विभावना अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या श्लोकांतील विभावनेंत, अभेदाध्यवसायमूलक अतिशयोक्ति मददगार म्हणून आलेली नाही. कुणी अशी शंका घेतील कीं, “कारणाचा अभाव असतांनाही कांहीं विशिष्ट अभिप्राय मनांत धरून, कवीनें ती कार्योत्पत्ति सांगितली असतां विभावना होते. (हा नियम;) पण, प्रस्तुत ठिकाणीं निर्माणाची सामग्री नसतांही, जगदरूपी कार्याची उत्पत्ति होणें हें, भगवान शंकराच्या बाबतींत असंभवनीय कोठें आहे ? मग येथें विभावना झाली तरी कशी ? ‘नासदासीत ।’ (ऋ १०) (त्या वेळीं म्हणजे सृष्टि होण्याच्या पूर्वीं सतही नव्हतें, व असतही नव्हतें) ‘सदेव सोम्यदमग्र आसीत’ (छां० उ०) (अरे बाबा ! सृष्टीपूर्वीं हें सतच होतें), ‘आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् (ऐ० उ०) (सृष्टीपूर्वीं आत्मा हाच एकटा होता), ‘असद्वा इदमग्र आसीत्ततो वै सदजायत ।’ (सृष्टीपूर्वीं हे असतच होतें; त्यानंतर सत उत्पन्न झालें) इत्यादि श्रुति - वचनावरून व ‘अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम’ या स्मृति - वचनावरून (सृष्टीपूर्वीं भगवंताखेरीज दुसर्‍या यच्चयावत वस्तूंचा निषेध केल्याचें समजतें. म्हणून) या ठिकाणीं विभावनेचा संभवच नाहीं. मग अतिशयोक्तीनें ह्या ठिकाणीं मदत केली नाहीं, असा व्यभिचार (अपवाद)  दाखविण्याची गोष्टच कशाला ?”
या शंकेवर आमचें उत्तर :--- या श्लोकांत, भगवंताकडून केवळ जगाचीच उत्पत्ति झाली, असें सांगण्याचा कवीचा अभिप्राय नाहीं; तसा अभिप्राय असतां तर, निर्माण करण्याची सामग्री नसतांनाही भगवंताकडून सृष्टीची उत्पत्ति होण्याचा संभव असल्यामुळें, कार्योत्पत्तीच्या असंभवावरच आधारलेली विभावन झाली नसती. पण ह्या ठिकाणीं जगदरूपी चित्र भगवान् शंकरानें निर्माण केलें, असें सांगण्याचा कवीचा अभिप्राय आहे. आतां केवळ चित्राला निर्माण करणारी सामगी - उदाहरणार्थ, शाई, हरताळ इत्यादि - व चित्राला आधार म्हणून भिंत वगैरे नसतांनाहीं, केवळ आकाशाच्या पोकळींत हें चित्र निर्माण करणें, या द्दष्टीनें या श्लोकांत, कार्योत्पत्तीचा असंभव ठसठशीत दिसतो. पण नंतर त्या चित्राचें जगाशीं अभेदाध्यवसान करून त्यानें, जगाचें कारण व त्या जगाचा आश्रय हें कांहींएक नसतांना (म्हणजे त्यांचा अभाव घेऊन) वरील असंभव नाहींसा होतो. अर्थातच, वरील श्लोकांत (‘निरुपादानसंभार ०’ ह्या ठिकाणीं) विभावना निर्वेधपणानें होऊं शकते, व ती तशी असून, तिला अतिशयोक्तीचें सहाय झालें नाहीं. असा व्यभिचार (अपवाद) दाखविणें यांत कांहीं गैर नाहीं.
वरील विवेचनारून, विभावनेंत सगळीकडे अतिशायोक्ति सहायक म्हणून येते, हें सर्वस्वकारांचें म्हणणें खंडित झालें. त्याचप्रमाणें, ‘निरुपादानसंभार०’ ह्या ठिकाणीं विभावनाच नसल्यामुळें, अतिशयोक्तीचा व्यभिचार असणारच कुठून ? असें म्हाणणार्‍या विमर्शिनीकारांचें म्हणणेंही आपोआपच खंडित झालें. खरें सांगायचें म्हणजे, विभावनेंत सगळीकडेच अतिशयोक्ति” सहायक म्हणून येत नसेल तर त्यांत काय बिघडलें ? फक्त आहार्य अभेदबुद्धीचें सहाय असलें म्हणजे बस आहे. आतां ती आहार्य अभेदबुद्धि, कुठे अतिशयोक्तीच्या रूपानें असतें तर कुठें रूपकाच्या रूपानें, असतें, असें म्हटल्यास कांहींच बिघडत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP