अभंग २१ ते ३०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

२१
मागेन मी धन तुजपासीं । या भयें तूं कां नयेसी ॥१॥
माझे काय तें तूं धन । अखंड तुजवरि माझें मन ॥२॥
तुजसाठीम दाही दिशा । हुडकित फिरलों जानकीश ॥३॥
तरि मज कोठें तूं न दिससी । दृष्टी आड लपुनी अससी ॥४॥
हें तुज शोभे काय सांग । धरणें आणिकाची म्यां पांग ॥५॥
करुनी लगबग ये रे आतां । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥६॥

२२
तुझ्या भेटीची मज आशा । कैसा तोडिसि प्रेम पाशा ॥१॥
सांग सांग जानकीशा । रामराया श्री जगदीशा ॥२॥
तुज शोधूं तरि मी कोठें । दुष्ट प्रारब्ध माझें खोटें ॥३॥
ह्मणुनी निष्टुर तूं झालासी । पापी ह्मणुनि काय भ्यालासी ॥४॥
कोणी कथिली माझी चहाडी । कीं तुज येतां कोणी ओढुनि पाठी काढी ॥५॥
येतां कोणि केली तुज आज आड काठी । अथवा अपशकुनें फिरला पाठीं ॥६॥
माझ्या जाउनि पातक मोठा । तुझ्या आडविल्या का त्याणीं वाटा ॥७॥
तरि मी जीव न ठेविन माझा । जरि तूम न भेटसी श्रीराम राजा ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा आळ तुजवरी हा सर्वथा ॥९॥

२३
ऐसी येते तुज आशंका । यासी भेटतां सांपडेन कलंका ॥१॥
सत्य तें तूं वद राघवा । सर्वस्वी तूं मज आघवा ॥२॥
तरि हा दुष्ट दुराचारी । जरि हा नित्य माझ्या नामें हाका मारी ॥३॥
भक्तवत्सल पतित पावन नामा । निज नामार्थ सोडिसि काय रामा ॥४॥
काय लोकांची तुज भीती । भेटी द्याया सीतापती ॥५॥
आत्मनामाची प्रख्याती । जेथें तेथें भक्त गाती ॥६॥
तरि तूं भीतोसी तें काय । मज दाखवाया पाय ॥७॥
करितिल काय तुझे ते लोक । ज्यांसी नाहीं अर्थ विवेक ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सोड मूर्खांच्या त्या कथा ॥९॥

२४
मज कंठवेना रामा । तुजविण एक घडि सुखधामा ॥१॥
ह्मणुनी तुज काकुळती । दर्शन देरे सितापती ॥२॥
जरि तूं राहसी ऊगला । समज माझा जीव गेला ॥३॥
कळलें मी माझें हें सारें । मिथ्या चंचल जैसें वारें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज लावीं आत्म पथा ॥५॥

२५
तुझ्या भेटीचा वियोग । न साहे परी कर्मभोग ॥१॥
माझा म्हणउनि तूं न येसी । मज कधिं रे दर्शन देसी ॥२॥
आतां न लावीं ऊशीरा । धांवत येरे श्री रघुवीरा ॥३॥
जल जीवन जैसें मीना । तसा तूं मज जगजीवना ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । नुरवीं जन्म मरण व्यथा ॥५॥

२६
मज तूझीच आवडी । आठवसी घडी घडी ॥१॥
तरि तुज शोधूं कोण्याठाईं । सांपडसी कोण उपाईं ॥२॥
तुज भेटायाची कींव । येवुनि तळमळ तो हा जीव ॥३॥
ये रे ये रे सितारामा । जिवलगा मंगळ-धामा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुज मी कळविलि माझी गाथा ॥५॥

२७
राम दयेचा सागर । भक्त गाती बडीवार ॥१॥
तो तूं लटिका करिसी काई । मज तळमळविसि या ठाईं ॥२॥
ये रे ये रे दयाघना । प्रभो जानकी जीवना ॥३॥
मज धीर तुझा गंभीर । देवुनि दर्शन करीं मन स्थिर ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । आहे लक्षुनि आत्मपथा ॥५॥

२८
आत्म भेटी मन भूकेलें । तरि त्वां निष्टुर मन कां केलें ॥१॥
राम भक्तांचा अभिमानी । ह्मणती तुज मोक्ष दानी ॥२॥
तो तूम सोडिसिकां रे मज । रामा अंतरीं समज ॥३॥
धरुनियां अभिमान माझा । येरे धांवत राम राजा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । करीं पूर्ण मनोरथा ॥५॥

२९
झालासि निष्टुर कांरे ऐसा । धरिला तुझाचि भरंवसा ॥१॥
दाउनि मायेचा हा खेळ । किती लविसि तूं वेळ ॥२॥
येरे धांवुनि झडकरि रामा पुरवीं माझ्या इच्छित कामा ॥३॥
तुझी गाइन ब्रीदावली । रामा रामा हे वनमाळी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । दूर करीं मनोव्यथा ॥५॥

३०
कोणतीहि न धरि तूं शंका । भेटि द्याया मज या रंका ॥१॥
कांहि मागेन मी तुज पाशीं । या भयें तूं परतुनि जाशी ॥२॥
तरि मज कांहि नको तुजविण । मन न तुझें कठीण ॥३॥
दावीं एकदां चरण । अनन्यभावें तुज शरण ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज उद्धरि दीन अनाथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP