मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
रघुपतीचें ध्यान

रघुपतीचें ध्यान

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


ब्राह्म मुहूर्तीं उठून रघुपतीचें ध्यान करावें तें असें.

सिंहासनीं राघव राजा । विलसतसे स्वामी माझा ॥१॥
श्यामसुंदर मूर्ति जयाची । उपमा साजेना मदनाची ॥२॥
ज्ञानमुद्रा वीरासन । करी वेदांत व्याख्यान ॥३॥
चरणीं ब्रीदाचे तोडर । बरवा झळके पितांबार ॥४॥
गळा मोतियांचा हार । कानिं कुंडलें मकराकार ॥५॥
कडीं तोडे मुद्रिका बोटीं । अंगी सुगंध केशर उटी ॥६॥
मुख शोभा काय मी वानूं । ओवाळावे शतही भानू ॥७॥
भव्य ललाटीं केशरीगंध । मुख कमळीं हास्य मंद ॥८॥
शिरीं कवच नवरत्नाचा । तुरा खोविला मोतियांचा ॥९॥
वाम भागीं सीता देवी । मेधा शोभे विकसज्जेवीं ॥१०॥
पृष्ठभागीं परम पवित्र । उभा लक्ष्मण धरुनि छत्र ॥११॥
मारुति उभा पुढें दास । बहिरंतर विषयिं उदास ॥१२॥
भरत शत्रुघ्र चामर । वारिताति वारंवार ॥१३॥
सुग्रीव बिभीषण भक्त । ढाळिताति तालवृंत ॥१४॥
पूर्ण ब्रम्हा जें अविकार । भक्तांसाठीं झालें साकार ॥१५॥
नित्य अंतरीं हा सोहळा । पंतविठ्ठल पाहे डोळां ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP