संत चोखामेळा - विटाळ

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१७९) काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

१८०) कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला  । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥

१८१) उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥

१८२) नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥

१८३) पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

१८४) वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP