उदाहरणालंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां उदाहरण अलंकार-

“ सामान्य रूपानें सांगितलेला अर्थ सहज समजावा म्हणून, त्या सामान्याच्या एकदेशाला ( म्हणजे अंशरूप विशेषाला ) सांगून, त्या दोहोंचा ( म्हणजे सामान्य विशेषांचा ) अवयवावयविभाव, ज्या ठिकाणीं शब्दानें सांगितला जातो, तो उदाहरण अलंकार. ”
ह्या अलंकाराची, अर्थान्तरन्यास या अलंकारांत अतिव्याप्ति होऊं नये म्हणून ,‘ शब्दानें सांगितलेला ’ ( अवयवावयविभाव ) असें लक्षणांत म्हटलें आहे. शब्दानें सांगणें म्हणजे, ‘ इव , यथा, निदर्शन, दृष्टांत ’ इत्यादि शब्दांनीं वाक्यांत स्पष्टपणें सांगणें.
आतां, येथें कुणी म्हणतील कीं, “ इव व यथा हे दोन शब्द सादृश्याचे वाचक आहेत. म्हणून विशेष्य व सामान्य ह्या दोहोंमध्यें असलेल्या जो अवयवावयविभाव त्याच्या ठिकाणीं, म्हणजे तो अर्थ दाखविण्याची, ह्या दोन शब्दांची शक्ति नाहीं. ” पण असें म्हणू  नये. कारण अवयवावय-विभाव हा अर्थ दाखविण्यास इव व यथा या शब्दांची अभिधाशक्ति नसली तरी, तो अर्थ लक्षणाव्यापारानें दाखविण्याची या दोन शब्दांना संपूर्णपणें शक्ति आहे. इव व यथा ह्या दोन शब्दांना असा अर्थ दाखविण्याची शक्ति नाहीं, असें जर म्हणाल तर हे दोन शब्द उत्प्रेक्षेचे बोधक आहेत असें म्हणणेंही कठीण होईल.
या अलंकाराचें उदाहरण-
“ असंख्य गुणांनीं युक्त असलेला पदार्थ सुद्धां एकाच दोषानें ( ही ) निंदेला पात्र होतो; ज्याप्रमाणें सर्व औषधांचा राजा जो लसूण तो स्वत:च्या एका उग्र गंधानें ( ही ) निंदेस पात्र होतो त्याप्रमाणें. ”
‘ ह्या श्लोकांत, असंख्यगुणयुक्त पदार्थ व लसूण या दोहोंची उपमा आहे, असें म्हणणें शक्य आहे; ’ असें म्हणूं नका. कारण कीं, वरील सारखा पदार्थ व लसूण या दोहोंमध्ये सामान्यविशेषभाव असल्यानें, त्या दोहोंमध्यें सादृश्याची प्रतीति होत नाही. वरील इव व यथा हे शब्द या अलंकारांत सादृश्य दाखवितात असें जर मानलें तर, ह्या उदाहरण अलंकारांत सादृश्य वगैरे शब्दाचाही प्रयोग होऊं लागेल. ( पण तो होत नाहीं. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP