वामन पंडित - राजयोग

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


विरक्ति ना प्रीति जया प्रपंचीं, अहर्षमर्षी क्रम पंचपंचीं ।
दया न दाक्षिण्य नसे जयाला, सुचिन्ह साधू म्हणती तयाला ॥१॥
ज्या निंदितां निंदकरोष नाहीं, ज्या वंदितां तोष नसे मनाही ।
जो निंद्यवंद्यादिरहीत जाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥२॥
जो उत्तमातें वचनें स्तवीना, नीचास नीचोत्तर सूचवीना ।
निंदास्तुती द्वैत नसे जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥३॥
प्रपंच जो कां न दिसेचि ठावा, तयीं तया भेद कसा उठावा ।
त्यजूं भजूं द्वैत नसे जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥४॥
संसार हा चित्सुख सोनियाचा, आकारमात्रें अवघा तयाचा ।
त्यागीच भोगी गुरुराज योगी, अष्टांग मूढासम तो न योगी ॥५॥
चित्सागरीं जे लहरी उठावी, चैतन्यसी ते जरि होय ठावी ।
हा चिज्जडैक्यनुबवो जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥६॥
भासे जयाच्या जड हें मतीतें, दावा नगीं त्या निज हेम तीतें ।
माया स्वयें ब्रम्हा असे जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥७॥
जो ब्रम्हा जाणे विषयादिकांही मिथ्या भ्रमें भेद तया न कांहीं ।
जें जें दिसे तें निजसें जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥८॥
दृष्टांतिं या दृश्य कदा न नासे, हा भेद जाणे तरि भेद नासे ।
भेदीं अभेआन्वय होय ज्याला, कां राजयोगी न वदा तयाला ॥९॥
पर्जन्य पाणी जरि भेद दावी, अद्वैततारीति कशी वदावी ।
ज्या गारनीरीं समता जयाला, कां राजयोगी न वदा तयाला ॥१०॥
विषय सत्य असें मनिं भाविती, तरि मृषा कवणे परि दाविती ।
विषय नष्ट असें जरि मानिती, विषय कां त्यजणें मग वानिती ॥११॥
सर्वं ब्रम्हा श्रुतीस कल्पुनि गती व्याप्यें जगा स्थापिती मिथ्याही वदती स्वभेद करिती ते भ्रांतिमद्या पिती ।
युक्तीनें मग योजिती जडमती जे व्यापकें बोलती अंधा हस्तकिं अंध जे रिति पथीं तैसेचि ते चालती ॥१२॥
विषय ब्रम्हा असें वदतां भिती, म्हणूनि व्यापक हेंचि दिवाभिंती ।
गतिस कल्पुनियां जगिं वागती, परि तयां न चुकेचि अधोगती ॥१३॥
देखेल जो विषय ब्रम्हा खरें असें रे, त्याच्या जिवासि मग बंध कधीं नसे रे ।
तो वांचला जंव असे तंव मुक्त लोकीं, अन्योन्य शून्य विषयास्तव बोलिलों कीं ॥१४॥

निर्वासना चिन्ह पुढें न जोंरे, प्रपंच ह्स्तीं न शके भजों रे ।
मौनें जया देखुनियां पळावें, विरक्तता चिन्ह असें कळावें ॥१५॥
कूटस्थ त्या तोंच नसे प्रवृत्ती, त्या निष्क्रियासी च नसे निवृत्ती ।
वैराग्य तेथें क वणें करावें, मूढें वृथा भ्रांतिभरीं भरावें ॥१६॥

साम्राज्य वामन दिसे सुखरूप साधा, त्याच्या स्थितीस जरि साधिती चारिसाधा नाहीं तयास करणेंच दुकानदारी, जो सर्वदा विचरतो गृहपुत्रदारीं ॥१७॥
सान्माज्य वामन दिसेच यथार्थ वाणी, जाणेल त्या अनुभवासि नसेचि वाणी ।
प्रत्यक्ष जो स्थिरचरीं निज ऐक्य दावी, त्याची गुरुत्वमहिमा किति हो वदावी ॥

॥ इति राजयोग ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP