मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

स्तुतिपर अभंग - अभंग ६ ते १०

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


६) कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥
वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥
गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥
अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं लोक जाले पावन ॥५॥

७) निवृत्ती शोभे मुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥१॥
विठू पंढरीचे राणे । ल्याले भक्तांची भूषणे ॥२॥
खेचर विसा जगमित्र नागा । कुंडले जोडा विठोबा जोगा ॥३॥
बहु शोभे बाहुवट । गोरा सांवत दिग्पाट ॥४॥
कंठी जाणा एकविंद । तो हा जोगा परमानंद ॥५॥
गळां शोभे वैजयंती । तिसीं मुक्ताई म्हणती ॥६॥
अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभे नामा शिंपा ॥७॥
कटीं सूत कटावरी । तो हा सोनार नरहरी ॥८॥
कासें कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ॥९॥
जानु जघन सरळ । तेंही कान्हुपात्रा विशाळ ॥१०॥
दंतपंक्तीचा झळाळ । तो हा कान्हया रसाळ ॥११॥
चरणींच्या क्षुद्र घंटा । नामयाचा नारा विठा ॥१२॥
वाम चरणीं तोडर । परसा रूळतो किंकर ॥१३॥
चरणीं वीट निर्मळ । तो हा जाला चोखामेळ ॥१४॥
चरणातळील ऊर्ध्वरेखा । जाला जनार्दन एका ॥१५॥

८) हरिनामें तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥
ऐशी व्याख्या वेदशास्त्री । पुराणें सांगताती वक्त्री ॥२॥
नामें प्रल्हाद तरला । उपन्यु अढळपदीं बैसला ॥३॥
नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥
हनुमांत ज्ञानी नामें । गरिका निजधामी नामे ॥५॥
नामें पावन वाल्मिकी । नामें अजामेळ शुद्ध देख ॥६॥
नामें चोखामेळा केला पावन । नामें कबीर कमाल तरले जाण ॥७॥
नामें उंच नीच तारिले । एका जनार्दनी नाम बोले ॥८॥

९) येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥
गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥
गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धावें देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥
प्रल्हादा संकट पडतां निवारी । चोखियाचे करी बाळंतपण ॥४॥
दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥

१०) धन्य चंद्रभागा धन्य वाळुवंट । तेथें सभा दाट वैष्णवांची ॥१॥
ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मांतरींचे ॥२॥
पहा तो नारद उभा चंद्रभागेंत । गायन करीत नामघोष ॥३॥
धन्य विष्णु पहा धन्य वेणुनाद । क्रीडा करी गोविंद सर्वकाळ ॥४॥
पौर्णिमेचा काला वेणुनादीं जाहला । वांटितो सकळां पांडुरंग ॥५॥
स्वर्गीचे सुरवर प्रसाद इच्छिती । नाही त्यांसि प्राप्ति । अद्यापवरी ॥६॥
तुम्हां आम्हां येथें कैसें सांपडलें । उपकार केले पुंडलिकें ॥७॥
धन्य ते पद्माई धन्य ते पद्माळ । येऊनि सकळ स्नानें करिती ॥८॥
धन्य दिंडीर वन रम्य स्थळ फार । रखुमाई सुंदर वास करिती ॥९॥
चोखोबानें वस्ती केलीं ऐलथडी । उभारिली गुढी स्वानंदाची ॥१०॥
धन्य पुंडलीक भक्त सिरोमणी । तेणें चक्रपाणी उभा केला ॥११॥
मायबापाची सेवा तेणें केली सबळ । म्हणोनि घननीळ आतुडला ॥१२॥
लोह दंड क्षेत्र धन्य पंढरपूर । उभा विटेवर पांडुरंग ॥१३॥
त्रेलोक्याचा महिमा आणिला तया ठायां । तीर्थ व्रतें पायां विठोबाच्या ॥१४॥
तिहीं लोकीं पाहतां ऐसें नाहीं कोठें । परब्रम्हा नीट निटेवरी ॥१५॥
एका जनार्दनीं ब्रम्हा पाठीं पोटीं । ब्रम्हानिष्ठ येती तया ठायां ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP