करूनि पूजन धूपदीप सारे । समर्पण बरे उपचार ॥१३॥
मग करि प्रश्न काय काजा बोला । आम्हां योगें भला असे तोचि ॥१४॥
यात्रेकरी म्हणे जाणें द्वारकेसी । म्हणोनि हुंडीसी करणें असे ॥१५॥
तीन शतें साठ रुपये टाकिले । येरु म्हणे भलें देई हुंडी ॥१६॥
तयेकाळीं हुंडी लिहिली द्वारकेसी । नामा म्हणे साची पेठ खरी ॥१७॥
२.
स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधें ॥१॥
दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥
यात्रेकरी यानें राखिले रुपये । तीन शतें साठ द्यावे यांसी ॥३॥
ऐसें पत्र दिलें हुंडी ते लिहून । नगरीचे बाम्हण पाचारिले ॥४॥
बोलावुनी त्यांसी वांटी दक्षिणेसी । यात्नेकरी यासी विस्मय वाटे ॥५॥
म्हणती धर्मात्मा सुशील मेहता । दानशूर दाता जगीं खरा ॥६॥
घेवोनी द्रव्यातें दिलें ब्राम्हणांसी । लिहुनी हुंडीसी दिधलें तेणें ॥७॥
नामा म्हणे धन्य नरसी मेहती । ऋणी देव होता हुंडी भरी ॥८॥
३.
चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें ॥१॥
पहावया घर दुकान हुंडीचें । न दिसे हो साचें तत्क्षणीं ॥२॥
सायंकाळ पडला सांपडेना कोठें । प्राणासी संकट देणें आलें ॥३॥
देश दूर झाला नसे खर्ची कांहीं । देहपात पाहीं करीन आतां ॥४॥
करूनि नेमासी प्राण ते द्यायासी । समीप तीर्थासी केलें असे ॥५॥
ऐसा भाव देव पाहूनि त्वरित । आला हूडकीत तीर्थाजवळी ॥६॥
हुंडी कोठें आहे नरसी मेहत्याची । रुपये साठींची तिनशें वरी ॥७॥
रणछोड आहे नाम माझें पाहीं । रुपये ते घेईं देतों तुज ॥८॥
ऐकतां वचन संतोषला मनीं । धरिलें चरणीं प्रेमभावें ॥९॥
धन्य धन्य तूंरे पाहतां मजला । घेऊनि द्रव्याला आलासीरे ॥१०॥
देउनी रुपये दर्शन दाविलें । जगविख्यात केलें मेहत्यासी ॥११॥
करूनि यात्रेसी जुनागडा आला । भावें हो वंदिला मेहता तो ॥१२॥
म्हणे तुजयोगें झालें मज पाहीं । दर्शन तें ठायीं रणछोडा ॥१३॥
ऐकतांच वाणी प्रेम मनीं भरे । धरिले चरण त्वरें तयाचे हो ॥१४॥
नामा ऐसा देव ऋणी भक्तां । पुरवित होता सर्व ठायीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP