संत चोखामेळा - नाम

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१२१) नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥

१२२) नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

१२३) नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥
चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥

१२४) भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

१२५) भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥

१२६) महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥

१२७) माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥
नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥

१२८) मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥

१२९) योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥
कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥

१३०) राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें । जपावें निधरिं एका भावें ॥५॥

१३१) वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥
योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥

१३२) सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

१३३) हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP