अधिक अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


‘आधार व त्यावर राहणारी वस्तु (आधेय) या दोहोंपैकीं कोणत्या तरी एकाचा अत्यंत विशालपणा सिद्ध करण्याकरतां, त्याहून दुसर्‍याच्या अतिशय लहानपणाची कल्पना करणें म्हणजे अधिक (अलंकार).
उदाहरण :---
‘लोकांची विपत्ति दूर करतोस; अत्यंत मोठी संपत्ति त्यांना देतोस; अशा मूर्ख लोकांच्या बेफाट बडबडीनें, हे राजा ! तूं माजू नकोस; कारण, तुझी लाडाकी कीर्ति अतिशय लहान असणार्‍या ब्रम्हांडरूपी घराण्या आंतल्या भागांत आपल्या अति विशाल अंगाचा संकोच करून, अरेरे, मोठया कष्टानें राहत आहे.’
या श्लोकांत ब्रम्हांड अतिशय लहान आहे अशी कल्पना केल्यानें, त्या ब्रम्हांडांत जी कीर्ति राहते, ती अत्यंत मोठी आहे असें फलित होतें; आणि त्यामुळें येथें, या अलंकारानें व्याजस्तुतीचा परिपोष केला आहे.
‘हे राजा ! तुझ्या मनाचा विस्तार वाणीचा विषय होऊं शकत नाहीं; कारण विश्वाचा आश्रय जो श्रीहरी तो सुद्धां त्या तुझ्या मनांत ऐसपैस निजला आहे.’
ह्या ठिकाणीं ऐसपैस या शब्दानें कल्पिलेलें जें आधेयाचें (श्रीहरीचें) लहानपण, त्याचा, आधाराच्या (राजाच्या मनाच्या) मह्त्त्वांत, शेवट होतो. ह्या ठिकाणचे सावकाशतया हें विशेषण विश्वाश्रय याच्याकडे लावलें तर, श्रृंखलारूप जो आधाराधिक अलंकार त्याचें हें उदाहरण होऊं शकेल.
‘ब्रम्हाड्मंडळांत अंग संकोच करूनही जे गुण मावत नाहींत, ते गुण, तुझ्या ठिकाणीं, (जणु) एकमेकांची ओळखही नाहीं, अशा रीतीनें, दूरदूर अंतरावर राह्तात.’
ह्या ठिकाणीं अधिकाचे दोन्हीही प्रकार एकत्र आले आहेत.
वरील लक्षणांत ‘कल्पना करणें’ असा शब्द घातल्यानें ज्या ठिकाणीं आधार व आधेय यांचें लहानपण अथवा मोठेपण खरोखरीचें असेल येथें हा अलंकार होत नाहीं. (त्या ठिकाणीं याचा अतिप्रसंग होत नाहीं.)
उदाहरणार्थ :---
“प्रकृति, महान् (महत्तत्त्व), अहंकार, आकाश, वायु, अग्नि, पाणी, पृथ्वी यांनीं वेढलेलें जें ब्रम्हांड तोच कोणी एक घट, तद्रूप सात वीती लांबीचा हा माझा (म्ह० ब्रम्हादेवाचा) देह कुठें, व अशा रीतीचीं अनंत ब्रम्हांडें परमाणूप्रमाणें ज्याच्या केसांच्या विवररूपी खिडकींतून ऐसऐस फिरत आहेत, अशा तुझा अत्यंत मोठेपण कुठें ?”
श्रीमद् भागवताच्या दशमस्कंधांतील (श्रीभाग. १०।१४।११) ब्रम्हादेवानें केलेल्या स्तुतींतील हें पद्य या अलंकाराचें उदाहरण होऊ शकत नाहीं. कारण दिशा व काल यांनीं मर्यादित नसलेल्या परमेश्वराचा मोठेपणा सर्व वेदाम्त सिद्ध असल्यामुळें, त्याला कवीच्या प्रतिभेनें कल्पिण्याची जरूर नाहीं.
वरील विवेचनावरून,
“ह्या ठिकाणीं कुठें तरी स्वर्ग राहिला आहे. कुठें तरी, ह्या ठिकाणीं, विस्तृत पाताळ आहे; येथें कुठेंतरी हें पर्वत व समुद्र यांच्या मर्यादा असलेली पृथ्वी पडून राहिली आहे. अहो हे आकाश किती तरी विशाल ! इतके कीं, एवढीं हीं स्वर्ग, पाताळ वगैरे जगतें यांत राहिलीं असतांही हें भरून तर गेलें नाहींच, पण त्यामुळें ह्या आकाशाचें शून्य (पोकळी) हें नांव अजून नाहींसें झालें नाहीं (म्ह० कायम आहे).” हें अलंकारसर्वस्वकारांनीं अधिक अलंकाराचें म्हणून जें उदाहरण दिलें आहे त्याचेंही खंडन झालें.
येथें रसगंगाधरांतील अधिकालंकार प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP