भक्तवत्सलता - अभंग ३६ ते ३७

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३६.
दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों ॥१॥
ऐसा तूं कृपाळु लक्षुमीचा कांत । सांडूनि होतात कष्टी झणीं ॥२॥
सेवा माझा स्वामि वैकुंठनायक । भुक्ति - मुक्तिनायक पांडुरंग ॥३॥
साधिलें नगर देऊनियां शिर । कष्ट दश-शिरें एवढे केले ॥४॥
तें दिलें बिभिषणा एका नमस्कारा । त्या माझ्या उदारा कां न भजा ॥५॥
मांडीवरी बैसों नेदी सापत्न माता । ह्मणे राजसुता नव्हसी तूं ॥६॥
हें ऐकोनी वना जाय तो तत्त्वता । स-कळ देवा माथां वरिष्ठ केला ॥७॥
दुर्योधनें भोजना बहु केले सायास । परि न घे ग्रास तया घरीं ॥८॥
विदुराचे घरीं न पुसतां जाय । भक्ति प्रीय होय स्वामि माझा ॥९॥
अर्जुनाचे काजीं सांडी निज पैजा । सु-दर्शना वोजा धरियेलें ॥१०॥
आपण लटिका झाला भीष्म साच केला । काळाचा अभुला स्वामि माझा ॥११॥
दीक्षित अवदान देती निज करीं । परि मुख न करी तयांकडे ॥१२॥
सुदाम्याचे पोहे देखे दृष्टिभरी । तयासी श्रीहरी पसरी हात ॥१३॥
ह्मणूनि हा गावा ह्मणूनियां ध्यावा । तोचि आराधाचा ह्लदयकमळीं ॥१४॥
हरिगुण नाम हेंचि प्रिय आह्मां । कीर्ति गाय नामा होऊनि भाट ॥१५॥

३७.
अज्ञानबाळकें तुझा हाकारा केला । तेणें तये वेळां स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥
स्तंभीं प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हिं लोक । भेणें पळती शंखा - दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥
आली त्रिभुवन देवता । नाभी नाभीरे म्हणतां । माझा प्रर्‍हाद केउता । तो कवणें रे गांजिला ॥३॥
वदन पसरूनि विकाळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसे वडवानळ । शोषूं पाहे जळनिधि ॥४॥
संहार झाला नागकुळ । भ्याले अष्टहि लोकपाळ । स्वर्गीं सुटली खलबळ । अमरावतीं इंद्रासी ॥५॥
मग दैत्यातें पाचारित । लोह खणखणा वाजत । हाकीं अंबर गर्जत । तेणें कांपे मेदिनी ॥६॥
कवटाळूनि चहूं हातीं । विदारिलें चपेट-घातीं । जैस रुद्र प्रळयांतीं । तैसा हरी दिसतसे ॥७॥
दैत्य न मरे कवणें परी । मग तो धरिला जान्हूवरी । देखें उदर फोडूनि सत्वरी । अस्थि चूर्ण केली या ॥८॥
मौजे नाचती । मुक्ति दिल्ही दैल्य-नाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभयदाता भक्तांसीं ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP