आक्षेप अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां आक्षेप अलंकार :---
‘उपमेय हें उपमानासंबंधींचें असलेलें सर्व कार्य करण्यास समर्थ असल्यानें, आतां उपमानाची जरूर काय ? असा उपमानाचा अधिक्षेप करणें म्हणजेच आक्षेप अलंकार’ असें कित्येकांचेम मत. त्यांच्या मतीं, आक्षेपाचें खालीलप्रमाणें उदाहरण निर्माण करावें :---
“आतां मदनाच्या धनुष्याचा महिमा निर्वेधपणें दिसूं लागला. लोकांच्या डोळ्याचा ताप अंधकारासह नाहींसा झाला; हे सुंदरी ! तुझें हे मुख चोहोंकडे अमृताचा वर्षाव करीत असतां, (सामान्य) पांढर्‍या रंगाचा हा चंद्र काय म्हणून दररोज उदय पावतो, (कोण जाणें) ?”
अथवा हें दुसरें उदाहरण :---
“हे पृथ्वीमंडळावरील इंद्रा ! तुझा कमळासारखा हात प्रकाशमान होत असल्यानें, आतां, जगांत चिंतामणि, कल्पवृक्ष, कामधेनु ही सर्व बस झालीं (आम्हांला नकोत).”
यांपैकीं पहिल्या श्लोकांत, उपमानाचें कार्य उपमेयानें करणें हें, शब्दानें सांगितलें आहे. दुसर्‍या श्लोकांत तें (अर्थानें) सूचित केलें आहे, एवढाच दोहोंत फरक.
दुसरे कोणीं. ‘पूर्वी सांगितलेल्या अर्थाचा, दुसर्‍या पक्षाचा आश्रय केल्यानें होणारा जो निषेध, तो आक्षेप अलंकार, असें म्हणातात.’ त्यांच्या मताप्रमाणें आक्षेपाचें खालील उदाहरण होऊ शकतें :---
“देवाच्या उपवनांतून (म्हणजे नंदनवनांतून) सोसाटयाच्या वार्‍यानें झोडपलेले असे कल्पवृक्ष जर एकदम ह्या पृथ्वीवर येऊन पडतील तर, सगळ्या लोकांना आनंद होईल. शिव शिव ! पण विवेकशून्य अशा या कल्पवृक्षांना घेऊन आम्हांला काय करायचें आहे ? या पृथ्वीवर दिल्लीचा राजा चिरकालपर्यंत जिवंत राहो.”
ह्या ठिकाणीं आम्हांला घेऊन काय करायचें आहे ? या उत्तरार्धानें दुसर्‍या पक्षाच आश्रय करून, पूर्वार्धांत सांगितलेल्या पक्षाचा केवळ निषेध केलेला आहे, अथवा हें त्यांच्या मतीं आक्षेपाचें दुसरें उदाहरण :---
“तूं ह्या उतारवयांत नि:शंकपणें झोप काय घेतोस ? मृत्यु जवळ आला आहे. पण नाहीं; खुशाल झोप घे. कारण आई भागीरथी तुझ्याजवळ जागत बसली आहे.”
दुसर्‍या कित्येकांच्या (म्ह० मम्मटांच्या) मताप्रमाणें आक्षेपाचें लक्षण असें :--
‘कांहीं एक विशिष्ट अर्थ सांगण्याच्या उद्देशानें, बोलण्याला इष्ट अशा अर्थाचा जो निषेध केला जातो. त्याला आक्षेप अलंकार म्हणावें; तो दोन प्रकारचा - एकांत, पुढें बोलल्या जाणार्‍या अर्थाचा निषेध केला जातो, म्हणून तो वक्ष्यमाणविषय आक्षेप; व दुसर्‍यांत, बोललेल्याच अर्थाचा निषेध केला जतो म्हणून तो उक्तविषय आक्षेप.
विवक्षित जो प्रकृतार्थ त्याचा, विशेष म्हणजे व्यंग्यरूप विशिष्ट अर्थ सांगण्याकरतां निषेध करणें, म्हणजे निषेध केल्यासारखें करणें, अर्थात सांगण्याला विरोध करणें हें त्या निषेधाचें स्वरूप. ह आक्षेप वक्ष्यमाणविषय व उक्तविषय असा दोन प्रकारचा असतो.’

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP