ध्रुवचरित्र - भाग ६ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६.
पाचारिलें ध्रुवाजवळी त्या रायानें । जाणोनी सन्मानें आला पाशीं ॥१॥
संतोष तो कांहीं बोलवेना वाचे । उदार प्रेमाचें झळंबती ॥२॥
अंकीं बैसवितां कैसा तो शोभला । कोंदण रत्नाला जयापरी ॥३॥
चुंबोनियां मुख पुसतो मंजूळ । मी कोण तें न कळे तुज कांहीं ॥४॥
तो म्हणे आहेसी तात तूं निष्ठुर । आम्हांसी बाहेर ठेवियेलें ॥५॥
राजा म्हणे काय जाहालें तयासी । होसी तूं राज्यासी अधिकारी ॥६॥
नाम म्हणे ऐसा दोघांचा उद्नार । लोटों आला पूर आनंदाचा ॥७॥
७.
सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥
बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥
निघुनी ते वेगीं आली रायापाशीं । म्हणे या पोरासी कां घेतलें ॥३॥
मांडी बैसवीसी लाडानें बोलवीसी । पाहूं आतां कैसी लोचनीं मीं ॥४॥
शरीर त्यागावें कीं त्यासी मारावें । हेंचि जीवें भावें वाटे मना ॥५॥
मागेंपुढें कांहीं न पाहे द्दष्टीस । लोटिलें बाळक पायें तिनें ॥६॥
नामा म्हणे राजा तियेचा अंकिला । झाला चाकाटला आपुल्या ठायीं ॥७॥
८.
बाईल आधीन होती जे कां नर । ते म्हणों पामर श्वानरूपें ॥१॥
नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनियां ॥२॥
इष्ट मित्र गुरु ऐसा कैसा भाव । सर्वही निर्वाह तेचि एका ॥३॥
नाचविले तिणें तैसे ते नाचती । माकडाच्या गति गारुडयाच्या ॥४॥
नामा म्हणे राजा गुंतला तियेसी । शेंवुडातें माशी हालूं नेणे ॥५॥
९.
उठवितां बाळ आक्रंदलें पोटीं । निघे उठाउठी चमत्कारें ॥१॥
आवसेंचा शशी तैसा राजा झाला । येरु हा निघाला कळावंत ॥२॥
आळवावा तरी धाक बाईलेचा । तेणें त्याची वाचा चाकाटली ॥३॥
ह्रदय फुटलें प्रेमही दाटलें । तरी काय चाले तियेपुढें ॥४॥
सूर्यासी पडेल निधनासी भूत । तैसी झाली मात राजयासी ॥५॥
नामा म्हणे मोह खोटा हा दुर्धर । त्यागावा निर्धार वेदांतीच्या ॥६॥
१०.
चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥
पाहा हें रायानें मांडिलें अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणों ॥२॥
देवोनियां रत्न घेतला चिंचोका । दिला कवडी एका चिंतामणी ॥३॥
कामधेनु नेधे पोशीले बोकड । अस्पदे माकड पाळावया ॥४॥
कल्पतरु मोडी शेतां कुंपण करी । तैसी झाली परी आजीची हे ॥५॥
नामा म्हणे तिचा मोह हा दारुण । राजा ती आधीन झाला तैसा ॥६॥


Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP