परिकर अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या ठिकाणीं, तुझ्या म्हणून गणलेला (तावक) या शब्दानें दाखविलेला, बोलणार्‍याच्या व ईश्वराच्या मधील जो स्वामिभृत्यभाव, त्यानें सिद्ध झालेलें, भक्ताची उपेक्षा करण्याचें जें अनौचित्य (अयोग्यपणा) त्याला जास्त भडक स्वरूपांत दाखविणारें (प्रकर्षक) धृतशार्ङ्ग इ० विशेषण, “अचूक परिणाम करणार्‍या शस्त्रास्त्रांनीं संपन्न अशा तुझ्या समक्षच, शत्रूंनी खेचल्या गेलेल्या दासाची तूं जर उपेक्षा केलीस तर, तुझी अपकीर्ति होईल” या अभिप्रायानें युक्त असें आहे.
आतां येथें कोणी असें म्हणतील कीं, कांहीं कारणावांचून (उगीचच) विशेषणें घालणें यांतु, अपुष्टार्थं या नांवाचा दोष होत असल्यामुळें, प्रयोजनपूर्ण विशेषण योजणें यांत केवळ दोषाचा अभावच आहे; म्हणून याला अलंकार म्हणतां येत नाहीं. ज्याप्रमाणें कष्टत्व वगैरे दोषांचा अभाव असणें. एवढयानेंच एखादा अलंकार होऊं शकत नाहीं, त्याचप्रमाणें येथेंही समजावें. या शंकेवर उत्तर म्हणून विमर्शिनीकार वगैरे (आलंकारिक) असें म्हणतात, “विशेषणें (अशीं साभिप्राय विशेषणें) बरींच असणें ही गोष्ट या ठिकाणीं इष्ट आहे. साभिप्राय विशेषणें पुष्कळ असण्यांतच, अत्यंत वैचित्र्य (म्हणजे चमत्कार) आहे; पण एक विशेषण साभिप्राय असणें याचा केवळ ‘अपुष्टार्थ दोषाचा अभाव असलेली जागा एवढाच अर्थ होतो.” पण हें (त्यांचें) म्हणणें बरोबर नाहीं. अनेक विशेषणें असल्यानें, अधिक अधिक व्यंग्यें (म्हणजे व्यंग्यार्थ) निघत असल्यामुळें त्यानें विशेष प्रकारचें वैचित्र उत्पन्न होत असेल तर असो. पण अनेक विशेषणें असणें हें प्रस्तुत परिकर अलंकाराचें शरीरच आहे. (म्ह० शरीराइतकें आवश्यक आहे) असें म्हणणें (मात्र) शक्य नाहीं. पूर्वीं आलेल्या (मन्त्रैर्मीलितं इ०) श्लोकांत ‘वीचिक्षालितकालियाहितपदे’ या एकाच विशेषणानें चमत्कार उत्पन्न झाला आहे, ही गोष्ट लपवितां येणार नाहीं.
“हे लावण्याच्या सागरा ! त्या मीननयनेच्या पासून तूं दूर असल्यानें - पण (जास्त) काय सांगावें ? बोलणें फार लांबवणें आतां पुरें.”
या श्लोकांत एका विशेषणानेंच सकल वाक्यार्थाला नवीन प्राण आल्यासारखें झालें आहे.
या परिकर अलंकाराच्या बाबतींत कुवलयानंदकार असें म्हणतात :--- ‘श्लेष, यमक वगैरे शब्दालंकारांत अपुष्टार्थ दोष मानूं नये; (असा नियम आहे) त्यामुळें यमक वगैरे स्थलीं एक साभिप्राय विशेषण जरी घातलें तरीं, त्यानें विशेष प्रकारचा चमत्कार होत असल्यानें, अशा ठिकाणीं परिकर अलंकार मानणें हें बरोबर जुळतें. उदा० :--- “क्षितिभृतैव सदैवतका वयं वनातानवता किमहिद्रुहा ॥” गोवर्धन पर्वताविषयीं नंद वगैरेंना उद्देशून बोललेल्या भगवंताच्या या वाक्यांत वनवता हें एकच साभिप्राय विशेषा असतांनाही परिकर अलंकार झाला आहे.’ हें त्यांचें म्हणणेंही चुकीचें आहे. (ह्या ठिकाणीं प्रश्न असा कीं,) ह्या अलंकाराला, दोषाभावाच्या सदरांत तो पडत असल्यानें, अलंकाराच्या यादींतून काढून टाकावें, असें ज्याचें मत आहे तो, तुम्ही सांगितलेल्या श्लेष - यमक वगैरे शब्दचित्रांहून निराळ्या स्थळीं साभिप्राय विशेषणें आलीं असतां, त्या विशेषणांत विशिष्ट चमत्कार असतो असें मानतो कां मानीत नाहीं ? त्या विशेषणांनीं चमत्कार होतो असें तो मानीत असेल तर (आद्य) अलंकारानेंच केवळ उत्पन्न होणार्‍या विशिष्ट चमत्काराची उत्पत्ति केवळ दोषाच्या अभावानें होत नसल्यामुळें, सर्वच ठिकाणीं परिकार अलंकार मानल्यावांचून सुटका नाहीं. बरें साभिप्राय विशेषणानें होणारा विशिष्ट चमत्कार त्याला मान्यच नसेल तर, इतर स्थलांप्रमाणें यमक वगैरेंच्या स्थलींही विशिष्ट चमत्कार नाहीं, असें म्हणणें त्याला सोपे आहे. कसें ते बघा :---
“ कसलेंही संकट आलें नसताना, प्रवासांत नसताना, रात्र नसताना, व आजारी नसताना मातीनें शौचविधि न करणारा (म्ह० मातीनें गुदद्वार साफ करण्याच्या प्रकार न करणारा) मनुष्य पापी (दोषी) ठरतो.” ह्या श्लोकांत, संकटकाल वगैरेंचा अपवाद (पर्य़ुदस्तेऽपि) सांगितला असून सुद्धां, ज्या प्रमाणें अशा संकटकालींही एखाद्यानें मृतिकाशौच वगैरे केलें असतां, त्याचा कोणी निषेध करीत नाहीं; उलट तें करणाराच्या सामर्थ्याचें सूचक समजले जातें त्याप्रमाणें, अपुष्टार्थ दोषाचा निषेध करताना यमक वगैरे अपवादा मानलें जात असतांना (म्ह० अपुष्टार्थरूप दोषयमक वगैरेच्या स्थलीं मानू नये असा अपवाद सांगितला असतांना) पुष्टतारूप दोषाभाव कवीने साधला तर, तो दोष नाहींच, उलट तो काव्यरसाच्या परिपोषालाच कारण होतो. ‘यमक वगैरे स्थळींच विशिष्ट चमत्कार होतो, याला प्रमाण माझा अनुभव’, असे म्हणजे मग यमकापर्यंत विनाकारण धावण्याची गरज राहणार नाहीं. एवंच ‘पुष्टार्थतारूप दोषाभाव’ व परिकर अलंकार या दोहोंच्या विषयाचा विभाग पाडणें कठीण आहे.” अशा ह्या परस्पविरोधी मतांच्या परिस्थितींत आमचें म्हणणें असें :---
सुंदर असून मुख्यार्थाला उपस्कारक असेल तो अलंकार, आणि चमत्काराचा अपकर्ष न करणें म्ह० दोषाचा अभाव; (अशा ह्या अलंकार व दोषाभाव यांच्या निरनिराळ्या व्याख्या आहेत.) तेव्हां हे दोन धर्म (अलंकारत्व आणि दोषाभावत्व) यांचा विषय एकमेकाहून निराळा असतांना, दैवयोगाने, त्या दोघांचा एखाद्या विशिष्ट विषयांत, समावेश होत असेल तर, त्याच्यांत बिघडलें कुठें ? कारण उपधेयसंकर झाला तरी अशा ठिकाणीं उपाधींचा संकर होत नाहीं. ज्याप्रमाणें ब्राम्हाणाचा मूर्खत्व हा दोष आहे, पण विद्या ही त्याचा दोषाभावही होऊ शकते आणि गुणही होऊ शकते; तरी सुद्धां दोषाभावत्व व गुणत्व हेदोन धर्म एक होत नाहींत. त्याचप्रमाणें येथेंही उपपत्ति लावतां येते. आतां “दोषाभाव म्हणून आलेल्या परिकराची अलंकारांत गणना करण्याचा गौरवदोष विनाकारण कशाला ?” असें ही म्हणूं नये. कारण परिकर हा दोषाभाव व अलंकार या उभयस्वरूपाचा असल्यामुळें, इतर अलंकारांहूण त्याचा फरक दाखविण्याकरतां, अलंकारामध्यें त्याची गणना करणें योग्य आहे. ज्याप्रमाणें गुणीभूतव्यंग्याचा एक प्रकार म्हणून समासोक्ति या गुणीभूतव्यंग्याच्या यादींत येऊनही अलंकारांच्या यादींत पुन्हा तिची गणना केली जाते; अथवा ज्याप्रणें राजवाडयांत राहिलेल्या माणसाबरोबर मोजलेल्या व्यक्तीची, ती व्यक्ति राजवाडा व पृथ्वी या दोहोंवरही राहत असल्यानें, पृथ्वीवर राहणार्‍या माणसांत पुन्हां गणना करतात; त्याप्रमाणें दोषाभाव म्हणून गणलेल्या या परिकाराला अलंकार म्हणून मानण्याला कांहीं एक हरकत नाहीं. असें जर न केलें तर प्राचीनांचा काव्यलिंग सुद्धां अलंकार होणार नाहीं; कारण काव्यलिंगाचें ही स्वरूप निर्धेतुरूप दोषाचा अभाव हें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP