अभंग ८१ ते ९०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

८१.
वंश आपुला धन्य केला । आपण प्रगटुनियां भुमिकेला ॥१॥
नित्य आमुच्या हातें सेवा करूनि घेईं । रामराजा अखंड आत्म भक्ति देईं ॥२॥
नेणों वडिलांची किति पुण्याई । तेणें आळसि तूं प्रभूठाईं ॥३॥
येथें राहुनियां स्थीर रामराजा । रमवीं यावच्चंद्र सूर्य सत्समाजा ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा सच्चित्सूखा । विषय वृत्ती माझ्या करिं अंतर्मुखा ॥५॥

८२.
झालें नयनाचें सार्थक । भेटला तूं जानकि नायक ॥१॥
तुज पाहुनि डोळेभरी । मुखें बोलेन रामकृष्ण हरी ॥२॥
आपणाची मज आवडी । घोंटिन निज सुख घडि घडी ॥३॥
सुंदर मदनाहुनि तूं रामा । कुंदरदना मंगळ धामा ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । मज सोडुं नको समर्था ॥५॥

८३.
हातें वाजवूनि टाळी । तुझी गाइन नामावळी ॥१॥
चरणीं नाचेन सन्मुख । तुझें पाहुनि मंदहास्य मुख ॥२॥
कळला सच्चिदानंद तूं आपण । त्या तुज माझें लोटांगण ॥३॥
निरखुनि आपणातें निजडोळां । घोटिन आनंद वेळोवेळां ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । भक्तां आवडति तुझी गाथा ॥५॥

८४.
तुज सोडवेना रामा । सच्चिदानंदा सुख धामा ॥१॥
आत्मपद लंपट दासासी । तूं मज सोडुनि कैसा जाशी ॥२॥
तुझें वर्म आहे मजपाशीं । द्दश्य त्यजुनि धरिन आपणासी ॥३॥
मग तूं सहजचि सांपडला । प्रेमपाशें आवडला ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मी न सोडीं तुज भगवंता ॥५॥

८५.
तुज करुणा माझी आली । म्हणउनि मज आत्म भेटी झाली ॥१॥
विसरे नाहीं उपकार । दे निज आत्म पदीं मज थार ॥२॥
रामा आनंदाच्याकंदा । आपण भेटला मज मति मंदा ॥३॥
सदय ह्र्दय तुझें कळविलें । माझें दु:ख दरिद्र पळविलें ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । शाश्चत आत्म लाभ हा तत्वता ॥५॥

८६.
आला जन्मा तोचि म्हणावा । ज्यासि तुजविण प्रपंच न ठावा ॥१॥
भिकारी हो भाग्यवंत । आवडसि ज्यासि तूंचि अनंत ॥२॥
थोटा पंगु अंध जरी झाला । प्रेमें आवडसि तूंचि एक ज्याला ॥३॥
ज्यासी अखंड आत्म भेटी । आत्म प्रेम ज्याचे पोटीं ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । साधिल जो नवविध भक्ति पथा ॥५॥

८७.
आत्म भक्तां सम माग्यवंत । नाहीं नाहीं कोणी त्रिजगांत ॥१॥
काळें करूनि सेर । याचें अधिकाधिक चढुनी ऊरे ॥३॥
झाला पूर्ण निश्चय ऐसा माझा । आपण आनंदघन रामराजा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सत्य सत्य हें बोलणें नोहे वृथा ॥५॥

८८.
भला जन्म हा सुंदर मानवाचा । लाभ झाला तुझा राघवाचा ॥१॥
श्वान सूकर लक्ष चोर्‍यांशीं योनी । फळ काय होतें त्यांत उपजोनी ॥२॥
मजमनुष्य केला रे त्वां रामा । आपण भेटला अखंड सुखधामा ॥३॥
हाचि आठवतो उपकार । आत्म लीलेचा चमत्कार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरीं लया ही प्रपंच भय व्यथा ॥५॥

८९.
दयाघना तूं रामराजा । त्वांचि धरिला अभिमान माझा ॥१॥
मज काय कळे पामरा । आत्म आठवण प्रिय अंतरा ॥२॥
तेणें आपण होउनि प्रसन्न । केलें माझें अखंड समाधान ॥३॥
आतां तुज मी न सोडीं । मज लागली आपुली गोडी ॥४॥
विष्ण कृष्णु जगन्नाथा । हरिल्या त्वां प्रपंच व्यथा ॥५॥

९०.
माझे ह्रदयींचें जें सार । तें तुज कळवीलें साचार ॥१॥
आपण सांपडला जो स्वता । त्या तुज न सोडीं सर्वथा ॥२॥
मज सोडुं नकोरे रामा । आदिअंतिं आपण एक सुखधामा ॥३॥
तूं मज धीरांचारे धीर । एक आपण श्रीरघुवीर ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । न करिं आत्म वियोग व्यथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP