तत्वविवेक - श्लोक ४ ते ७

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


तथा स्वप्नेऽत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरम् ॥
तद्भ्देदोऽतस्तयो: संविदेकरूपा न भिद्यते ॥४॥

जागृती हरपे हें न हरपे ॥ पाहे स्वप्नांतील नानारूपें ॥
परि न भेदे आपुले स्वरूपें ॥ कवणेही काळीं ॥३७॥
शंक - स्वप्नीं जागरीं तेचि ते विषय ॥ ज्ञानही एकलेंचि होय ॥
मग तैं भेदाची सोय ॥ कवण करी ॥३८॥
समाधान - स्वप्नीं दिसती जे पदार्थ ॥ त्यांचा लय तात्कालिक होत ॥
जागृतीं जैसे स्थिरावत ॥ तैसेनव्हती ॥३९॥
स्थिरास्थिर वैलक्षण ॥ सदा वर्ते जागृती स्वप्न ॥
म्हणोनी भेद वसे जाण ॥ दोहीमाजीं ॥४०॥
अवस्थाभेदें ज्ञान अभेद ॥ विषयीं द्वंद्व हें निर्द्वंद्व ॥
ऐसें हें अनुवभसिद्ध ॥ सकळां असे ॥४१॥

सुप्तोत्थितस्य सौषुप्ततमोबोधो भवेत्स्मृति: ॥
सा चाऽवबुद्धविषयाऽवबुद्धं तत्तदा तम: ॥५॥
स बोधो विषयाद्भिन्नो न बोधात्स्वप्नबोधवत् ॥
एवं स्थानत्रयेऽप्येका संवित्तद्वद्दिनांतरे ॥६॥
मासाब्दयुगकल्पेषु गताऽगम्येष्वनेकधा ॥
नोदेती नास्तमेत्येका संविदेषा स्वयंप्रभा॥७॥

सुप्ति तमाचे काळीं ॥ ज्ञान ही असे तये वेळीं ॥
विषय निमाले ही आरोळी ॥ कवणें द्यावी ॥४२॥
सकळांचें नाहींपण ॥ अनुभवाविण सांगे कोण ॥
म्हणोनी तये काळीं ही ज्ञान ॥ वर्तत असे ॥४३॥
शंका - सुप्तिकाळीं कां न सांगे ॥ अज्ञानतम वसे अंगें ॥
जागृतीं बोले वाउगें ॥ ऐसें वाटे ॥४४॥
समाधान - सुप्तिकाळीं सकल इंद्रियें ॥  होती बुद्धितत्वीं लय ॥
बुद्धीही शून्य होय ॥ आपुले रूपीं ॥४५॥
मग कैसनी बोलावें ॥ अनुभव कवणा सांगावे ॥
तेथें एकलेंची ज्ञान स्वभावें ॥ वर्तत असे ॥४६॥
एवं तिन्हीं अवस्थांमाझारीं ॥ ज्ञान एकलेंची कारभारी ॥
अभेदें करी वारासारी ॥ एकलेंची ॥४७॥
जाती दिन मास युग कल्प ॥ परी ज्ञानाचें एकरूप ॥
कोण करिल तयाचें माप । तें सर्वांठाईं ॥४८॥
वादी - असो तुमचें ज्ञान किंवा संवित् ॥ सर्वांठाईं एक वर्तत ॥
तेणें काय फलित ॥ झालें तुम्हां ॥४९॥
सिद्धांती - येणें हेंचि एक झालें ॥ उत्पत्ति नास ज्ञाना न शिवलें ॥
कोण साक्षी ऐसा बोले ॥ नाशोत्पत्ति ॥५०॥
ज्ञाना आदी आहे कोण ॥ तयाचें कोण करी परिक्षण ॥
सकळही अभाव जाण ॥ ज्ञान अनादी ॥५१॥
ज्ञानेंची ज्ञाना मारावें ॥ किंवा तेंचि तईं संभवें ॥
हें ही न होय आघवें ॥ स्वस्वरूपीं ॥५२॥
स्वस्कंधारोहण ॥ कोण करील विचक्षण ॥
आपुलेचि माथीं बैसून ॥ कोण शोभे ॥५३॥
येणें येणें प्रकारें ॥ स्वसंवेद्य ज्ञानी स्फुरे ॥
स्वयंप्रकाशा प्राकाशी दूसरें ॥ हें कधींही न घडे ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP