पर्याय अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


क्रमानें अनेक अधिकरणावर (म्ह० स्थानांवर) रहाणारे एक आधेय (म्ह० राहणारी वस्तु) हा पर्यायाचा एक प्रकार; व एका स्थानावर क्रमानें अनेक वस्तु राहणें हा पर्यायाचा दुसरा प्रकार :---
या दोहोंपैकीं कोणतें तरी एक असणें हें पर्याय अलंकाराचें सामान्य लक्षण (समजावें). ‘पर्याय’ या शब्दाचा केवल योगार्थ (म्ह० (परि + इ + घञ प्रत्यय ह्या अवयावांचा अर्थ) हें पर्यायाचें सामान्य लक्षण आहे, असें म्हणूं नये; तसें म्हटल्यास, या लक्षणाची कोणत्याही क्रमानें येणार्‍या पदार्थात पर्याय होऊ लागल्यानें, अतिव्याप्ति होऊ लागेल. “परावनुपात्यय इण:” (पा. ३।३।६८) (अर्थ - क्रमानें येणार्‍या पदार्थांचा ‘अनुपात्यय म्ह० क्रम न मोडणें’ म्ह० क्रमपूर्वक येणें या अर्थीं, ‘परि’ उपसर्गपूर्वक ‘इ’ धातूला घञ प्रत्यय लागून पर्यास असे रूप होतें) ह्या पाणिनीच्या व्याकरणसूत्राप्रमाणें, केवळ अनुपात्यय या अर्थीच घञ प्रत्यय लागतो. (शब्दश :--- अनुपात्यय हा अर्थ घञ प्रत्यय लावण्याचें निमित्त होतें.) बरें (वर पर्यायाचे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांपैकी,) फक्त एकालाच (अन्यतर) पर्याय म्हणावें तर तेही म्हणणे (तसें लक्षण करणेंहीं) शक्य नाहीं; कारण एकालाच पर्याय म्हटलें तर त्या पर्यायाच्या लक्षणांत वर सांगितलेल्यापैकीं कोणातातरी एक प्रकार घटक म्हणून सोडल्यास पर्यायाचे संपूर्ण लक्षण होणे शक्य नाहीं. वरील पर्यांयाच्या दोन प्रकारांपैकीं पहिल्या प्रकाराच्या लक्षणांत ‘क्रमेण’ हा जो शब्द घातला आहे तो, पूर्वीं सांगितलेल्या विशेषालंकाराच्या दुसर्‍या प्रकारांत या लक्षणांची अतिव्याप्ति होऊं नये म्हणून. त्या विशेषाच्या दुसर्‍या प्रकारांत, एकच वस्तु एकाच वेळीं, अनेक स्थानांवर राहिल्याचें वर्णन असते. (व या पहिल्या वस्तु एकाच वेळीं, अनेक स्थानांवर राहिल्याचें वर्ण्न असते. (व या पहिल्या पर्यायांत एकच वस्तु क्रमानें अनेक स्थानावर राहिल्याचे वर्णन असतें.) म्हणून या प्रथम पर्यायाच्या लक्षणाची त्या विशेषाच्या दुसर्‍या प्रकारांत अतिव्याप्ति होत नाहीं. पर्यायाच्या दुसर्‍या प्रकाराच्या लक्षणांत, ‘क्रमेण’ हा शब्द जो घातला आहे तो, ह्या लक्षणाची पुढें येणार्‍या समुच्चयालंकारांत अतिव्याप्ति होऊ नये म्हणून. असा (क्रमेण या शब्दामुळें) याचा इतर अलंकाराहून होणारा फरक सांगितला. (पर्यायाचें) उदाहरण :---
“हे राजा ! ब्रम्हालोकांतून (ब्रम्हादेवाच्या घरून) त्रैलोक्य पहाण्याकरतां निघाली असतां चार दिवस देवांच्या बरोबर मजेंत घालवून, व नंतर सार्‍या पृथ्वीभर भटकून, कविसमूहाकडून उपासना करण्यास योग्य अशी वाग्देवी, आतां सत्याचें घर अशा तुझ्या मुखकमलामध्यें आनंदानें राहत आहे.”
ह्या श्लोकांत पहिल्या चरणांतलें स्थान (ब्रम्हादेवाचें घर) हें (स्पष्ट शब्दानें सांगितलेलें नसून) आर्थ आहे, कारण भवनात या ‘अपादान’ या अर्थां आलेल्या, व विश्लेष ज्या ठिकाणाहून झाला त्या मूळ स्थानाहून होणार्‍या, पंचमी विभक्तींत, दूर नेणें (अथवा विश्लेष) ही क्रिया, दोन वस्तूंचा पूर्वीं असलेला संयोग (उपश्लेष) मानल्यावांचून सिद्ध होत नसल्यानें, संयोगाचें (औपश्लेषिक) जें अधिकरण त्याचें पंचमीच्या अपादान या अर्थावरून आक्षेपानें सूचन होतें, (अभिधेनें होत नाहीं).
‘कमलासनस्य भवने स्थित्वा आयाता’ या मूळ वाक्याच्या अर्थाचें, ‘कमलसनस्य भवनादायाता’ हें जें श्लोकांतील वाक्य, त्यांतील ‘भवनात’ या ल्यब्लोपानें झालेल्या पंचमी विभक्तींत सुद्धांत, ल्यबंतार्थ क्रियेची ‘अधिकरण’ या अर्थी (म्ह० मूळ राहण्याचें स्थान या अर्थीं) पंचमीच्या प्रत्ययावर, लक्षणा झाली असल्यानें) (म्ह० पंचमी प्रत्ययाचा, ‘राहण्याचें स्थान’ हा अर्थ लक्षणेनें होत असल्यानें, तो वाच्यार्थ मुळींच होणार नाहीं. (अर्थातच तें अधिकरण येथें आर्थ म्हणणें योग्य आहे).
(‘ल्यब्लोपे कर्मण्यधिकरणेच’) हें वार्तिक निरूढलक्षणा प्रस्थापित करतें, असा सिद्धांत आहे. (म्हणून येथील पंचमीचा “अधिकरणाहून” हा अर्थ लक्षणेनें होत असल्यानें आर्थ आहे, शाब्द नाहीं, हें सिद्ध झालें.) वरील श्लोकांतील (पहिली सोडून) बाकीच्या तिन्ही ओळींतील अधिकरण शाब्द आहे.
अथवा (पर्यायाचें) हें उदाहरण :---
“प्रथम समुद्राच्या पोटांत राहून, नंतर देवांच्या घरीं (म्ह० स्वर्गांत) बराच वेळ राहून, हे राजा ! अमृत आजकाल तुझ्या निर्दोष वदनकमलाच्या ठायीं राहत आहे.”
पूर्वीच्या आयाता इ० श्लोकांत वरून क्रमाने खालीं उतरण्याचें वर्णन आहे; तर ह्या श्लोकांत खालून क्रमानें वर चढण्याचें पहिल्या श्लोकांत एक जागा सोडून दुसर्‍या जागीं जाण्यात (पूर्वपूर्वपरित्याग) पहिल्या जागेविषयीं जें असंतोषाचें बीज, तें सांगितलें नाहीं; पण या दुसर्‍या श्लोकांत तें सांगितलें आहे, हा या दोन श्लोकांत फरक [म्ह० दुसर्‍या श्लोकांत समुद्र सोडण्याचें कारण, तो मगराचें घर आहे हें; दुसर्‍यांत देवांचें घर सोडण्याचें कारण, देव अमृताचा फन्ना उडवतात हें, अशा रीतीनें पूर्वींची जागा सोडण्याचें कारण (असंतोषाचें बीज) येथें सांगितलें आहे. राजाच्या तोंडांत अमृत फस्त होण्याची भीति नाहीं हा भावार्थ.]

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP