भक्तवत्सलता - अभंग ४१ ते ४५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४१.
पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥
पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीनें ॥२॥
विधीचा जनक रमा ज्यची दासी । ध्यान अह-र्निशीं करी शिव ॥३॥
रोमीं जयाचे ब्रह्माडें अनंत । चारी बेदां अंत न कळे ज्याचा ॥४॥
नामा ह्मणे राबे भक्तांचिये घरीं । भाव देखोनि हरि भुलतसे ॥५॥

४२.
नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती ॥१॥
न मागें मी तैसा न मागें मी तैसा । न मागें मी तैसा कदा काळीं ॥२॥
कौरवांचे काजीं घेसी गाढेपण । धर्मा वरीं पूर्ण घोडे धुसी ॥३॥
नामा म्हणे आह्मी कीर्ति वाखाणावी । भक्तांसी गोसांवी होसी देवा ॥४॥

४३.
पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥
सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥
विदुराच्या कण्या खाय धणीवरी । झाला बळिचे द्वारीं द्वारपाळ ॥३॥
नामा ह्मणे हरिचे न कळती पवाडे । नेणों भक्तां-पुढें वेडा झाला ॥४॥

४४.
काय वाणूं आतां पायाचा महिमा । जेथें झाली सीमा बोलायाची ॥१॥
विठोबाचे पाय आठवितां मनीं । गेलें हरपोनी भवभय ॥२॥
पाय नारदानें ह्लदयीं धरितां । ब्रम्हांडीं मान्यता झाली त्याची ॥३॥
सनकादिकांलागीं पाय वज्र कवच । ब्रह्मादि-देवांस पद जेणें ॥४॥
लागतांचि पाय शिळा दिव्य झाली । पाषाण तारिले उदकावरी ॥५॥
पाय ते रमेचे सौभाग्य साजिरें । योगि ऋषीश्वर थोर जेणें ॥६॥
नामा म्हणे मनीं पाय सर्वकाळ । म्हणोनि सुकाळ आनंदाचा ॥७॥

४५.
उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें ॥१॥
भक्तभाग्य थोर नव्हे कधीं प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥
गणिका गजेंद्र उद्धव नारद । आपण गोविंद मिळोनियां ॥३॥
समुद्रमंथनीं उभा करोनियां । लागतसे पायां नामा ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP