मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ४ थे

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
देह रोगांचें भांडार ॥ कृमीकीटकांचे, माहेरघर ॥
भ्रांती कुसुकल्पनांचे, अवडंबर ॥ नाशवंत, शरीर हें ॥१॥
पांच भूतांचा, पेटारा (शरीर) ॥ त्यांत वायूच्या, वेरझारा ॥
माया जर्जर करी, त्या पामरा ॥ देहाकार, देवोनियां ॥२॥
त्वचेमाजी, हडुकमांस ॥ दुर्गंधी भोगावी, कांसयास ॥
पुनर्जन्म नको, हया जीवास ॥ हेंच ज्ञानी इच्छितसे ॥३॥
अकरा इंद्रियें, मायें केलीं ॥ तेणें पामरें, गुंग झालीं ॥
विषयलोभें, दुर्दशा झाली ॥ कर्मचक्रीं, फिरतातीं ॥४॥
इंद्रियें जात्या, अजाण । त्यांच्या द्वारें, होतें ज्ञान ॥
मोह पावतो, तो अजाण ॥ कां न म्हणावें, तयाशीं ॥५॥
रोमत्वचा, नाडीमांस ॥ असती सर्वही, भूतांश ॥
जड देहाचा, वृथा त्नास ॥ ज्ञाने पाही, तुझाचि तूं ॥६॥
लाळ मुत्रादिक, शोणित ॥ मज्जारेत, आपद्रवत ॥
पंचतत्त्वातें, जाणा निश्चित ॥ जाणतां एक, तुझाचि तूं ॥७॥
क्षुधातृषा आळस, निद्रा ॥ मैथुनार्थीं, वैश्वानरा ॥
चलना कुंचने, वायु लक्षणा ॥ जाणता एक, तुझाचि तूं ॥८॥
काम क्रोध, शोक जाण ॥ लोभ भय, हे पांची गुण ॥
हें आकाशाचें, पूर्ण लक्षण ॥ तरी जाणता, तुझाचि तूं ॥९॥
ऐसें पंच भूतांचे, तत्त्वांश ॥ पाहू जातां, पंचवीस ॥
ते सर्वही, तुलाचि द्दश्य ॥ ऐसा जाणी, स्थूल देह ॥१०॥
देहावयवा, समस्ताशीं ॥ तूं एकलाचि, जाणता आसशी ॥
तुझा तूंची, ऐताच असशी ॥ शोधा अंतीं, कळेल कीं ॥११॥
जन्ममृत्यू, जराव्याधी ॥ नेम नाहीं, मृत्यु कधीं ॥
येई सर्वदा, भयते आधीं ॥ देहपाता, पर्यंत ॥१२॥
देह शोभेचा, अभिमान ॥ हिंडतां फिरतां, पुष्टिवर्घन ॥
बाल्य वार्धक्य, संहरण ॥ केव्हां जाशी, कोण जाणे ॥१३॥
तूं कोण कोठुनी, आला कैसा ? ॥ राहाशी जाशीं, देहीं कैसा ? ॥
विवेक विचारें, उठवी ठसा ॥ अंतर्ज्ञानें, मनावरी ॥१४॥
तूं देह किंवा, देहाचा जाण ॥ देह तुज जाणे, कीं तूं तयाचें ज्ञान ॥
पाहतां द्रष्टा, तूंचि आपण ॥ जडदेह मात्र, तुज द्दश्य ॥१५॥
देहाशि सबाहय, अभ्यंतरीं ॥ तूंचि जाणशी पूर्ण विचारी ॥
देह घंटा, लंकारापरी ॥ वृथा माझा, म्हणविशी ॥१६॥
लेवोनि खोळी, पंचभूतांची ॥ वृथा भूतां, मिरविशी, तूंची ॥
ज्ञानें पाहतां, तुझा तूंची ॥ दुजे ब्रम्हा, नसेच कीं ॥१७॥
ऐसें आपणातें, नीट जाण ॥ द्दश्याद्दश्य, निर्गुण सगुण ॥
देहाशीं न देतां, मीपण ॥ तीच भ्रांती, सांडिजे ॥१८॥
जाणे वर्ण, व्यक्तिरूपाशीं ॥ जाणे देहाच्या, नामाशीं ॥
परंतु न जाणे, जाणणाराशीं ॥ आतां जाण, कोण मी ॥१९॥
जड चैतन्य, सत्यमिथ्या ॥ जाणिव बुद्धी, असे तथ्या ॥
मी कोण व स्वरूप काय ? यदर्था ॥ उहापोहे, उदघाटिजे ॥२०॥
ऐसा जरी तूं, नित्य चालशी ॥ तरि मग, मी कोण हें जाणशी ॥
द्दढाभ्यासें, आपणाशीं ॥ ज्ञाने भ्रांती, जातसे ॥२१॥
देहक्षेत्नीं, क्षेत्नज्ञातें ॥ म्हणजे जाणावें, आत्म्यातें ॥
देहकवच, केवळ नुसतें ॥ इतुकें प्रथम, अनुभवीं ॥२२॥
देहीं जीवात्मा, निराकार ॥ न मानावा व्यर्थ देहाकार ॥
जैसा काष्ठीं, अग्निसंचार ॥ तरी अग्नी, वेगळाचि कीं ॥२३॥
तैसा तूं देहाशीं, व्यापुनी ॥ असशी चर्मदेहीं, भरोनी ॥
रोमादिकामाजी, राहुनी ॥ जाणता तूंची, निराळा ॥२४॥
जरी तूं असशी, जाणतेपणें ॥ तरी तुज न ठावें, नेणतेपणें ॥
स्त्रीपुंनपुसंकत्वे, देहपणे ॥ गर्व मिरविशी, देहाचा ॥२५॥
आत्म्या लागीं, जागेपणें ॥ ओळखूनि, नीट व्याप करणें ॥
इंद्रियद्वारें, भोग भोगणें ॥ हर्ष विषादा, वांचोनी ॥२६॥
मी अमक्या, नामारूपाचा ॥ अभिमान ऐसा, देहाचा ॥
तूंच जाणतां, हया सर्वांचा ॥ ऐसा आत्मा, विलक्षण ॥२७॥
शुद्धात्म्यातें, नीत जाणणें ॥ आपुलेचि आपण, मुक्त होणें ॥
ऐसेंचि ज्ञान, स्थिरावणें ॥ तोचि होय, जीवन्मुक्त ॥२८॥
ऐसें स्थूल देहाचें, विवरण ॥ करावें मुमुक्षूंनीं, श्रवण ॥
कथन केलें तें, साधन ॥ साधकें आदरें, अभ्यासावें ॥२९॥
आतां अद्वैत, विवेकणें ॥ द्वैत हें, भिन्नत्वी जाणणें ॥
पुनरपि तेंचि, निरसणें ॥ ठायींच्याची, ठांयी तें ॥३०॥
उफराटे द्दष्टीचें, पाहणें ॥ द्दष्टीमाजी, द्दष्टी मुरवणें ॥
मुळा ठेपीं,जाणीत जाणें ॥ स्वस्वरूपीं, ज्ञानार्थ ॥३१॥
तेथुनि मागें, पाहतां पाहतां ॥ पाहणेंचि नुरे हें, सर्वथा ॥
आनंद दुमदुमतो. परमार्था ॥ डंका वाजे, भुवनत्रयीं ॥३२॥
जेथें नाहीं. माया अविद्या ॥ जेथें अपरिमित, स्वसंवेद्या ॥
ऐशी सुगुणी सुगुणी, ब्रम्हाविद्या ॥ सदा परिसावी, सावधानें ॥३३॥
जें घनानंद, केवळ सुखी ॥ प्रवेशावें, स्वयंप्रकाशीं ॥
त्यागावें मन, गमनाशीं ॥ आनंदी आनंद, होतसे ॥३४॥
स्थूल देहाश्रयें, राहूनी ॥ लाभानंदातें, जाणुनी ॥
साधुसंगें, चर्चा करोनी ॥ उद्धारार्थीं झटावें ॥३५॥
इति श्रीपरमामृते, मुकुंदराजविरचिते, स्थूलदेहविवरणं नाम, चतुर्थं प्रकरणं संर्पूणम्  ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP